Total Pageviews

Friday 19 January 2018

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सहा दिवसांच्या भारत दौर्‍यावर


1965 चे भारत-पाकिस्तानचे युद्ध, 1971 चे बांगलादेश निर्मितीचे युद्ध किंवा 1999 चे कारगिलचे युद्ध या सर्व युद्धात इस्राईलने भारताला मदत केली होती. विशेषतः स्वित्झर्लंडकडून खरेदी केलेल्या बोफोर्स तोफांचा दारूगोळा कारगिल संघर्षात इस्राईलकडूनच मिळाला होता. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमधील संबंध आणखीन घनिष्ठ होऊ शकतात. त्या संदर्भात महत्त्वपूर्ण करार या भेटीदरम्यान होणार आहेत. 
व्यापार आणि आर्थिक संबंधांचा विचार करता भारत आणि इस्राईल यांच्यातील व्यापार हा साधारणतः 12 अब्ज डॉलर इतका आहे. त्यातील जास्त भाग हा संरक्षणाचा आहे. हा व्यापार 20 अब्ज डॉलरपर्यंत नेता येऊ शकतो. त्यासाठी एक अत्यंत मोठी प्रलंबित गोष्ट आहे. गेल्या कित्येक वर्षांत त्यावर चर्चा झालेली नाही. भारत आणि इस्राईल या देशांदरम्यान मुक्‍त व्यापार क्षेत्राची निर्मिती. गेल्या काही वर्षांपासून त्यावर चर्चा सुरु आहे, पण त्याला अंतिम स्वरूप मिळालेले नाही. या भेटीदरम्यान त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होण्यासाठी काही निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षा आहे. ते झाल्याशिवाय व्यापारवृद्धी होणार नाही. याखेरीज हिर्‍यांना पैलू पाडण्याच्या क्षेत्रात रशिया, इस्राईल आणि भारत तीनही देश आघाडीवर आहेत. त्यामुळे या क्षेत्रात व्यापार वाढू शकतो. 

सध्या भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या द‍ृष्टीने सायबर सिक्युरिटी हे महत्त्वाचे क्षेत्र पुढे आलेले आहे. याबाबत भारत इस्राईलकडे अपेक्षेने पाहात आहे. सध्याचा दहशतवाद हा अत्याधुनिक स्वरूपाचा असल्याने त्याचा प्रसारही अत्याधुनिक पद्धतीने होतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर होतो. त्याला रोखण्याचे तंत्रज्ञान इस्राईलकडे आहे. 2014 मध्ये राजनाथसिंह यांनी इस्राईलचा दौरा केलेला होता. इस्राईल हा सातत्याने दहशतवादाच्या छायेत असणारा देश असल्याने दहशतवादाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत. काश्मीरमध्ये आपल्याला दगडफेक करणार्‍या लोकांचा त्रास होत आहे. दगडफेकीच्या आडून दहशतवादी काही मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांचा सामना करण्यासाठी इस्राईलने पॅलेट गन विकसित केल्या आहेत. त्या भारतासाठी निश्‍चितच उपयोगी पडतील. दोन्ही देशांतील संबंध घनिष्ठ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः दहशतवादाचा प्रश्‍न असेल त्याबाबत इस्राईलची खूप मोठी मदत होऊ शकते त्यामुळे इस्राईलच्या पंतप्रधानांचा नेतान्याहूंचा दौरा भारताच्या द‍ृष्टीने खूप महत्त्वाचा आहे

No comments:

Post a Comment