Total Pageviews

Friday 19 January 2018

डॉ. सचिन पेंडसे यांचे निधन-REST IN PEACE

2
dr. sachin



आरमारी इतिहासाचे अभ्यासक व नौदलाच्या मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीचे विद्वत सभा सदस्य आणि अंधेरीच्या तोलानी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सचिन पेंडसे यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.

डॉ. पेंडसेलिखित ‘मराठा आरमार - एक अनोखे पर्व’ हा ग्रंथ अलिकडेच प्रकाशित झाला होता व त्यास विविध पुरस्कारही मिळाले होते. तत्पूर्वी त्यांनी ‘मेरीटाइम हेरिटेज ऑफ कोकण’ हा कोकणातील समुद्री इतिहासाचा मागोवा घेणारा समग्र ग्रंथ लिहिला होता. ‘नॅव्हिगेशनल हॅजार्ड‍्स - लँडमार्क्स अॅन्ड अर्ली चार्टिंग - स्पेशल स्टडी ऑफ कोकण अॅन्ड साऊथ गुजरात’ हा त्यांचा पहिला ग्रंथ नौदलाने प्रकाशित केला. नौदलाच्या भविष्यकालीन विकासाच्या सिद्धांताच्या लेखनात डॉ. पेंडसे यांचा सहभाग होता. ड्रेजिंग व किनाऱ्याचा विकास या विषयावर त्यांनी पीएचडी केली होती. मुंबई, पुणे व गोवा या विद्यापीठांसाठी ३७ क्रमिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. ‘एसेज इनटू मेरीटाइम स्टडीज’ या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले होते. तोलानी महाविद्यालयात ते भूगोल, पर्यावरणशास्त्र या विषयांचे अध्यापन करायचे व विद्यार्थीवर्गात लोकप्रिय होते. अमेरिकन नेव्हल वॉर कॉलेज तसेच तुर्की व बेल्जिअममध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. आतापर्यंत सुमारे ८० शोधनिबंधांचे लेखन त्यांनी केले होते. भारतीय नौदलाच्या ईझीमला येथील प्रशिक्षण अकादमीत ते मानद अध्यापक म्हणून निमंत्रित असायचे. महाराष्ट्र सेवा संघाच्या सॅल्युट इंडिया या संरक्षणविषयक उपक्रमात नौदल व हवाई दलासंबंधीच्या प्रदर्शनांमध्ये माहितीपर भित्तीचित्रांचे संशोधन व लिखाण त्यांनी केले होते.

डॉ. पेंडसे यांच्या पार्थिवावर शोकमग्न वातावरणात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री अंधेरीच्या मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. पेंडसे यांच्या पश्चात पत्नी अपर्णा, पुत्र वरुण, मातोश्री जयश्री पेंडसे आणि विवाहित बहीण पल्लवी असा परिवार आहे. नौदलातर्फे डॉ. पेंडसे यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments:

Post a Comment