Total Pageviews

Sunday 26 August 2012

POLICE HOLY WAR SAMANA EDITORIAL

खाकी वर्दीचे धर्मयुद्ध!मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी डॉ. सत्यपाल सिंह यांची नियुक्ती सरकारने केली आहे. अखेर पटनायक गेले व सत्यपाल आले. पटनायक यांना जावे लागले, पण ज्या परिस्थितीत त्यांना जावे लागले ती परिस्थिती निर्माण का झाली, याचा गांभीर्याने विचार सत्यपाल सिंह यांना करावा लागणार आहे. मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांनी सूत्रे हाती घेताच जाहीर केले की, आझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने पोलिसांच्या प्रतिमेस तडा गेला आहे. पोलिसांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. हा विश्‍वास परत आणावा लागेल. प्रतिमा सुधारावी लागेल. सत्यपाल सिंह यांनी पुढे जे सांगितले ते महत्त्वाचे, ‘कठीण परिस्थितीत ही जबाबदारी आपल्यावर आली असली तरी वर्दी हाच आपला धर्म असून कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, कसलाही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल.’ सत्यपाल यांनी पोलिसी धर्माची गोष्ट सांगितली आहे व ती महत्त्वाची आहे. पण सध्या राजकारण्यांना फक्त ‘व्होट बँके’चाच धर्म माहीत असल्याने ‘त्या’ धर्मरक्षणासाठी ते पोलीस, कायदा व सत्तेचा वापर करतात. पटनायक यांच्यासारखे पोलीस अधिकारीदेखील त्या दबावाखाली येतात व त्यातूनच आझाद मैदानासारखे दंगे भडकतात. पटनायक हे काही वाईट अधिकारी नव्हते. त्यांनीही चांगली कामे केली. सामान्य पोलीस शिपायाला बळ देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अनेकदा विक्षिप्त वागत व त्यांच्या विक्षिप्तपणाच्या अनेक कथा-दंतकथा बाहेर आल्या. त्यात ढोबळे यांच्या हातात हॉकी स्टीक देऊन त्यांनी स्वत:चेच डोके फोडून घेतले! ढोबळे यांच्यामुळे खवळलेला तरुण वर्गही त्या दिवशी पटनायक यांच्या विरोधातील मोर्चात सामील झाला. रझा अकादमीच्या देशद्रोही मोर्चात तरुण माथेफिरू मुसलमान पोरे जो हैदोस घालत होती त्यांना त्या दिवशी ढोबळेछाप हॉकी स्टीकने फोडून काढले असते तर पटनायक यांची शान राहिली असती. तेथे नेमके उलटे घडले. पोलिसांनी मार खाल्ला व पटनायक बघत राहिले. कायदा व नीतिमत्तेचे पालन पटनायक यांनी काटेकोरपणे केले नाही. कृपाशंकर सिंह हे त्याचे उत्तम उदाहरण. कृपाशंकर सिंह यांच्या अनौरस संपत्तीची चौकशी करून तो अहवाल सादर करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त म्हणून पटनायक यांच्यावर सोपवली होती. पण रोझे, इफ्तार पार्टीत हे कृपाशंकर पटनायक यांच्याबरोबर व्यासपीठावर होते. त्यामुळे तपास काय व कसा झाला असेल ते सांगायलाच नको. कृपाशंकर जेथे जेथे गेले व ज्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांचा इस्कोटच झाला. त्यामुळे पटनायकांनाही जावे लागले व हा सर्व विषय आता सर्वोच्च न्यायालयासमोर येईल तेव्हा अनेक प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागतील. सगळ्यांना समान न्यायाचे तत्त्व पटनायक यांनी पाळले नाही. दंगलखोरांना त्यांना आवरता आले नाही. डॉ. सत्यपाल सिंह यांना ही सर्व प्रकरणे नीट हाताळावी लागणार आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या ठिकाणची त्यांना खडान्खडा माहिती आहे. नक्षलवादविरोधी पथकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. ते एक संयमी व सुसंस्कृत अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांची विस्कटलेली घडी दुरुस्त केली तर पोलिसांचे मनोधैर्य नक्कीच वाढेल. पोलिसांत लढण्याची जिद्द आहे. फक्त त्यांना योग्य नेतृत्व हवे. डॉ. सत्यपाल यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई पोलिसांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, पण आता मुंबई म्हणजे धर्मांधांचा व बांगलादेशींचा अड्डा म्हणून बदनाम होत आहे. पटनायक यांना बदलल्यामुळे अल्पसंख्याक कॉंग्रेसवर नाराज होतील. मुसलमानी व्होट बँक ‘मातम’ करील अशी भीती कॉंग्रेसने व्यक्त केली. ही भीती दूर करण्याची जबाबदारी नवे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी स्वत:च्या खांद्यावर घेऊ नये. पोलिसांवर हात टाकणारे व अमर जवान शिल्पास लाथा मारणारे कोणीही असू द्या. त्यांना मुळापासून उखडून टाका. हाच खाकी वर्दीचा धर्म आहे. सत्यपाल यांना या धर्मयुद्धाचे रणशिंग फुंकावेच लागेल!

No comments:

Post a Comment