२१व्या शतकातील जागतिक राजकारण, वेगाने विकसित होत असलेले तंत्रज्ञान,
बदलते सामरिक समीकरण, आर्थिक परस्परावलंबित्व, माहिती क्रांती आणि उदयोन्मुख सुरक्षा
आव्हाने यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अत्यंत व्यापक आणि बहुआयामी
बनली आहे.
पूर्वी राष्ट्रीय सुरक्षेचा संबंध मुख्यतः सीमांचे संरक्षण, सैन्यशक्ती
आणि युद्ध यांच्याशी जोडला जात असे; परंतु आज राष्ट्रीय सुरक्षा ही त्यापेक्षा खूप
मोठी आणि सर्वसमावेशक संकल्पना आहे. राजकीय स्थैर्य, आर्थिक प्रगती, तांत्रिक स्वावलंबन, ऊर्जा उपलब्धता, अन्नसुरक्षा,
सायबर संरक्षण, पर्यावरणीय संतुलन आणि प्रभावी शासनव्यवस्था हे सर्व राष्ट्रीय सुरक्षेचे
अविभाज्य घटक बनले आहेत.
भारतासारख्या विशाल, लोकशाहीवादी, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक राष्ट्रासाठी
राष्ट्रीय सुरक्षा हा केवळ संरक्षण संस्थांचा विषय नाही, तर तो संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाशी
आणि भविष्यातील विकासाशी संबंधित विषय आहे.
भारताच्या सीमांवर चीन आणि पाकिस्तान यांसारखी आव्हाने आहेत; तर देशांतर्गत
दहशतवाद, अतिरेकी विचारसरणी, नक्षलवाद, सायबर गुन्हेगारी, माहिती युद्ध, संघटित गुन्हेगारी
आणि सामाजिक तणाव यांसारख्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षा
या दोन्हींचा एकात्मिक अभ्यास करणे आवश्यक बनले आहे.
"भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा" हे पुस्तक
या व्यापक विषयाचा शास्त्रीय, अभ्यासपूर्ण आणि समकालीन संदर्भात विचार करणारे महत्त्वपूर्ण
कार्य आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या एका महत्त्वपूर्ण
अंगावर प्रकाश टाकत असून, वाचकांना भारताच्या सुरक्षाविषयक धोरणांचा सखोल परिचय करून
देण्याची क्षमता ठेवते.
१. राष्ट्रीय सुरक्षा (National Security)
राष्ट्रीय सुरक्षा ही कोणत्याही राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया असते.
राष्ट्राची सार्वभौमत्व, भौगोलिक अखंडता, राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्थिरता आणि सामाजिक
एकता यांचे संरक्षण करण्यासाठी जी सर्वसमावेशक व्यवस्था उभी केली जाते, तिला राष्ट्रीय
सुरक्षा असे म्हणतात. आधुनिक काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती प्रचंड वाढली आहे.
शत्रूराष्ट्रांची लष्करी आक्रमणे रोखणे हा तिचा एक भाग असला तरी तो एकमेव घटक नाही.
या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेची ऐतिहासिक उत्क्रांती, पारंपरिक आणि
अपारंपरिक सुरक्षा संकल्पना, तसेच राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण यांचा अभ्यास अपेक्षित
आहे. आधुनिक सुरक्षा अभ्यासामध्ये आर्थिक सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा,
सायबर सुरक्षा, आरोग्य सुरक्षा आणि माहिती सुरक्षा या घटकांना वाढते महत्त्व प्राप्त
झाले आहे.
भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात , अंतर्गत सुरक्षा, सीमासुरक्षा, दहशतवादविरोधी उपाययोजना,
गुप्तचर संस्थांचे योगदान, संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रीय एकात्मता या सर्व बाबी राष्ट्रीय
सुरक्षेच्या कक्षेत येतात.
कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, ड्रोन, उपग्रह आणि माहिती
युद्धामुळे सुरक्षेचे स्वरूप मूलभूतपणे बदलत आहे. या बदलांचा परिणाम राष्ट्रीय धोरणांवर
कसा होतो आणि भविष्यातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत याचे विश्लेषण
या प्रकरणात असावे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सरकारची जबाबदारी नसून संपूर्ण राष्ट्राची
सामूहिक जबाबदारी आहे, हा या प्रकरणाचा प्रमुख संदेश असावा.
२. भारताची राष्ट्रीय शक्ती (India's National Power)
राष्ट्रीय शक्ती ही कोणत्याही राष्ट्राच्या प्रभाव, प्रतिष्ठा आणि
क्षमता यांचे समष्टी स्वरूप असते. एखादे राष्ट्र जागतिक स्तरावर किती प्रभावी भूमिका
बजावू शकते, हे त्याच्या राष्ट्रीय शक्तीवर अवलंबून असते. राष्ट्रीय शक्ती ही केवळ
सैन्यशक्तीने मोजली जात नाही; तर भूगोल, लोकसंख्या, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, संस्कृती,
नेतृत्व, राजनैतिक प्रभाव आणि राष्ट्रीय चारित्र्य अशा अनेक घटकांपासून ती निर्माण
होते.
भारताची राष्ट्रीय शक्ती अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. जगातील सर्वाधिक
लोकसंख्या, विशाल भूभाग, हिंद महासागरातील सामरिक स्थान, मोठी अर्थव्यवस्था, वैज्ञानिक
क्षमता, अवकाश संशोधनातील यश, माहिती तंत्रज्ञानातील नेतृत्व आणि लोकशाही शासनव्यवस्था
यांमुळे भारताला विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे.
या प्रकरणात हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर आणि स्मार्ट पॉवर या आधुनिक संकल्पनांचे
विश्लेषण करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती, योग, आयुर्वेद, बौद्ध वारसा, लोकशाही मूल्ये
आणि भारतीय प्रवासी समाज यांमुळे भारताची सॉफ्ट पॉवर वाढली आहे. दुसरीकडे मजबूत सशस्त्र
सेना, आण्विक क्षमता आणि तंत्रज्ञान विकास यामुळे हार्ड पॉवर मजबूत झाली आहे.
राष्ट्रीय शक्तीचे मापन, तिच्यावर परिणाम करणारे घटक, भविष्यातील आव्हाने
आणि महासत्ता म्हणून भारताची भूमिका यावर सखोल चर्चा या प्रकरणात अपेक्षित आहे. विकसित
भारत आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा राष्ट्रीय शक्तीच्या वृद्धीशी असलेला संबंध
स्पष्ट केल्यास हे प्रकरण आणखी समृद्ध होईल.
३. भारताचे परराष्ट्रीय धोरण (India’s Foreign
Policy)
परराष्ट्रीय धोरण हे राष्ट्रीय सुरक्षेचे राजनैतिक साधन आहे. राष्ट्र
आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय धोरण
स्वीकारते, त्याला परराष्ट्रीय धोरण म्हणतात. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची मुळे शांतता,
सहअस्तित्व, सामरिक स्वायत्तता, सार्वभौम समानता आणि जागतिक सहकार्य या मूल्यांमध्ये
आढळतात.
बदलत्या जागतिक परिस्थितीप्रमाणे भारताच्या परराष्ट्रीय धोरणात आवश्यक
बदल होत गेले. आज भारत बहुध्रुवीय जगातील एक महत्त्वाचा शक्तिकेंद्र म्हणून उदयास येत
आहे.
या प्रकरणात लूक ईस्ट आणि अॅक्ट ईस्ट धोरण, नेबरहूड फर्स्ट, इंडो-पॅसिफिक
रणनीती, क्वाड, ब्रिक्स, जी-२० आणि संयुक्त राष्ट्रसंघातील भारताची भूमिका यांचे विश्लेषण
केले पाहिजे.
विशेषतः चीन, अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स, इस्रायल आणि भारताचे
शेजारी देश यांच्याशी असलेले संबंध राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासले जावेत.
ऊर्जा सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान सहकार्य, संरक्षण भागीदारी आणि सामरिक सहकार्य
यांचा परराष्ट्रीय धोरणाशी असलेला संबंध स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे.
भविष्यातील परराष्ट्रीय धोरण अधिकाधिक सुरक्षा-केंद्रित, अर्थव्यवस्था-केंद्रित
आणि तंत्रज्ञान-केंद्रित कसे असेल यावरही चर्चा अपेक्षित आहे.
४. भारताचे संरक्षण धोरण (India’s Defence Policy)
राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संरक्षण धोरण ही अत्यंत महत्त्वाची
यंत्रणा आहे. संरक्षण धोरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बाह्य आक्रमणांना प्रतिबंध करणे,
राष्ट्रीय सीमांचे संरक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार युद्ध जिंकण्याची क्षमता राखणे.
भारताचे संरक्षण धोरण संभाव्य धोक्यांना प्रभावी उत्तर देण्यास सक्षम
आहे. भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुदल या तीनही दलांची भूमिका, त्यांचे आधुनिकीकरण
आणि त्यांच्यातील संयुक्त कार्यक्षमतेचा विकास हे या प्रकरणाचे महत्त्वाचे विषय आहेत.
संरक्षण व्यवस्थेतील सुधारणा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती, थिएटर
कमांड्सची संकल्पना, संयुक्त युद्धतत्त्वे आणि नेटवर्क-केंद्रित युद्ध यांचे विवेचन
आवश्यक आहे. आधुनिक युद्धामध्ये माहिती, तंत्रज्ञान आणि गुप्तचर माहिती यांचे महत्त्व
वाढले आहे.
चीनच्या सीमावर्ती आक्रमक धोरणामुळे आणि पाकिस्तानच्या छुप्या युद्धामुळे
भारताला दुहेरी सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सीमावर्ती पायाभूत
सुविधा, संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता, क्षेपणास्त्र कार्यक्रम, अंतराळ संरक्षण
आणि सायबर क्षमता यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संरक्षण उत्पादनातील स्वदेशीकरण, संरक्षण
निर्यात आणि संशोधन-विकास यांच्या माध्यमातून भारत जागतिक संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे
स्थान मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व बाबींचे विश्लेषण या प्रकरणात अपेक्षित
आहे.
५. भारताचे आण्विक धोरण (India’s Nuclear Policy)
भारताचे आण्विक धोरण हे राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग
आहे. आण्विक शस्त्रे ही युद्धासाठी नव्हे, तर युद्ध रोखण्यासाठी वापरली जाणारी प्रतिबंधक
क्षमता (Deterrence) म्हणून भारताकडून पाहिली जातात.
भारताने १९७४ मध्ये आणि त्यानंतर १९९८ मध्ये पोखरण येथे यशस्वी आण्विक
चाचण्या करून स्वतःला आण्विक शक्ती म्हणून स्थापित केले. परंतु त्यानंतर भारताने अत्यंत
संयमित आणि जबाबदार आण्विक धोरण स्वीकारले. "नो फर्स्ट यूज" आणि "विश्वसनीय
किमान प्रतिबंध"(minimum deterence) हे भारताच्या आण्विक धोरणाचे प्रमुख आधारस्तंभ
आहेत.
या प्रकरणात भारताच्या आण्विक कार्यक्रमाचा इतिहास, अणुऊर्जा विकास,
शस्त्रनियंत्रण, आण्विक सुरक्षा आणि धोरणात्मक विचार यांचा आढावा घेतला पाहिजे. आण्विक
त्रिसूत्री अर्थात स्थलाधारित, समुद्राधारित आणि आकाशाधारित प्रतिहल्ला क्षमतेमुळे
भारताची प्रतिबंधक क्षमता अधिक बळकट झाली आहे.
चीन आणि पाकिस्तानच्या आण्विक क्षमतांच्या संदर्भात भारताच्या सुरक्षा
गरजांचे विश्लेषण महत्त्वाचे ठरेल. तसेच जागतिक आण्विक व्यवस्थेमध्ये भारताची भूमिका,
एनएसजी सदस्यत्वाचा प्रश्न, अण्वस्त्र प्रसारबंदी आणि जागतिक निःशस्त्रीकरण या विषयांचा
समावेश आवश्यक आहे.
भविष्यातील सामरिक स्थैर्यासाठी जबाबदार आण्विक शक्ती म्हणून भारताची
भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
६. भारताचे सागरी धोरण (India’s Ocean Policy)
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये हिंद महासागराला अत्यंत महत्त्वाचे
स्थान आहे. भारताच्या सुमारे ७,५०० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमुळे आणि समुद्री
व्यापारावरील अवलंबनामुळे सागरी सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा मूलभूत घटक बनली आहे.
हिंद महासागर हा जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा आणि व्यापार मार्गांचा
केंद्रबिंदू आहे. भारताच्या परकीय व्यापाराचा मोठा भाग समुद्रमार्गे होतो. त्यामुळे
समुद्री मार्गांची सुरक्षा, बंदरांचे संरक्षण आणि ऊर्जा पुरवठ्याचे रक्षण आवश्यक ठरते.
या प्रकरणात SAGAR (Security and Growth for All in the Region), ब्ल्यू
इकॉनॉमी, सागरी संसाधनांचे व्यवस्थापन, किनारी सुरक्षा, सागरी गुप्तचर व्यवस्था आणि
समुद्री क्षेत्र जागरूकता यांचे विश्लेषण असावे.
२००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर किनारी सुरक्षेचे महत्त्व विशेषत्वाने
अधोरेखित झाले. समुद्री दहशतवाद, चाचेगिरी, अवैध मासेमारी, अमली पदार्थांची तस्करी
आणि मानव तस्करी यांसारख्या समस्यांनाही तितकेच महत्त्व आहे.
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील वाढती स्पर्धा, चीनची साउथ चायना समुद्रामधील
आक्रमकता, मलकाच्या समुद्रध्वनीमध्ये चीनची कमजोरता आणि हिंद महासागरातील सामरिक घडामोडी
यांच्या संदर्भात भारताचे सागरी धोरण अधिक सक्रिय आणि व्यापक होत असल्याचे या प्रकरणात
स्पष्ट केले पाहिजे.
७. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या समस्या
भारतासमोरील सुरक्षा आव्हाने विविध स्तरांवर आणि विविध स्वरूपात अस्तित्वात
आहेत. काही धोके बाह्य स्वरूपाचे आहेत, तर काही धोके देशाच्या अंतर्गत स्थैर्याशी संबंधित
आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या समस्यांचा अभ्यास हा बहुआयामी दृष्टिकोनातून
करणे आवश्यक आहे.
चीनकडून सीमांवर निर्माण होणारे तणाव, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद,
घुसखोरी, छुपे युद्ध आणि माहिती युद्ध ही प्रमुख बाह्य आव्हाने आहेत. दुसरीकडे शहरी
किंवा दिमाखी नक्षलवाद, धार्मिक कट्टरता, संघटित गुन्हेगारी आणि सामाजिक अस्थिरता या
अंतर्गत समस्या आहेत.
सायबर हल्ले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर, ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल
पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि माहितीचे शस्त्रीकरण ही नव्या युगातील गंभीर सुरक्षा
आव्हाने ठरत आहेत. तसेच हवामान बदल, जलसुरक्षा, अन्नसुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक
अस्थिरता यांसारख्या अपारंपरिक धोक्यांनाही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सैनिकी ताकदीवर आधारित राहू शकत नाही. मजबूत
अर्थव्यवस्था, तंत्रज्ञानातील स्वावलंबन, प्रभावी शासन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक
स्थैर्य आणि सक्षम पायाभूत सुविधा यांवरही सुरक्षा अवलंबून असते.
ब्रिगेडियर हेमंत महाजन, युद्ध सेवा मेडल
पुणे, डिसेंबर
2026