Total Pageviews

Tuesday 23 January 2018

छत्तीसगड-बस्तरमध्ये दीड तपाहून अधिक काळ प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्या सुनीता गोडबोले यांना यंदाचा 'बाया कर्वे पुरस्कार' देऊन पुण्यात नुकतेच सन्मानित करण्यात आले.-पर्यटनात आघाडीवर असणारी महाराष्ट्रीय मंडळी देश-विदेश धुंडाळत फिरत असतात. यापैकी काहींनी तरी वाकडी वाट करून पर्यटनाच्या निमित्ताने बस्तरला जाऊन गोडबोले पतिपत्नींना भेटायला काय हरकत आहे?

छत्तीसगड-बस्तरमध्ये दीड तपाहून अधिक काळ प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्या सुनीता गोडबोले यांना यंदाचा 'बाया कर्वे पुरस्कार' देऊन पुण्यात नुकतेच सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा हा सविस्तर परिचय.
रुण वयात आयुष्यभर सामाजिक सेवा करण्याचे स्वप्न बघणारे अनेक जण असतात. काही जण तसे बोलूनही दाखवत असतात. परंतु फारच थोडे मोजके लोक ते प्रत्यक्षात आणण्याचे धाडस दाखवू शकतात. अशा मोजक्या लोकांपैकीच सुनीताताई गोडबोले या एक आहेत. त्या सुमारे 30 वर्षांहून अधिक काळ पूर्णत: सामाजिक सेवेत आहेत. सध्या त्या नक्षलवादामुळे सर्वांना परिचित असलेल्या छत्तीसगड राज्यातील बस्तर परिसरातील दंतेवाडा जिल्ह्यात काम करीत आहेत. दीड तपाहून अधिक काळ त्या वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून बस्तरमध्ये आदिवासी महिलांमध्ये काम करीत आहेत.
मूळच्या पुणेकर असणाऱ्या सुनीताताई या सहकार नगरमधील पूर्वाश्रमीच्या सुनीता पुराणिक. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अ.भा.वि.प.च्या) संपर्कात आल्या व सामाजिक कामाशी अधिकाधिक संलग्न होत गेल्या. तत्कालीन ज्येष्ठ नेते यशवंतराव केळकर व बाळासाहेब आपटे यांच्या अभ्यासवर्गातील मांडणीमधून त्यांना सामाजिक कार्याची दृष्टी मिळाली. स्वत:कडे न बघता समाजाकडे बघितले पाहिजे या दृढ संस्काराचा वसा मिळाला. त्यातूनच आयुष्यभर आदिवासी भागात प्रत्यक्ष राहून काम करण्याची त्यांची दिशा निश्चित होत गेली. त्यानुसारच त्यांनी मग ठरवून कर्वे शिक्षण संस्थेतून सामाजिक सेवेच्या संदर्भातील एम.एस.डब्लू.चे (M.S.W.चे) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. काही काळ पुण्यातील एका सामाजिक संस्थेत अनुभवासाठी दोन वषर्े नोकरी केली. परंतु आयुष्यभर आदिवासी भागात काम करण्याचे स्वप्न काही त्यांना स्वस्थ बसू देईना.
वनवासी क्षेत्राचा परिचय
तत्कालीन संघ प्रांत प्रचारक दामूअण्णा दाते यांच्याशी बोलणे करून त्यांच्या योजनेनुसार सुनीताताईंच्या प्रत्यक्ष वनवासी क्षेत्रातील पूर्ण वेळ कामास सुरुवात झाली. 1984मध्ये सुरुवातीला सहा महिने त्या ठाणे जिल्ह्यातील तलासरी केंद्रावर राहिल्या. त्या वेळेस केशवराव केळकर हे ज्येष्ठ संघप्रचारक वनवासी क्षेत्रात अत्यंत आत्मीयतेने कार्यरत होते. त्यांची त्या वेळची वनवासी भगिनींसाठी दिवाळीची 'साडी-चोळी भाऊबीज' योजना अनेकांच्या आजही स्मरणात आहे. अशा या केशवरावांबरोबर वनवासी क्षेत्रात प्रासंगिक फिरण्याची संधी सुनीताताईंना मिळाली. त्यातून त्यांना वनवासी समाजाची खरी ओळख झाली. सुरुवातीला फक्त काही वर्षे वनवासी क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा विचार होता.
सहा महिन्यांची उमेदवारी संपल्यानंतर रायगड जिल्ह्यातील जांभिवली केंद्रावर वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्ण वेळ काम करण्यास रीतसर सुरुवात झाली. त्या वेळेस जांभिवली केंद्रावर काम करण्यास कुंटे काका-काकूंनी नुकतीच सुरुवात केली होती. या जोडगोळीची आणि सुनीताताईंची चांगली गट्टी जमली. आदिवासी महिलांमध्ये प्रत्यक्ष राहून त्यांच्यात मिसळून काम करण्याची संधी त्यांना जांभिवलीतील वास्तव्यात मिळाली. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांचा आत्मविश्वास दुणावला व आयुष्यभर आदिवासी भागात काम करण्याचा निश्चय अधिकच दृढ झाला. या त्यांच्या निश्चयाला अनुकूल असणाऱ्या जीवनसाथीदाराची निवड करण्याचे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे आदिवासी भागात प्रत्यक्ष राहून वैद्यकीय सेवा देण्याची स्वप्ने पाहणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांच्याशी 1990मध्ये त्यांचे लग्न झाले. वनवासी कल्याण आश्रमाचे तत्कालीन संघटनमंत्री भास्करराव कळंबी यांनी या नवविवाहित दांपत्याला लग्नानंतर छत्तीसगड-बस्तरला जाण्याचे आवाहन केले. या प्रस्तावास अनुकूलता दर्शवत लगेचच या नवविवाहित दांपत्याने एक तपासाठी बस्तरमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ राहून काम करण्याचा निर्णय निर्धारपूर्वक घेतला अन ते लगोलग दाखलही झाले.
बस्तरमधील सेवामय सहजीवनाची सुरुवात
दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर (ता. गीदम) येथील आदिवासी मुलींच्या छात्रावासाची महत्त्वाची जबाबदारी सुनीताताईंनी स्वीकारली आणि डॉ. राम गोडबोले यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून बारसूरमध्येच दवाखाना सुरू करून आदिवासींना वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. पूर्वायुष्य पूर्णपणे शहरात गेलेल्या या सुशिक्षित नवविवाहित दांपत्याची सहजीवनाची सुरुवात बस्तरमधील मातीच्या घरात झाली. दीड वर्षापासून बंद अवस्थेत असलेला व पडक्या स्थितीत असलेला दवाखाना आता आदिवासी रुग्णांनी पुन्हा गजबजू लागला. सुनीताताईंमुळे बारसूरला आदिवासी मुलींचे वसतिगृह 1991मध्ये नव्याने चालू करण्यात आले. वसतिगृहात शिकायला मुली आणण्यासाठी आदिवासी पाडयांमध्ये जायला सुरुवात झाली. या कामाशी सुनीताताई एवढया समरस झाल्या की त्यांनी तेथील आदिवासींची स्थानिक 'गोंडी व हल्बी' भाषा झटपट शिकून घेतली. त्यातून स्थानिक आदिवासींशी त्यांचा सहज व सफाईदारपणे संवाद होऊ  लागला. आदिवासी महिलांशी जवळीक वाढून मोठे संघटन हळूहळू उभे राहिले. त्यातून त्यांच्याबरोबर कामाला काही वनवासी महिला कार्यकर्त्या हिरिरीने पुढे आल्या. डॉ. राम गोडबोले चालवत असलेल्या दवाखान्यातील रुग्णांची संख्या स्वाभाविकपणे वाढण्यात स्थानिक भाषा येण्याचा मोठा फायदा झाला. प्रतिवर्षी बस्तर दौऱ्यात गोडबोले पती-पत्नीची भेट घेऊन त्यांच्या कामाची जिव्हाळयाने विचारपूस करण्याचा भास्करराव कळंबी यांचा परिपाठ 2001पर्यंत चालू होता. कार्यकर्त्यांना सांभाळणे व कायम प्रेरणा देत राहणे हे भास्कररावांचे स्वभाववैशिष्टय होते. आजही भास्कररावांच्या आठवणी हा गोडबोले पतिपत्नीसाठी एक हळवा कोपरा आहे.
 ठरवल्याप्रमाणे एक तप पूर्णवेळ काम केल्यानंतर 2002मध्ये सुनीताताईंना कौटुंबिक आजारपण व अन्य कारणांमुळे महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. या दरम्यान त्यांनी पालघर जिल्ह्यात प्रत्यक्ष राहून तेथील विक्रमगड परिसरात किशोरी मुलींच्या आरोग्य शिक्षणाचे व वनवासी महिलांच्या संघटनांचे काम केले. तेथे दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांना पुन्हा बस्तरची ओढ वाटू लागली. महाराष्ट्रातील आदिवासी तुलनेने सुशिक्षित आहे, त्याची सांपत्तिक स्थिती बस्तरच्या तुलनेत निश्चितच बरी आहे, त्यामुळे आपली खरी गरज बस्तरमधील आदिवासींसाठीच आहे. सुदैवाने महाराष्ट्रात अनेक जण काम करतात, बस्तरमध्ये आपल्याशिवाय कोण जाणार? असा विचार करून अखेरीस 2012 साली पुन्हा बस्तरमध्ये पुढील दहा वर्षांसाठी कामाला जाण्याचा निर्णय डॉ. राम व सुनीता गोडबोले यांनी घेतला व ते परत बस्तरमध्ये लगेचच दाखल झाले.
बस्तरमधील कामाचे सध्याचे स्वरूप
दरम्यानच्या काळात 2000 साली छत्तीसगड स्वतंत्र राज्य झाले. पुढे टप्प्याटप्प्याने एका बस्तर प्रदेशाचे सात आदिवासी जिल्हे झाले. बदलत्या परिस्थितीनुसार व स्थानिक कामाच्या गरजेनुसार बस्तरमधील कामाचे स्वरूप बदलत गेले. दोघेही सध्या वनवासी कल्याण आश्रमाच्या बारसूर कार्यालयात राहत आहेत. आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रासंगिक लक्ष घालून सुनीताताई आजूबाजूच्या परीसरातील आदिवासी पाडयांवरील स्थानिक महिला आरोग्य सेविकांबरोबर काम करीत आहेत. बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी त्यांची आरोग्यविषयक प्रशिक्षणे घेत आहेत. नियमित प्रशिक्षणाचा महत्त्वाचा आयाम सध्या त्याला जोडला गेलेला आहे.
महिलांच्या व लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक असणारे व रॉकेलवर चालणारे दिवे प्रकाशासाठी बस्तरमध्ये आजही वापरले जातात. त्याला समर्थ व सक्षम आधुनिक पर्याय म्हणून सुनीताताईंनी गेल्या तीन वर्षांत शेकडो वनवासींच्या घरांमध्ये सौर दिवे पोहोचवले आहेत व हे काम अद्यापही चालू आहे. हे दिवे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील कृतज्ञता ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
डॉ. राम गोडबोले हेही आता पूर्वीसारखा एका जागी दवाखाना चालवत नसून गावोगाव आरोग्य शिबिरे घेत आहेत. हैदराबादवरून रातोरात लांबचा प्रवास करून आरोग्य शिबिरांना अत्यंत नियमित उपस्थित राहणारे डॉ. करमाळकर या तज्ज्ञ डॉक्टरांची मोलाची साथ गेली काही वर्षे मिळत आहे. स्थानिक आदिवासी रुग्ण मोठया संख्येने उपस्थित राहून ही शिबिरे यशस्वी करण्यातही सुनीताताईंचा मोठा वाटा आहेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या परंतु पैशाअभावी अथवा अज्ञानामुळे उपचार टाळणाऱ्या रुग्णांना जगदलपूर (45 कि.मी.) व रायपूर (400 कि.मी.) येथे पुढील तपासण्यांसाठी व प्रत्यक्ष शस्त्रक्रियांसाठी या वनवासी रुग्णांना राजी करण्याच्या अवघड कामात डॉ. गोडबोले व सुनीताताई अथकपणे प्रयत्न करीत आहेत. एकेका रुग्णाचा पाठपुरावा करून उपचाराची प्रक्रिया पूर्ण करण्यात दमछाक होते आहे. शिवाय अशा सर्व रुग्णांपर्यंत पोहोचून ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आपण अपुरे पडतो आहोत, याची जाणीव होऊन होणारी मानसिक घुसमट तर वेगळीच!
गेल्या पाच वर्षांत बस्तरसारख्या दुर्गम प्रदेशात सामाजिक काम करण्याच्या ऊर्मीने अनेक युवक-युवती येऊन दाखल होत आहेत. वर्ष-दोन वर्षे काम करून परतणारे अनेक जण असले, तरी मोजक्या संख्येने का होईना, पण स्थिरावण्याची स्वप्न बघणारेसुध्दा काही जण आहेत. त्यात तेलंगणातील प्रणीत सिम्भा, तसेच महाराष्ट्रातील आकाश बडवे, ज्योती पटाले, श्रीराम देशपांडे आणि उत्तर प्रदेशमधील आशिष-शालिनी श्रीवास्तव हे पतिपत्नी आहेत. ही सर्व मंडळी ठिकठिकाणाहून विभिन्न प्रेरणा घेऊन आली असून आपापल्या परीने सामाजिक कामाचे वेगवेगळे प्रयोग तेथे करीत आहेत. गोडबोले पती-पत्नींचे बस्तरमधील प्रदीर्घ वास्तव्य हा या सर्वांसाठी अनुभवाचा आणि प्रेरणेचा ठेवा आहे. घरादारापासून हजारो किलोमीटर असणाऱ्या या तरुण मंडळींसाठी तो एक प्रकारचा हक्काचा कौटुंबिक-मानसिक आधार आहे.
'आदिवासींचे शोषण, भ्रष्टाचार, आदीवासींना सन्मान नसणे, त्यांना दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळणे हे बस्तरमधील प्रमुख प्रश्न आहेत. या सर्वांकडे शहरी समाजाचे झालेले मोठया प्रमाणात दुर्लक्ष कारणीभूत आहे. यातून मग एखादा आदिवासी माणूस बंदूक उचलायला राजी होतो. म्हणून वर्तमानकाळात तरी आपण या समाजाच्या उत्थानासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले पाहिजेत' हे सुनीताताईंचे म्हणणे विचार करायला लावणारे आहे.
अनेक वर्षे महाराष्ट्रापासून दूर राहिल्यामुळे डॉ. गोडबोले पती-पत्नींचे कामही महाराष्ट्रात अनेकांना फारसे माहीत नाही. तरीही त्यांच्या अविरत चालणाऱ्या कामाची दखल घेऊन त्यांना पुण्यातील नातू फाउंडेशनतर्फे पुरस्कार देऊन यापूर्वी गौरविण्यात आले आहे. वनवासी रुग्णांना जीवदान मिळवून देणाऱ्या त्यांच्या सेवाभावी मानवतावादी कार्याची दखल बाया कर्वे पुरस्कारामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राने घेतली आहे. खरे तर पर्यटनात आघाडीवर असणारी महाराष्ट्रीय मंडळी देश-विदेश धुंडाळत फिरत असतात. यापैकी काहींनी तरी वाकडी वाट करून पर्यटनाच्या निमित्ताने बस्तरला जाऊन गोडबोले पतिपत्नींना भेटायला काय हरकत आहे?

No comments:

Post a Comment