Total Pageviews

Saturday 12 November 2011

PERMISSION GIVEN BY PAKISTAN TO HANG KASAB

http://www.deshdoot.com/news.php/news_details/11492
देशाच्या न्यायव्यवस्थेने शिक्षा सुनावली आहे म्हणून नाही, पण निदान पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी सांगितले म्हणून तरी कसाबला फासावर लटकवा!

पाकड्यांची ‘परवानगी’
आता तरी कसाबला फाशी द्या!
अजमल कसाब हा दहशतवादीच आहे. त्याला खुशाल फासावर लटकवा, असा सल्ला पाकिस्तानी गृहमंत्री रहमान मलिक यांनी हिंदुस्थानला दिला आहे. ‘सार्क’ परिषदेच्या निमित्ताने मालदीव येथे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ झाले आणि नंतर रहमान मलिक यांनी कसाबचा गळा खुशाल फाशीच्या दोरखंडाने आवळा असे जाहीर केले. अर्थात, मलिक यांच्या या घोषणेमुळे हिंदुस्थानने हुरळून जाण्याचे कारण नाही. कसाब हा दहशतवादीच आहे हे या पाकड्या गृहमंत्र्यांनी कशाला सांगायला हवे? ‘२६/११’चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला संपूर्ण जगाने पाहिला. त्या दहशतवाद्यांपैकीच एक कसाब आहे आणि तुकाराम ओंबळे या बहाद्दर मराठी पोलीस शिपायाने हौतात्म्य पत्करून त्याला पकडून दिले आहे. त्यामुळे जिवंत कसाबसह लष्करी कारवाईत मारले गेलेले इतरही दहशतवादीच होते हे सर्वांनाच माहीत आहे. हिंदुस्थानी न्यायालयाने कसाबला फाशी ठोठावल्याने ते सिद्धदेखील झाले आहे. तेव्हा मलिक यांनी त्यात नवीन काय सांगितले? ‘कसाब पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी आहे. त्याला खुशाल फासावर लटकवा’ असे जर त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले असते तरच पाकड्यांचे शेपूट निदान कसाबपुरते सरळ झाले असे म्हणता आले असते. मात्र ‘कसाब कुठल्या देशाचा याला काहीच अर्थ नाही’ अशी मखलाशी मलिक यांनी केली. एवढेच नव्हे तर, कसाब आणि टोळीस मुंबईवरील हल्ल्याचे प्रशिक्षण दिलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफीज सईद निर्दोष असल्याचे प्रमाणपत्रही देऊन टाकले. कसाब हा हिंदुस्थानच्या ताब्यात असल्याने त्याला दहशतवादी म्हणायचे आणि पाकिस्तानात बसून हिंदुस्थानविरोधी अतिरेक्यांचा कारखाना चालविणार्‍या सईदला मात्र निर्दोष म्हणायचे? पाकिस्तानचा हा
दुटप्पीपणा नेहमीचाच आहे. अमेरिकेने पकडलेल्या हेडलीनेही ‘२६/११’च्या हल्ल्यात पाकिस्तानी आयएसआयसह या सईदचा कसा हात होता याबद्दल सविस्तर कबुलीजबाब दिला आहे. कसाबसह सर्व अतिरेक्यांचे या सईदबरोबर सॅटेलाईट फोनद्वारे कसे संभाषण सुरू होते, सईद त्यांना कसा मार्गदर्शन करीत होता याचाही तपशील जगजाहीर आहे. तरीही पाकिस्तानी गृहमंत्री सईद याचा अतिरेकी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा एकही पुरावा नाही, असे बिनदिक्कतपणे सांगतात. कसाब दहशतवादी आणि त्याला प्रशिक्षित करणारा सईद मात्र पापभिरू धर्मगुरू असा हा दुतोंडी बनाव आहे. अर्थात, ‘सार्क’ परिषदेसारख्या जागतिक व्यासपीठाची संधी साधत पाकिस्तानी राज्यकर्ते उघडउघड असा दुतोंडीपणा करण्याचे धाडस दाखवू शकतात ते आमचे राज्यकर्ते डरपोक असल्यामुळेच. वास्तविक रहमान मलिक यांच्या तोंडावर तेथल्या तेथे सईदविरोधातील पुरावे आमच्या मंत्र्यांनी फेकून मारावयास हवे होते. कसाब हा फक्त दहशतवादी नाही तर पाकिस्तानी दहशतवादी आहे, असे खडसावून सांगायला हवे होते. पण ते राहिले बाजूला, आमच्या पंतप्रधानांनी पाक पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याशी प्रेमाच्या गुजगोष्टी केल्या. एवढेच नव्हे तर, गिलानी हे ‘शांतिदूत’ आहेत असेही प्रमाणपत्र देऊन ते मोकळे झाले. ‘मुंबईसारखे हल्ले पाकिस्तानात रोजच होत आहेत. हिंदुस्थानात ‘२६/११’ची पुनरावृत्ती होेणारच नाही, याची हमी आम्ही देऊ शकत नाही,’ असे काहीच महिन्यांपूर्वी सांगणारे गिलानी ‘शांतिदूत’ कसे होऊ शकतात? जम्मू-कश्मीरमध्ये रक्ताचे सडे घालणार्‍या अतिरेक्यांना पाकिस्तानी राज्यकर्ते ‘स्वातंत्र्यसैनिक’ अशी पदवी देतात आणि अतिरेक्यांना स्वातंत्र्यसैनिक ठरविणार्‍या पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आपले पंतप्रधान ‘शांतिदूत’ अशी उपाधी बहाल करतात, हा या
शतकातील सर्वात मोठा विनोदच म्हणायला हवा. कसाबविरुद्ध एवढे धडधडीत पुरावे असताना हिंदुस्थान सरकारने कसाबला आजतागायत जिवंत कसे ठेवले, याचे खुद्द पाकिस्तानलाही आता आश्‍चर्य वाटू लागले आहे. त्यामुळे ‘कसाबला फासावर लटकवा’ अशी भूमिका पाकिस्तानने घेतली म्हणून फार हुरळून जाण्याचे कारण नाही. पाकड्यांची नियत खरोखरच एवढी साफ असती तर मुंबईवरील हल्ल्यानंतर ‘कसाब पाकिस्तानी नाही’ असे अकांडतांडव त्यांनी केलेच नसते. ज्या नऊ अतिरेक्यांचे मुडदे पडले त्यांच्या मृतदेहांवर तरी पाकिस्तानने दावा केला काय? कसाबच्या कुटुंबीयांनी तोंड उघडू नये, मीडियाने त्याच्या गावात पाय ठेवू नये म्हणून याच गृहमंत्री रहमान मलिक यांनी कसाबच्या फरीदकोट या खेड्याला सील ठोकले होते, हे कसे विसरता येईल! कसाब पाकिस्तानी आहे अशी कबुली पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महंमद अली दुर्राणी यांनी सर्वप्रथम दिली. तेव्हा तोंडावर आपटलेल्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी दुर्राणी यांची जाहीरपणे खरडपट्टी काढली होती आणि पाकचे हेच राज्यकर्ते आपल्या शांतिप्रिय पंतप्रधानांना ‘मॅन ऑफ पीस’ वाटतात. जुने सगळे विसरून पाकिस्तानशी नव्या संबंधांचे पर्व सुरू करण्याचा मनसुबा ते व्यक्त करतात. अर्थात हे आजवरच्या कॉंग्रेजी धोरणानुसारच झाले. म्हणजे घरातही धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायच्या आणि बाहेरही पाकड्यांपुढे लोटांगणे घालायची. युद्धात जिंकायचे आणि तहात हरायचे. पाकिस्तानचा भूगोल बदलविणारा बांगलादेश मुक्तीचा पराक्रम करूनही राज्यकर्ते पाकिस्तानी राज्यकर्त्यांपुढे नेहमीच लाचारासारखे वागत आले आहेत. पाकिस्तानने आमच्या देशात अतिरेकी घुसवायचे, निरपराध्यांच्या रक्तामांसाचा चिखल करायचा. आमच्या राज्यकर्त्यांनी मात्र त्याच रक्ताचा टिळा पाकिस्तानी नेत्यांना लावायचा, पाक पंतप्रधानांना ‘शांतिदूत’ संबोधायचे. अफझलगुरू, कसाबसारख्या अतिरेक्यांना फाशी देण्याची हिंमत दाखवायची नाही. का, तर या देशातील मुस्लिम व्होट बँक बिथरेल, पाकिस्तान काय म्हणेल म्हणून. केंद्रातील कॉंग्रेस सरकारने निदान आता तरी कसाबला फासावर लटकविण्यास हरकत नाही. पाकिस्तानी गृहमंत्र्यांनीच तसे सांगितले आहे. या देशातील न्यायव्यवस्थेने शिक्षा सुनावली आहे किंवा येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत म्हणून कसाबला भले फाशी देऊ नका, पण पाकड्यांनी ‘परवानगी’ दिली म्हणून तरी त्याला फासावर लटकवा!

No comments:

Post a Comment