Total Pageviews

Saturday 5 November 2011

NIA PERMITS BAIL TO MALEGAON BLASTS

मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) - केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय तपास संस्थेने आज मालेगाव 2006 बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जामिनाला विरोध न करण्याची भूमिका निमूटपणे बजावली. त्यामुळे ‘मोक्का’ विशेष न्यायालयाने त्या प्रकरणातील नऊही आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.
‘मोक्का’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश वाय. डी. शिंदे यांनी त्या आरोपींना दर आठवड्याला स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले. ते नऊ आरोपी ‘सिमी’ या बंदी घातलेल्या इस्लामिक संघटनेचे सदस्य असून त्यांनीच मालेगावात बॉम्बस्फोट घडवले, असे आरोपपत्रही या प्रकरणाचा तपास केलेल्या दहशतवादविरोधी पथकाने दाखल केले होते. पण त्या आरोपींना जामिनाचा मार्ग खुला करून देण्याच्या राष्ट्रीय तपास संस्थेने बजावलेल्या भूमिकेमुळे दहशतवादविरोधी पथक आणि सीबीआयने केलेल्या तपासावर साफ पाणी फिरवले आहे.
मालेगाव 2006 बॉम्बस्फोटाचा तपास मार्च 2011 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थे (एनआयए)च्या हाती सोपविण्यात आला. दरम्यानच्या काळात मेक्का मस्जिद बॉम्बस्फोट प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध असलेल्या स्वामी असीमानंद याला झालेल्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. या स्फोटात हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा त्याने दिलेला कबुलीजबाबाच्या पार्श्‍वभूमीवर या नऊ आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती शिंदे यांच्यासमोर आज सुनावणी झाली. आरोपींची कसून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफ चाचणीही झाली आहे. आरोपींनी कुठलेही गुन्हेगारी कृत्य केल्याचे त्यातून समोर आलेले नसल्याने जामीन द्यावा, अशी विनंती बचाव पक्षाचे वकील ऍड. खालीद आझमी आणि ऍड. सुदीप पासबोला यांनी केली. नऊ आरोपींच्या अर्जाला राष्ट्रीय तपास संस्थेचा विरोध नसल्याचे सरकारी वकील ऍड. रोहिणी सालीयन यांनी सांगितले. तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. सरकारच्या या भूमिकेमुळे न्यायालयाने सर्वच्या सर्व नऊही आरोपींची पन्नास हजारांच्या जामिनावर सशर्त सुटका केली.
37 जणांचा बळी
मालेगाव येथील बडा कब्रस्थान परिसरात 8 सप्टेंबर 2006 रोजी दुपारी हा बॉम्बस्फोट झाला. त्या स्फोटात 37 जण ठार तर 100 जण जखमी झाले.
हे सुटले
नुरल हुडा समसूदोहा, शबीर अहमद मुशीउल्लाह, रईस अहमद रज्जाब अली मन्सूरी, डॉ. सलमान फारशी, डॉ. फरोघ इक्बाल अहमद मगदूम, जहिद अब्दुल मजीद अन्सारी, अबरार अहमद हमिद यांची सुटका होईल.
हे आतच राहणार
शेख महमद अली अलाम शेख आणि आशिफ खान बशीर खान यांचा 7/12 रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग असल्याने त्यांची मात्र सुटका होणार नाही.
कॉंग्रेस आघाडीचा कळवळा
मालेगाव बॉम्बस्फोटांतील नऊ आरोपींच्या सुटकेसाठी राज्यातील कॉंग्रेस आघाडीला भारी कळवळा सुटला होता. त्यातून केंद्र सरकारकडे वारंवार खेटे घातले होते. अल्पसंख्याक कामकाज मंत्री नसीम खान यांच्यापासून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष कृपाशंकर यांच्यासहित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीचे उंबरठे झिजवले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अनेकदा भेटी घेतल्या होत्या.

No comments:

Post a Comment