Total Pageviews

Friday 4 May 2018

एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ


आयुष्याची अखेरची २० वर्षेही हैदराबादेतच व्यतीत करून, लतीफ सोमवारी रात्री निवर्तले.

हैदराबादेतच जन्मापासूनची (१९२३) सुमारे १९वर्षे व्यतीत करून, तिथल्या ‘निजाम कॉलेजा’त शिकून इद्रिस हसन लतीफ ऐन १९४२ साली ब्रिटिशांच्या रॉयल एअर फोर्समध्ये वैमानिक झाले. हरिकेन आणि स्पिटफायरसारखी तेव्हाची अद्ययावत विमाने हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि १९४४ सालात त्यांना महायुद्धाचाच एक भाग असलेल्या ब्रह्मदेश आघाडीवर जपान्यांशी लढण्यासाठी पाठविले गेले; तेव्हा त्यांचे वरिष्ठ होते स्क्वाड्रन लीडर अशगर खान आणि सहकारी होते नूर खान. हे तिघेही तेथे मित्रांप्रमाणेच वागत. पण १९४७ साल उजाडले तेव्हा अशगर आणि नूर खान यांची एक विनंती लतीफ यांनी पार धुडकावली..
ही विनंती होती, ‘मुस्लीम आहेस, पाकिस्तानात ये. तिथेही हवाई दलातच अधिकारी होशील..’ अशी! लतीफ यांना खरोखरच पाकिस्तानात (कमी स्पर्धेमुळे) मोठी पदे मिळाली असती.
पण ‘मी भारतीय हवाई दलातच राहीन’ असे सांगून लतीफ यांनी ही विनंती फेटाळली.  त्यांचे जन्मगाव असलेले हैदराबाद संस्थानसुद्धा जेव्हा पाकिस्तानकडे नजर लावून भारतात विलीन होणे नाकारत होते, तेव्हाच्या काळात लतीफ यांनी ही धडाडी दाखविली. पाकिस्तानने १९४७ सालीच काश्मीर सीमेवर भारताची काढलेली कुरापत परतवून लावणाऱ्या वीरांमध्ये लतीफ हेही होते. पुढे १९७१ पर्यंतची सर्व युद्धे- म्हणजे पाकिस्तानशी झालेली तिन्ही उघड युद्धे आणि चीनयुद्ध – यांत लतीफ लढलेच, पण १९७१ मध्ये एअर व्हाइस मार्शल या पदावरून, म्हणजे  हवाई दलात उपप्रमुख म्हणून योजनांची जबाबदारी सांभाळताना, लतीफ यांनी हवाई दलाच्या अद्ययावतीकरणासाठी प्रयत्न सुरू केले.  बांगलादेश मुक्तिसंग्रामानंतर ‘परम विशिष्ट सेवा पदका’चे मानकरी ठरलेल्यांत लतीफ यांचा समावेश होता. हवाई दलाच्या प्रमुख पदाची (एअर चीफ मार्शल) सूत्रे त्यांनी सप्टेंबर १९७८ मध्ये स्वीकारली. ‘मिग-२३’ व ‘मिग-२५’ या तत्कालीन प्रगत लढाऊ विमानांचा अंतर्भाव हवाई दलात व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच.. पण एका अपघातग्रस्त ‘मिग-२५’ विमानाची दुरुस्ती भारतीय तंत्रज्ञांनी केल्यानंतर, त्याच विमानातून भरारी मारून त्यांनी १९८१ च्या ऑगस्टअखेर आपली लढाऊ कारकीर्द संपविली. पुढे महाराष्ट्राचे राज्यपाल (१९८२-१९८५) आणि फ्रान्समधील राजदूत (१९८५-८८) अशी पदे त्यांना मिळाली.  राज्यपालपदाची त्यांची कारकीर्द, त्यांच्या पत्नी बिल्कीस बानो यांच्या समाजकार्यामुळेही लक्षणीय ठरली. आयुष्याची अखेरची २० वर्षेही हैदराबादेतच व्यतीत करून, लतीफ सोमवारी रात्री निवर्तले

No comments:

Post a Comment