Total Pageviews

Wednesday 14 June 2017

भारताचे लष्कर प्रमुख म्हणजे ‘सडक का गुंडा’असल्याचे कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे विधान, त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेला साजेल असे निलाजरे अन् कॉंग्रेस पक्षाच्या लौकिकाला शोभेल असे हीन दर्जाचे होते. त्यावरून सर्वदूर टीकेची झोड उठल्यानंतर आपले ते वादग्रस्त विधान मागे घेण्याची त्यांची तर्‍हा -TARUN BHARAT


भारताचे लष्कर प्रमुख म्हणजे ‘सडक का गुंडा’असल्याचे कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे विधान, त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेला साजेल असे निलाजरे अन् कॉंग्रेस पक्षाच्या लौकिकाला शोभेल असे हीन दर्जाचे होते. त्यावरून सर्वदूर टीकेची झोड उठल्यानंतर आपले ते वादग्रस्त विधान मागे घेण्याची त्यांची तर्‍हा तर त्याहून लाजिरवाणी होती. सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणार्‍या आमच्या सैनिकांसंदर्भात मनातून राखावयाच्या आदराबाबत घरात त्यांना चार शब्दही कधी सांगितले नसावेत बहुधा कुणी. एसी हॉलमध्ये जन्म अन् त्याच वातावरणात आयुष्य घालवणार्‍यांना काय कळणार रणरणत्या उन्हात जीवावर उदार होऊन शत्रूला सामोरे जाणे काय असते ते? पण, राजकारणात वावरत असल्याने जगातल्या सर्वच विषयांवर बोलण्याचा आपल्याला आपसूकच अधिकार प्राप्त झाला असल्याचा गैरसमज करून घेत बेताल बडबडण्याची सवय जडलेले लोक भलत्या ठिकाणी, नको त्या विषयावर कसा तमाशा मांडतात, याचा प्रत्ययच परवा दीक्षितांनी आणून दिला आहे. एखाद्या दहशतवाद्याला अटक झाली की जणू काय आपल्या नातेवाईकावरच संकट कोसळल्याच्या थाटात लागलीच रस्त्यावर उतरणार्‍या, सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक करायला सरसावणार्‍या आणि आडमार्गाने दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे राहणार्‍या काश्मिरी तरुणाईविरुद्ध बोलण्याचा गुन्हा केला ना लष्कर प्रमुखांनी! पोलिसांवर दगडफेक करतात म्हणून काय झालं, आपलंच खाऊन आपल्यावरच थुंकतात म्हणून काय झालं, ‘त्यांचे’ पैसे घेऊन आपल्याशी बेईमानी करतात म्हणून काय झालं, काहीही झालं तरी यांच्या झोळीतली मतं आहेत ती. त्यांच्याविरुद्धचा एक शब्दही कसा सहन करतील ते? याच विचारात बुडालेले संदीप दीक्षित भान विसरले. स्वत:ची लायकीही विसरले अन् पातळी सोडून बरळू लागले. कुठल्याही स्पर्धेविना, वारसाहक्काने सुलभ झालेला राजकारणातला चंचुप्रवेश अन् स्वकर्तृत्वापेक्षा आईच्या प्रभावाने पक्षात लाभलेला वरदहस्त, यामुळे अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष गावीही नसलेल्या दीक्षितांना या देशाचे लष्कर प्रमुख कवडीमोल वाटणे, यात नवल ते काही नाहीच! एक काळ होता. बांगलादेशसंदर्भात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. रशिया पाठीशी असला तरी अमेरिकेच्या युद्धनौका तिकडे दूरवर सज्ज उभ्या होत्या. पाकिस्तानच्या बाजूने मैदानात उतरण्यासाठी. अशावेळी भारताने ठामपणे पाय रोवून उभे राहणे महत्त्वाचे होते. पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची भूमिका कणखर होतीच. पण, तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांनीही राजकारण बाजूला ठेवून युद्धसदृश परिस्थितीतील नेतृत्वाची धुरा इंदिरा गांधींच्या सुपूर्द केली. तेव्हाही एखाद्दुसर्‍या मुद्यावर त्यांच्यात मतभेद नसतीलच असे नाही. पण परकीयांशी लढण्याचा बाका प्रसंग पुढ्यात असताना आपसातली उणीदुणी काढण्याची ही वेळ नव्हे, एवढी समज तत्कालीन विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्ये होती. आपल्या वर्तणुकीतून त्यांनी ती सिद्धही केली. ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचे भानही त्यांना त्यावेळी राखता आले होते. नेमके तेच आज कॉंग्रेसच्या नेत्यांना समजत नाहीय्. त्यांना आपल्या लष्कर प्रमुखाचे काश्मिरी तरुणांना संबोधून केलेले विधान म्हणजे एखाद्या गावगुंडाने दिलेली धमकी वाटू लागली आहे. त्यांनी पाकिस्तानला दिलेले इशारे राजकीय वाटू लागले आहेत. बरोबर आहे! आयुष्यभर राजकारणाच्या चौकटीतच बंदिस्त राहिलेल्यांना अजून काय वेगळे दिसणार वा जाणवणार आहे? त्यामुळे सीमेवर लढणार्‍या सैनिकांना गुंडांची उपमा देताना या नेत्याला जराशीही लाज वाटली नसेल, तर त्यात आश्‍चर्य ते काय? शीला दीक्षितांच्या या सुपुत्राला कुणी तरी सांगायला हवं ना की, सीमेवर लढायला, शत्रूंशी दोन हात करायला, त्यांचे मुडदे पाडायला अन् प्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती द्यायला लागणारं काळीज, एकवेळ गुंडांजवळ असेलही, पण ते काळीज षंढांकडे कसं असणार? पण दीक्षितांना बहुतेक षंढांचीच फौज अपेक्षित असावी. सीमेवर लढायला! काहीही झालं तरी त्यांनी गुमान राहायचं. ना यांच्या घाणेरड्या राजकारणावर काही बोलायचं ना, त्यांच्या दगडफेकीवर! काश्मिरी तरुणांनी दहशतवाद्यांना साह्यभूत ठरणारी देशद्रोही भूमिका घेतली, तरी ब्र काढायचा नाही की, पाकिस्तानच्या वागणुकीवर प्रतिक्रियाही व्यक्त करायची नाही… राजकारण कशाचे करावे हेही ज्यांना धड कळत नाही, त्या संदीप दीक्षितांना अशीच ‘सेना’ अपेक्षित असावी! मुकी. आंधळी. बहिरी. यांच्या राजकारणासमोर मुकाट्यानं मान तुकवणारी! लष्कर प्रमुखांनी फक्त सीमेवर लढावे. इतर बाबतीत नाक खुपसू नये, अशी अपेक्षा असावी बहुधा दीक्षितांची. समजा बीपिन रावत यांनी यासंदर्भात पदाची मर्यादा ओलांडली असेलच, तर त्यांना समज द्यायला सरकार समर्थ आहे की! त्याही उपर अशा अधिकार्‍यांच्या वागण्या-बोलण्यासंदर्भात काही आक्षेपार्ह जाणवले असेलच तर एका विशिष्ट पद्धतीने तसे सरकारला कळविण्याचाही अधिकार, एक नागरिक म्हणून दीक्षितांना आहेच. पण तसे करून नागरिकाचे कर्तव्य पार पाडता आले तरी, प्रसिद्धी थोडीच मिळते? जे करायचे त्यातून नाव झाले पाहिजे ना राव! बहुधा त्याच हिशेबाने असल्या बेताल बडबडीचा मार्ग दीक्षितांनी स्वीकारला असावा. अपेक्षेप्रमाणे त्याला प्रसिद्धी तर मिळाली पण फजितीही तेवढीच झाली. शेवटी माफी मागायची वेळ आली. आपल्याच पक्षातील वरिष्ठांचे खडे बोल ऐकावे लागले. आणि शेवटी स्वत:चे दर्जाहीन विधान मागेही घ्यावे लागले. भारतासारख्या एका देशाचे लष्कर प्रमुख म्हणून बीपिन रावत यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मत व्यक्त करणे योग्य की अयोग्य, हा वादाचा, मतभेदाचा मुद्दा असू शकेलही कदाचित, पण म्हणून संदीप दीक्षितांची, त्या पदाचा मुलाहिजा न राखण्याची तर्‍हा समर्थनीय कशी ठरू शकेल? सेनेच्या प्रमुखाला गुंडांच्या रांगेत नेऊन बसविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची री कशी ओढता येईल? संदीप दीक्षितांचं वागणं, लष्कर प्रमुखांबद्दलची त्यांची मल्लिनाथी इथे कुणालाच रुचलेली नाही. अगदी दीक्षितांच्या पक्षाचे नेते असलेल्या राहुल गांधींना सुद्धा नाही. सर्वसामान्य नागरिकांमधूनही ‘सडक का गुंडा’ या शब्दप्रयोगावर झाली, ती सडकून टीकाच! प्रकाश जावडेकरांपासून तर किरण रिजिजूंपर्यंत सर्वांनीच धारेवर धरल्यानंतर आणि लोकभावना अतिशय संतप्त झाल्याचे बघितल्यानंतर त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. पण तसे करतानाही त्यांची माजोरी पद्धत मात्र तशीच कायम राहिली. वापरलेले अपमानजनक शब्द मागे घेऊन आपण फार मोठे उपकार करीत असल्याच्या थाटातलेच त्यांचे वागणे राहिले. ही बाब त्या बेताल बडबडीपेक्षाही अधिक आक्षेपार्ह आहे. कारण तो शब्द बोलताना चुकून तोंडून निघून गेल्याचे म्हणायला निदान वाव तरी आहे. पण नंतरची मुजोरी? ती तर जाणीवपूर्वक चालली आहे ना? त्याचे काय करायचे? स्वत: बोलून दाखवलेल्या गुंडगिरीच्या रांगेत नेऊन बसविण्याच्या लायकीचीच ही मुजोरी आहे. योग्य की अयोग्य हा प्रश्‍न बाजूला ठेवून, लष्कर प्रमुखांच्या बोलण्याचे निदान समर्थन तरी करता येईल, पण संदीप दीक्षितांची मुजोरी मात्र ठेचून काढण्याच्याच लायकीची आहे…

No comments:

Post a Comment