Total Pageviews

Wednesday 24 January 2018

भारताचा लादेन जेरबंद!-NAVSHKTI


भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमागील एक सूत्रधार, इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा सहसंस्थापक, ज्याच्या मागावर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह विविध राज्यांचे पोलीस होते, अशा अब्दुल सुभान कुरेशी उर्फ तौकीर नावाच्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यास अटक करून दिल्ली पोलिसांनी चांगली कामगिरी बजाविली आहे. अब्दुल कुरेशीचा कित्येक दिवसांपासून शोध चालू होता. पण पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता. या कुप्रसिद्ध दहशतवाद्यास पोलीस यंत्रणा भारतीय ओसामा बिन लादेन म्हणून ओळखत होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यासाठी 4 लाखांचे इनाम लावले होते. अब्दुल सुभान कुरेशी यास अटक झाल्याने देशातील काही दहशतवादी घटनांचा नक्कीच छडा लागेल. प्रजासत्ताकदिन तोंडावर आला असताना दिल्लीत घातपात घडविण्याची योजना कुरेशी आखत होता का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मूळचा संगणक अभियंता असलेला अब्दुल कुरेशी हा दहशतवादी अहमदाबादमध्ये 2008मध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्यामागील सूत्रधार असल्याचे सांगण्यात येते. अहमदाबादमधील स्फोटांत 59 निरपराध मृत्युमुखी पडले होते. 2006 ते 2011 दरम्यान देशात जे विविध बॉम्बस्फोट झाले, त्यात याचा हात असल्याचा संशय आहे. मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला आणि संगणक अभियंता म्हणून नोकरी करत असलेल्या कुरेशीने आपल्या संगणक कंपनीला इ-मेल पाठवून, धार्मिक आणि आध्यात्मिक कामांसाठी पुढील एक वर्ष देण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे कळविले होते. जहाल दहशतवादी गटाच्या प्रभावखाली अब्दुल कुरेशी जात असल्याचेच ते द्योतक होते. आधी ‘सिमी‘च्या माध्यमातून, तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त करणारा हा दहशतवादी ‘सिमी‘वर बंदी आल्यानंतर ‘इंडियन मुजाहिदीन’ या जहाल संघटनेत सक्रिय झाला. या संघटनेचा तो सहसंस्थापक होता. कुरेशीच्या मागावर पोलीस गेली सुमारे दहा वर्षे होते. पण प्रत्येकवेळी पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार होत असे. बॉम्ब तयार करण्यात, ‘आईडी‘ बनविण्यात, तो पारंगत होता. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेला कुरेशी ‘सिमी’च्या ‘द इस्लामिक मुव्हमेंट‘ नावाच्या धार्मिक विद्वेष पसरविणार्‍या नियतकालिकाचा संपादक होता. भारताबद्दल कमालीचा द्वेष असलेला कुरेशी, धर्मांधांना संघटनेच्या कामात ओढण्यात वाकबगार होता. दहशतवादी कृत्ये करण्यासाठी देशात शिबिरे घेणे, शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देणे, दहशवादी कारवायांसाठी पैसे उभारण्यासाठी सौदी अरेबियास भेट देणे, अशा अनेक गैरकृत्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. ‘सिमी‘चा संस्थापक सफदर नागोरी, रियाझ भटकळ यांच्याशी त्याचे घनिष्ठ लागेबांधे होते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली की अब्दुल उर्फ तौकीर कुरेशी किती कट्टर दहशतवादी आहे, याची कल्पना येते. अनेक दहशतवादी कृत्याशी कुरेशी याचे नाव जोडले गेले आहे. 2006मध्ये मुंबईत लोकलमध्ये झालेले बॉम्बस्फोट, त्याच साली वाराणसी येथे झालेला स्फोट, 2007 साली हैदराबाद येथील लुम्बिनी पार्क भागात झालेला भीषण स्फोट, 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेले स्फोट, त्याच साली सुरतमध्ये स्फोट घडवून आणण्याचा असफल प्रयत्न, त्याच वर्षी झालेले जयपूरमधील स्फोट, अशा वानगीदाखल काही प्रमुख घटनांमधील सहभागासाठी कुरेशी पोलिसांना हवा होता. आता या दहशतवाद्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याने या सर्व कृत्यांमागे कोणत्या जिहादी संघटना आहेत, त्यांना कोण मदत करीत आहे, पैसा कोण पुरवीत आहे, या गोष्टींचा उलगडा होईल. अब्दुल कुरेशी याने केलेल्या भीषण गुन्ह्यांची चौकशी करून त्याच्यावर त्वरेने खटले कसे दाखल होतील, हे राष्ट्रीय तपास यंत्रणेसह विविध राज्यांच्या पोलीस दलांनी पहिले पाहिजे. देशात दहशतवादी कृत्ये घडवून आणणार्‍या या जहाल दहशतवाद्यास कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी अपेक्षा आहे. अब्दुल कुरेशी आज हाती लागला आहे. पण त्याच्यासारखे असंख्य जहाल दहशतवादी देशात सक्रिय आहेत. विदेशातील जिहादी त्यांची माथी भडकावीत आहेत, त्यांच्याशी मुकाबला कसा करणार? अब्दुल कुरेशीसारखे शिकलेले तरुण दहशतवादाकडे का वळतात, याचाही सखोल विचार करण्याची गरज आहे. जगात सगळीकडेच दहशतवाद फोफावत आहे. भारतही त्यास अपवाद नाही. असे असले तरी दहशतवादाचा मार्ग पत्करून विध्वंसक कृत्ये करणार्‍या आणि देशाच्या ऐक्यास धोका पोहोचविणार्‍या या नतद्रष्ट मंडळींचा कठोरपणे बीमोड करण्याची नितांत गरज आहे.

No comments:

Post a Comment