Total Pageviews

Thursday 3 November 2011

CAN WE FACE CHINESE DRAGON

उशिरा सुचलेले...शिरा का होईना भारत सरकारला जाग आली आणि चीनच्या सरहद्दीवर, विशेषत: पूर्वांचलाच्या सीमेवर लक्ष केंद्रित करून एक लाख सैनिक तैनात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या वर्षाच्या मार्च महिन्यातच कर्नाटकात पुत्तूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधिसभेच्या बैठकीत दोन ठराव पारित झाले होते. त्यापैकी एक ठराव चीनची आगळीक आणि आपले गाफील शासन या संदर्भात चिंता व्यक्त करणारा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे स्पंदन देशहिताच्या स्पंदनासोबत होत असते, हे दर्शविणारा हा विषय आहे. संघाबाबत असे म्हणताच कुत्सित आणि संघाचा द्वेष करणारे, लोकांचा बुद्धिभ्रम करण्यासाठी हमखास एक गुळमुळीत झालेले वाक्य फेकत असतात. ते म्हणजे- ‘देशभक्तीचा मक्ता काय फक्त संघाकडेच आहे की काय?’ असल्या सवंग, अतिशय कमी कुवतीने केलेल्या युक्तिवादाला उत्तर देण्याच्या भानगडीत संघाचे अधिकारी कधीच पडत नसतात. मात्र नियती, घटनाक्रम, अनुभव हेच अशा भंकस युक्तिवादाला सणसणीत चपराक देणारे उत्तर देत असतात. चीनच्या बाबतीत केंद्र सरकारचा आता झालेला निर्णय मार्चमध्ये संघाने केलेल्या सूचनेला, चिंतेला किती महत्त्व होते, ते सिद्ध करणारा आहे. चीनच्या बाबतीत हा विषय आजचा नाही. १९६२ च्या चीनच्या युद्धाच्या वेळचा इतिहासही हेच सांगतो. भारताचे पहिले पंतप्रधान शांततेची कबुतरे उडवीत भारताला सैन्याची गरजच काय, असा बालिश युक्तिवाद करत होते. चीनचा धोका लक्षात घेता हिंदी-चिनी भाई भाईचे गळ्यात गळे घालून सूर आळवले जात होते. त्यावेळी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी चीनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. तो मानला गेला नाही. त्यानंतर चीनने आक्रमण केले. त्यावेळी कसलाही अभिनिवेश ठेवता राष्ट्रहित सर्वोपरी या सहज भावनेने संघस्वयंसेवकांनी प्रचंड काम केले. त्याची प्रशंसा झाली.अगदी भारतीय मुत्सद्देगिरीतील शिरोमणी आर्य चाणक्याने शेजार्‍यांपासून सावध राहण्याची सूचना केली आहे. त्यानुसार चीनच्या हालचालींपासून भारताने सावध राहण्याची गरज होती. एकदा भारताचा भूभाग गिळंकृत केल्यानंतर चटावलेल्या चिनी लोकांनी पुन्हा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्यापासून ते भारताचा भूभाग आपलाच असल्याचे नकाशात दाखविण्यापर्यंत अनेक खोड्या सतत केल्या आहेत. भारतीय सीमेत घुसून अरुणाचल प्रदेशात दगडांवर चीन असे लिहून जाणे असो की लडाख भागात घुसून भारतीय सैनिकांनी उभे केलेले बंकर्स उद्ध्वस्त करण्याचा उद्दामपणा असो, अशा कितीतरी घटना सतत घडलेल्या आहेत. या घटनांबाबत प्रत्यक्ष त्या भागातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांनी बातम्या द्यायच्या आणि सरकारने मात्र असे घडल्याचे नाकारायचे, असे वारंवार घडत आले आहे. सरकारने अशा घटना नाकारून, लोकांना अंधारात ठेवून कोणाची फसवणूक केली? देशभक्तीचा मक्ता संघानेच घेतला आहे काय, असे नाक वर करून विचारणार्‍या लोकांना विचारावे वाटते की त्यांना चीनच्या आगळिकीमुळे काही मनाला धक्का बसला होता की नाही? सरकारला याबाबत काही सुचवावे, असे यांना का वाटले नाही? देशहिताच्या विषयात तोंडे शिवल्यासारखे गप्प बसायचे आणि इतरांनी मक्ता घेतला आहे काय, असा आगंतुक प्रश्‍न विचारायचा हा बुद्धिभ्रम आता यापुढे या देशात चालयचा नाही!अखेर सरकारला हालचाल करावीच लागली. चीनने त्यांच्या सरहद्दीत भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. वेगाने सैन्याच्या हालचाली करता येतील अशा प्रकारे त्या भागात दळणवळणाची साधने विकसित केली आहेत. पाकिस्तानने नेहमीच भारताच्या विरोधात आजवर उसने अवसान आणून खोडसाळ कुरघोड्या केल्या आहेत. त्यात अनेकदा चीनने पाकिस्तानला हे अवसान उसनवारीवर दिले आहे. भारताने अणुचाचणी करताच काही दिवसात पाकिस्तानने चीनप्रायोजित अणुचाचणी करायची, भारताने क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, पाकिस्तानने चीनकडून तंत्र आणि सामुग्री उसनी घेऊन क्षेपणास्त्राची चाचणी घ्यायची हे सतत घडत आले आहे. आता गेल्या काही दिवसात पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या सैन्याच्या हालचाली चालू असल्याची माहिती उघड झाली आहे. हे तर जास्तच गंभीर आहे. भारत-पाक संबंधात भारतीय संसदेने ठराव केला आहे की, काश्मीरबाबत आता एकच विवाद आहे तो, पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी परत मिळणार, हाच! असे असताना भारतातील अस्तनीतले साप भलेही काश्मीरच्या स्वायत्ततेचे ठराव करण्याचे हिरवे फूत्कार कितीही टाकोत, पण भारताच्या या अधिकृत भूमिकेत त्यामुळे बदल होण्याचे कारण नाही. असे असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी लोकांनी आपले नसलेले नाक खुपसणे जास्तच गंभीर आहे. काराकोरम महामार्गाच्या दुरुस्तीचे निमित्त करत चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपले दहा हजार सैनिक घुसविले. भारतीय सीमेत आपले सैनिक घुसवून तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा रस्ता लष्करी हेतूने तयार केला, तरी आमचे सरकार गाफीलच! जम्मू-काश्मीर भारताचा भागच नाही, असे चिनी नकाशे दाखवतात, तरीही आम्ही गप्पच! पूर्वांचलातील अतिरेकी संघटनांच्या ज्या कारवाया चालतात, त्यांनाही चीनची फूस आणि सक्रिय पाठिंबा असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अगदी चीनच्या सरकारी शस्त्र कारखान्यातून तयार झालेली शस्त्रे माओवादी आणि अन्य अतिरेकी संघटनांना मिळाली आहेत. नक्षलवाद्यांचा जो हैदोस चालू आहे, त्यांना चीनकडूनच बळ मिळते आहे. भारतात अशांत असा लाल पट्टा तयार करण्याचे कारस्थान नक्षलवाद्यांनी आखले आहे. चीनचे गोडवे गाणारे भारतातील डावे या विषयात आपले तोंड का उघडत नाहीत. चीनच्या आक्रमणाला भारतात मुक्ती सेना येत आहे, असा भंपक युक्तिवाद अजूनही यांच्या डोक्यात भरलेला आहे की काय?चीनने भारतीय बाजारपेठेवरही आपल्या कचकड्याच्या बनावट वस्तू घुसवून आक्रमण केले आहे. भारतातील उद्योगावर आणि व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. दहशतवादाच्या, प्रत्यक्ष घुसखोरीच्या, शेजारच्या शत्रूला बळ देण्याच्या, भारतीय बाजारपेठेवर आक्रमण करण्याच्या या चीनच्या कारवाया चालू असताना भारत सरकार कुंभकर्णासारख्या गाढ निद्रेत का आहे?अजूनही भारत सरकारने केवळ एक लाख सैन्य तैनात करण्याचा निर्णय पूर्णपणे घेतलेला नाही. मंत्रिमंडळाच्या सुरक्षासमितीचे शिक्कामोर्तब या निर्णयावर अजून व्हायचे आहे. जरी तो निर्णय झाला तरी ती केवळ एक निदर्शक हालचाल ठरेल. चीनच्या आक्रमणाचा मुकाबला करताना आंतरराष्ट्रीय समुदायासमोर या विषयात भारताने अतिशय आक्रमकपणे हा विषय घेऊन जाण्याची गरज होती. मात्र, भारत सरकार याबाबत बोटचेपी भूमिका का घेते आहे? भारतात होणारी शस्त्रास्त्रांची घुसखोरी, नक्षलवाद्यांनी चालविलेला नंगा नाच याला भारत सरकार का शांतपणे पहात बसले आहे. इतकेच नव्हे, तर या नक्षलवाद्यांना पाठबळ देणार्‍या व्यक्तीला तुरुंगातून सुटताच थेट सुरक्षा सल्लागार समितीत स्थान देण्याचा नतद्रष्टपणा कशाकरिता? भारतीय बाजारपेठेवरील चिनी वस्तूंचे आक्रमण रोखण्याचा विचार भारत सरकारने का केलेला नाही? असे प्रश्‍न या विषयात उपस्थित होत आहेत. भारतात कागाळ्या करण्याचे सर्व मार्ग भारत सरकारने बंद केले पाहिजेत. चीनच्या बाबतीत भारताचा चीनने गिळंकृत केलेला इंच इंच भूभाग परत मिळविण्याची ठाम भूमिका भारत सरकारने घेतली पाहिजे. चिनी सीमेवर सैन्य तैनात करून जी सुरुवात होईल, त्या पाठोपाठ चीनबाबत सडेतोड भूमिका, कठोर कृती, घुसखोरीला पायबंद, चिनी व्यापारावर नियंत्रण, पाकिस्तान-चीन या भारतद्वेषातून निर्माण झालेल्या कुटिल मैत्रीवर करडी नजर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनबाबत वारंवार आवश्यक मांडणी अशा गोष्टी भारताने केल्या पाहिजेत. त्या केल्या तरच हा लाल हैदोस थांबेल, अन्यथा मोठे संकट आपल्यासमोर उभे राहू शकते, याचा आताच विचार केला पाहिजे.

No comments:

Post a Comment