Total Pageviews

Saturday 10 June 2017

भारतीय अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोनेही बाहुबली कामगिरीचा परिचय देत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवण्याचेच काम केले आहे. सोमवार, ५ जून रोजी सायंकाळी ५.२८ वाजता जीएसएलव्ही मार्क-थ्रीने केलेल्या यशस्वी उड्डाणाबरोबर इस्रोच्या नावावर दोन विक्रम जमा झाले. इस्रोने आजवरच्या सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचे, सर्वाधिक वजनाच्या प्रक्षेपकासह यशस्वी उड्डाण करण्याचे आणि उपग्रह भूस्थिर कक्षेत व्यवस्थित स्थिरावण्याचे कार्य यशस्वीरीत्या पार पाडले. ६४० टन वजनाच्या या प्रक्षेपकाचे हे वजन पूर्ण वाढ झालेल्या तब्बल २०० हत्तींच्या वजनाइतके आहे.


सध्या देशभरात सर्वत्र बाहुबली या सिनेमाची चर्चा सुरू असतानाच या उड्डाणाबरोबरच आता इस्रोने क्रायोजनिक इंजिनाच्या टप्प्यामध्येही अधोरेखित करण्याजोगे यश मिळविल्याचे सिद्ध झाले आहे. चार टन वजनी उपग्रह शक्तिशालीरीत्या घेऊन उड्डाण करण्यामागे क्रायोजनिक इंजिनाचा वाटा मोठा आहे. क्रायोजनिक इंजिनामध्ये द्रवरूपातील ऑक्सिजन आणि द्रवरूप हायड्रोजनचा वापर केला जातो. या दोन्ही द्रवरूप इंधनांची साठवणूक अतिशीत वातावरणात म्हणजेच उणे १८३ ते उणे २६३ अंश सेल्सिअसमध्ये करावी लागते. त्यातून मिळणारी ऊर्जा ही नेहमीच्या उपग्रह इंधनापेक्षा अनेक पटींनी अधिक असते. अधिक पटींनी वजन उचलण्याच्या क्षमतेमागे क्रायोजनिक इंजिनाचे योगदान मोठे आहे. या यशस्वितेमुळे आता अधिक वजनी असलेल्या चांद्रयान-दोन आणि मानवी अंतराळ मोहिमांसाठीचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. वजनी उपग्रहांच्या उड्डाणासाठी आता भारताबाहेर जाण्याची गरजही यामुळे संपुष्टात आली आहे. अणुचाचणीनंतर घातलेल्या र्निबधांमुळे क्रायोजनिक इंजिनाचे तंत्रज्ञान मिळणे भारतासाठी दुरापास्त झाले होते. मात्र वैज्ञानिकांच्या स्वयंपूर्णतेच्या बळावर हे यश आता संपादन केले आहे. या प्रक्षेपकासाठी वापरण्यात आलेले क्रायोजनिक इंजिन सी-२० हे (सी २५ टप्पा) उड्डाणाच्या अंतिम टप्प्यासाठी (उपग्रह विलग होण्याआधीचा टप्पा) वापरण्यात आले. त्यानंतरच्या टप्प्यासाठी जीसॅट- १९ मधील ऊर्जेचा वापर भूस्थिर कक्षेत स्थिरावण्यासाठी करण्यात आला. हे सी- २० इंजिन विकसित करण्यासाठी २००२ सालापासून वैज्ञानिक इस्रोमध्ये सातत्याने कार्यरत होते. गेल्या काही वर्षांत त्याच्या सुमारे २०० हून अधिक चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. या टप्प्याचा दुसरा महत्त्वाचा विशेष म्हणजे आजवर जगभरात या टप्प्यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानापेक्षा भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेले तंत्रज्ञान हे कमीत कमी गुंतागुंतीचे आहे. इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी ‘नेक्स्टजनरेशन’ या रास्त शब्दांत तंत्रज्ञानातील प्रगतीचे वर्णन केले. यामध्ये इस्रोचे जेवढे यश अधोरेखित होते तेवढेच ते या क्षेत्रात कार्यरत खासगी कंपन्यांचेही आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भलीमोठी झेप घ्यायची असेल तर ती केवळ सरकारी पातळीवरील निधी उपलब्धतेने शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर आपण हे क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी मर्यादितरीत्या खुले केले होते. जीएसएलव्ही मार्क- थ्रीचे हे यश अशा प्रकारे इस्रोबरोबरच या क्षेत्रात गुंतलेल्या खासगी कंपन्यांचेही आहे. एवढे यश पदरात पाडून थांबेल ती इस्रो कसली. म्हणून की काय जीएसएलव्ही मार्क- थ्रीची तयारी एका बाजूस सुरू असताना दुसरीकडे पीएसएलव्ही सी- ३८ हा प्रक्षेपकदेखील उड्डाणासाठी सज्ज होत आहे. येत्या दीड महिन्यांत तोदेखील यशस्वीरीत्या अवकाशामध्ये झेपावेल. शिवाय येत्या पाच ते सात वर्षांत इस्रो आता मानवी मोहिमा हाती घेईल. आज इस्रोच्या या यशाचे कौतुक जगभर होत असले तरी पहिल्या खेपेत यश इस्रोला काही नेहमीच मिळालेले नाही. चांद्रयान- एक या मोहिमेला पहिल्याच फटक्यात यश मिळाले. मात्र १९७९ साली (सॅटेलाइट लाँच व्हेइकल) एसएलव्ही थ्री, १९९३ साली पोलार सॅटेलाइट लाँच व्हेइकल (पीएसएलव्ही) आणि २००१ साली जिओसिंक्रोनाइज्ड सॅटेलाइट लाँच व्हेइकलच्या (जीएसएलव्ही) पहिल्या उड्डाणाच्या वेळेस सपशेल अपयशच इस्रोच्या पदरी पडले होते. मात्र त्याने खचून न जाता इस्रोने आपले प्रयत्नांतील सातत्य कायम राखले. पीएसएलव्हीने ३९ यशस्वी उड्डाणे केलेली असली तरी जीएसएलव्हीच्या बाबतीत आलेल्या सततच्या अपयशानंतर मात्र इस्रोला जागतिक पातळीवरही हेटाळणीला सामोरे जावे लागले होते. भारतीय जीएसएलव्हीचे नामकरण या अपयशानंतर ‘जनरली सी लिवग व्हेइकल’ असे करण्यात आले होते. कारण उड्डाण अयशस्वी झाल्यानंतर तो प्रक्षेपक समुद्रात कोसळत असे. काहींनी त्याचे नामकरण खोडसाळ मुलगा (नॉटी बॉय) असेही केले होते. मात्र अपयशाच्या त्या पायऱ्यांवरूनच मार्गक्रमणा करत आता इस्रोने हा सर्वात सुरक्षित प्रक्षेपक असल्याचे सिद्ध केले आहे. पीएसएलव्ही हा भारताचा सर्वाधिक यशस्वी प्रक्षेपक असल्याने त्याच्या व्यावसायिक उड्डाणासाठी अनेक देश इस्रोची मदत घेतात. त्यातून देशाला चांगले परकीय चलनही मिळते. आता जीएसएलव्हीच्या या चार टन वजनी उड्डाणानंतर वजनी उपग्रह असलेले देश इस्रोकडे वळतील, अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास परकीय चलनाच्या गंगाजळीमध्ये चांगलीच भर पडेल. हा तब्बल १३ मजली उंचीचा प्रक्षेपक विकसित करण्यासाठी गेल्या १५ वर्षांत सुमारे ३०० कोटी रुपये खर्च आला आहे. चार टन वजनाचा उपग्रह घेऊन सहज अवकाशात झेपावणे त्यामुळे शक्य झाले आहे. भविष्यात ही क्षमता ८ टनांपर्यंत जाईल. २०१४ साली यशस्वी मंगळयानाच्या माध्यमातून इस्रोने घेतलेल्या आघाडीनंतर आता चांद्रयान- दोन आणि मानवी मोहिमांचे वेध लागले आहेत. चांद्रयान- दोन या मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरविण्यात येणार असून चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणले जाणार आहेत. मानवी अंतराळ मोहीमदेखील तेवढीच महत्त्वाकांक्षी असणार आहे. त्यासाठी इस्रोने सरकारकडे तब्बल साडेबारा हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यास सरकारने मान्यता दिली असून काही रक्कमही देऊ केली आहे. त्या माध्यमातून मानवी मोहिमांसाठी वापराव्या लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांना सुरुवातही झाली आहे. येत्या पाच ते सात वर्षांमध्ये भारतीय अंतराळवीर अवकाशवारी करून यशस्वीरीत्या परत येणे अपेक्षित आहे. अंतराळवीरांच्या सुरक्षेला या मोहिमेत सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यापूर्वीच अंतराळ कुपीचे विविध प्रयोग इस्रोने यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. एवढेच नव्हे तर या मोहिमेत महिला अंतराळवीरांचाही समावेश असल्याचे संकेत इस्रोने यापूर्वीच दिले आहेत. गुरू आणि शुक्र एवढेच नव्हे तर सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या आदित्य या मोहिमेचे कामही इस्रोमध्ये वेगात सुरू आहे. यंदाच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकूण १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण घडवून इस्रोने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. इस्रोच्या तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या खात्रीमुळेच यापूर्वी चांद्रयान- एक आणि मंगळ मोहिमेमध्ये नासा आणि युरोपिअन स्पेस एजन्सीने भारतासोबत तंत्रज्ञान सहकार्याचा करार केला होता. शिवाय त्यांची उपकरणे आपल्या यानातून धाडली होती. आता चांद्रयान- दोन मोहिमेसाठीही नासासोबत करार करण्यात आला आहे. असे असले तरी दुसरीकडे आपली स्पर्धा आहे ती एकविसाव्या शतकातील महासत्ता होऊ पाहणाऱ्या चीनसोबत. त्यामुळे चीनच्या मोहिमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मानवी मोहिमेमध्ये यश आल्यास अमेरिका, रशिया, चीनपाठोपाठ अशा मोहिमा राबविणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. भविष्यातील सुरक्षिततेसाठीही या मोहिमा अत्यावश्यक आहेत. महासत्तेची चावी थेट अंतराळातून हलविण्याचा चीनचा मनसुबा आहे. आजवरच्या त्यांच्या विविध मोहिमा, मग निकामी झालेला उपग्रह पृथ्वीवरून क्षेपणास्र डागून उद्ध्वस्त करण्याची मोहीम असेल किंवा इतर काही, चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. येत्या दोन वर्षांत आपले स्वतचे असे स्वतंत्र अंतराळ स्थानक विकसित करण्याची मनीषाही चीनने बोलून दाखविली असून त्यादृष्टीने तयारीला वेगात सुरुवात केली आहे. त्यासाठी पुढील दोन वर्षांचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यामुळे ही स्पर्धा लक्षात घेऊन इस्रोला, पर्यायाने भारताला वेगात हालचाली करणे भाग पडणार आहे. चीनचे विशेष म्हणजे एखादे उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर नियत वेळेत ते गाठणे. भारत मात्र या नेहमीच गाडी चुकलेल्या व्यक्तीसारखा खूप मागे असला तरी इस्रो आणि तेथील काम करणारे वैज्ञानिक मात्र वेळ पाळण्यात माहीर आहेत, शिवाय त्यांची विश्वासार्हताही वादातीत आहे. त्यामुळेच अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात तरी भारताची गाडी (नव्हे उपग्रह) चुकणार नाही.. अशी अपेक्षा आहे!

No comments:

Post a Comment