Total Pageviews

Tuesday 30 January 2018

हे व्यर्थ न हो बलीदान-जे. पी. निराला मरणोत्तर अशोक चक्र, मिलींद खैरनारना मरणोत्तर शौर्य चक्र,अकोला येथील शिपाई सुमेध गवई कोल्हापूरचे शिपाई सावन बाळकू माने व औरंगाबाद जिल्ह्यातील नाईक संदीप सर्जेराव जाधव यांना मरणोत्तर सेना मेडल (गॅलंट्री) कश्मीरात लष्करावर खुनाचा गुन्हा-भारतीय जवानांवरील गुन्हे मागे घ्या;


काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत झालेल्या दोन नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी सैन्यातील जवानांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. यावरून काश्मीर सरकारमध्ये भागीदार असणाऱ्या भाजपा आणि पीडीपीत फूट पडली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी शोपियान जिल्हयात गनोवपुरा गावातून जाणाऱ्या जवानांच्या ताफ्यावर नागरिकांनी तुफान दगडफेक केली. शेकडोंच्या संख्येने चालून आलेल्या जमावाला हटवण्यासाठी जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या. यावेळी जवान व नागरिक यांच्यात झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले होते. याप्रकरणी एक मेजर दर्जाचा अधिकारी आणि जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, भाजपा आमदार आर.एस. पठानिया यांनी हा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. माझी वैयक्तिक भूमिका हीच पक्षाचीही भूमिका आहे. एखाद्या व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू होणे, ही नक्कीच निषेधार्ह बाब आहे. मात्र, याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी होऊन नंतरच गुन्हेगारी कारवाई करणे योग्य ठरेल. या मुद्द्यावर एकमत असणे गरजेचे आहे, असे त्यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सांगितले.
तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्याच दिवशी फासावर का चढवू पाहत आहात, ही गोष्ट मला कळत नाही, असे पठानिया यांनी म्हटले. तसेच भारतीय सुरक्षादलांनी गरज नसतानाही गोळीबार केला, या विरोधकांच्या वक्तव्यावरही त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. जर सैन्याने खरंच तसं केलं असेल तर त्यांच्यावर दबाव आणायलाच पाहिजे आणि सरकारनेही याची गंभीर दखल घेतली पाहिजे. मात्र, आरोप झाल्यानंतर सैन्याच्या जवानांवर पहिल्याच दिवशी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.

भारतीय सैन्याच्या दाव्यानुसार ताफ्यातील एका अधिकाऱ्याच्या हातातील बंदूक हिसकावून त्याला बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न जमावाने केल्यानेच जवानांना गोळीबार करावा लागला. गनोवपुरा गावातून जवानांचा ताफा जात होता. त्याचवेळी अचानक १००-१२० नागरिकांनी जवानांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात झाली. जवान त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. पण जमाव काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बघता बघता जमावाचा आकडा २५० वर गेला आणि त्यांनी जवानांवर दगडफेक करणे सुरूच ठेवले. यामुळे जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला. पण त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला. त्यांनी जवानांच्या ४ वाहनांवर हल्ला करत ती पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उभे असलेल्या एका अधिकाऱ्यावरही जमावाने हल्ला केला. त्याच्या हातातील बंदूक खेचून त्याला लाथाबुक्क्यांनी मारण्यास जमावाने सुरुवात केली. यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. यात २ नागरिक ठार झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली होती
प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना सरकारने थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. जवानांवरील एफआयआर मागे घेतली नाही तर सरकार बरखास्त करण्यात येईल अशी धमकी स्वामी यांनी दिली आहे.
 ‘जम्मू-कश्मीरमधील मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सरकारने लष्कराच्या जवानांवरील गुन्हा मागे घेतला नाही तर त्यांचे सरकार बरखास्त करण्यात येईल. तसेच जवानांवर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारला भाजप अद्यापही साथ का देत आहे?
काही दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात २०० जणांच्या जमावाने सशस्त्र हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणासाठी लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते. जम्मू-कश्मीर पोलिसांनी लष्कराविरोधात थेट खुनाचा गुन्हा दाखल केला तसेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी लष्कराने केलेल्या गोळीबारप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. यामुळे भडकलेल्या स्वामी यांनी थेट भाजप-पीडीपी सरकारला आव्हान दिले आहे.
याआधी पीडीपीसोबत कश्मीर सरकारमध्ये असलेल्या भाजपने जवानांवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याची मागणी केली होती, मात्र मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी शोपिया जिल्ह्यात लष्कराच्या गोळीबार मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत या घटनेची शेवटपर्यंत चौकशी करण्यात येईल असे म्हटल्याने .
हे व्यर्थ न हो बलीदान-जे. पी. निराला मरणोत्तर अशोक चक्र, मिलींद खैरनारना मरणोत्तर शौर्य चक्र,अकोला येथील शिपाई सुमेध गवई कोल्हापूरचे शिपाई सावन बाळकू माने व औरंगाबाद जिल्ह्यातील नाईक संदीप सर्जेराव जाधव यांना मरणोत्तर सेना मेडल (गॅलंट्री)
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले भारतीय हवाईदलाचे गरुड कमांडो जे. पी. निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान देण्यात आला असून हा सन्मान प्रदान करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भावना अनावर झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील मुख्य सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते निराला यांची आई व पत्नीने अशोक चक्र सन्मान स्वीकारला. यावेळी निराला यांनी काश्मीरमध्ये गाजवलेल्या शौर्याचे वर्णन ऐकून राष्ट्रपती भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अशोक चक्र प्रदान केल्यानंतर राष्ट्रपतींनी रुमाल काढून आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसले.
जे. पी. निराला हे अशोक चक्रने सन्मानित करण्यात आलेले हवाईदलाचे पहिले गरुड कमांडो ठरले आहेत. जुलै २०१७ मध्ये दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत निराला यांना काश्मीरमध्ये स्पेशल ड्युटीवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१७ रोजी श्रीनगरमध्ये हाजिन येथील चंदरगीर गावात लष्कराने केलेल्या कारवाईत निराला यांनी जबरदस्त शौर्य गाजवले होते. एकट्या निराला यांनी या चकमकीत तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आणि त्यांनंतर त्यांना वीरमरण आले. याच कारवाईत दहशतवादी मसूद अझरचा पुतण्या तल्हा रशीद मारला गेला होता. या कारवाईत एकूण ६ दहशतवादी मारले गेले होते.

निराला यांचे वडील तेजनारायण यांना याबाबत विचारले असता 'मी माझा एकुलता एक मुलगा गमावला असला तरी तो देशासाठी शहीद झाल्याचा मला अभिमान आहे', अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. निराला यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सुषमा आणि ४ वर्षांची मुलगी जिज्ञासा आहे. वीरपत्नी सुषमा यांनीही निराला यांच्या आठवणी जागवल्या. 'स्वावलंबी हो. माझ्यावर विसंबून राहू नकोस. माझ्यालाठी देशाची सेवा हे प्रथम कर्तव्य आहे, असे माझे पती मला नेहमी सांगायचे', असे सुषमा म्हणाल्या.
मिलींद खैरनारना मरणोत्तर शौर्य चक्र

नाशिकचे वीर जवान मिलींद खैरनार यांनी दाखविलेले अदम्य साहस व विलक्षण धाडसाची दखल घेत त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदिपोरा जिल्हयात राष्ट्रीय रायफलचे जवान खैरनार यांनी १० ऑक्टोबर २०१७ च्या रात्री झालेल्या दशतवादी हल्यामध्ये निकराने लढा दिला. हाजीन गावामध्ये रात्री झालेल्या शोधमोहिमेत त्यांनी भाग घेतला. या शोधमोहिमेदरम्यान ११ ऑक्टोबर २०१७ च्या मध्यरात्री पाच ते सहा दहशतवाद्यांनी अचानक या जवानांवर हल्ला चढवला. याला प्रत्युत्तर देताना खैरनार यांनी कडवा प्रतिकार करत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. या चकमकीत खैरनार यांना गोळी लागून ते शहीद झाले. खैरनार यांनी अदम्य साहस दाखवत दहशतवाद्यांचा केलेला प्रतिकार व भारत भूमीच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलीदानासाठी त्यांना मानाचे शौर्यचक्र आज जाहीर झाले. मिलींद खैरनार हे मुळचे नंदुरबार जिल्हयातील बोराळा तालुक्यातील रनाळे येथील रहीवाशी होते व नाशिक येथे स्थायिक होते.
काश्मीरमधील शोपियान येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या मूळच्या अकोला येथील शिपाई सुमेध गवई यांनाही मरणोत्तर सेना मेडल (गॅलंट्री) जाहीर करण्यात आले आहेत. जम्मूमध्ये पूंछ भागात शहीद झालेले कोल्हापूरचे शिपाई सावन बाळकू माने व औरंगाबाद जिल्ह्यातील नाईक संदीप सर्जेराव जाधव यांना मरणोत्तर सेना मेडल (गॅलंट्री) जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा मेडल जाहीर करण्यात आले आहे. निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीत विशेष भूमिका बजावली होती. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे मूळचे वर्धा जिल्ह्य़ातील आहेत. शौर्य पदकांच्या यादीत महाराष्ट्रातील काही वीरांचाही समावेश आहे. यात लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) उपप्रमुख व अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर यांना अतिविशिष्ट सेवा मेडल जाहीर करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment