Total Pageviews

Monday 20 November 2017

‘इसिस’ची पहिली धडक



श्रीनगरमधील जाकुरा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून ‘इसिसने हिंदुस्थानसाठी धोक्याचीपहिली घंटा वाजवली आहेहिंदुस्थानी सुरक्षा दलांच्या धडक कारवाईत जम्मूकश्मीरमध्ये वर्षभरात शेदीडशे दहशतवादी मारले गेल्याचा आणि तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचा दावा सरकारतर्फेकेला जात आहेअशा वेळी जाकुरा येथील हल्ला ‘इसिसने हिंदुस्थानला दिलेली पहिली धडक ठरणारअसेल तर हे ‘भूत’ वेळीच बाटलीबंद करणे आवश्यक ठरेल.
अखेर ‘इसिस’च्या संकटाने जम्मू-कश्मीरला ‘धडक’ दिली आहे. श्रीनगरच्या जाकुरा येथे गेल्या शुक्रवारी झालेला दहशतवादी हल्ला आपणच केल्याचे ‘इसिस’ने जाहीर केले आहे. ‘एहमाक’ या आपल्या न्यूज एजन्सीच्या संकेतस्थळावर एक पोस्ट टाकून इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जाकुरा येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात एक पोलीस उपनिरीक्षक शहीद झाला होता, तर एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले होते. या दहशतवाद्याने इसिसचा लोगो असलेला काळय़ा रंगाचा टी शर्ट घातला होता. अर्थात तेवढय़ावरून हा हल्ला इसिसने केला असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरले असते. मात्र आता ‘इसिस’ने स्वतः या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने इसिसचा हिंदुस्थानातील पहिला हल्ला म्हणून त्याची नोंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे कालपर्यंत जी फक्त भीती किंवा धमकी समजली जात होती ती आता प्रत्यक्षात उतरली आहे असेच म्हणावे लागेल. मागील तीन-चार वर्षांपासून ‘इसिस’सारख्या भयंकर आणि क्रूर दहशतवादी संघटनेचे संकट हिंदुस्थानवर घोंघावत असल्याचे सांगितले जात होते. तशा धमक्याही दिल्या जात होत्या. ‘इसिस’चे झेंडे
जम्मूकश्मीरमध्ये
अधूनमधून फडकताना दिसत होते. चार महिन्यांपूर्वी पुलवामा जिल्ह्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी इसिसचे झेंडे फडकविले होते आणि हिंदुस्थानी लष्कराकडून खात्मा झालेल्या बुरहान वाणी या खतरनाक दहशतवाद्याचे पोस्टर झळकविले होते. हिंदुस्थानात होणारा कुंभमेळा आणि केरळमध्ये होणाऱ्या थ्रिसूर पुरम येथील धार्मिक उत्सवात युरोप-अमेरिकेप्रमाणे मोठा रक्तपात घडवू आणि तेथील अन्नात विष मिसळून शेकडो लोकांचे बळी घेऊ अशी धमकी इसिसने गेल्याच आठवडय़ात दिली होती. या धमकीचे शब्द हवेत विरत नाहीत तोच आता शुक्रवारचा जाकुरा येथील दहशतवादी हल्ला आपणच केल्याचे इसिसने अधिकृतपणे जाहीर केले आहे. इसिसचे म्हणणे गृहीत धरले तर या संघटनेचे दहशतवादी जम्मू-कश्मीरमध्ये घुसल्याचा हा पुरावाच आहे. कुंभमेळय़ात घातपात घडविण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप आणि जाकुरा येथील हल्ला केल्याची कबुली यांची सत्यता सुरक्षा यंत्रणा तपासतीलच, पण ‘इसिस’सारखी संघटना जेव्हा एखाद्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारते तेव्हा हिंदुस्थानसाठी ती नक्कीच धोक्याची घंटा ठरते. ‘इसिस’च्या
ट्रक टेररिझमने
युरोप-अमेरिकेसारख्या देशांची अत्यंत कडेकोट सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा भेदून सामूहिक रक्तपात घडवला आहे. तोच ट्रक टेररिझम आपल्या देशात त्यापेक्षा भयंकर हल्ला सहज घडवून आणू शकतो. कारण आपल्या देशात सतत कुठला तरी सण-उत्सव, धार्मिक महोत्सव, कुंभमेळा, धार्मिक यात्रा होत असतात. त्यात शेकडो-हजारो भाविक सहभागी होत असतात. शिवाय गर्दीचे व्यवस्थापन, सार्वजनिक शिस्त, खबरदारीचे उपाय, दुर्घटना घडलीच तर त्यानंतरचे आपत्ती व्यवस्थापन याबाबतीत तसा सगळाच आनंदीआनंद असतो. त्यामुळेच चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडून शे-दोनशे बळी जातच असतात. या सर्व पार्श्वभूमीवर इसिसच्या धमकीकडे पाहायला हवे. श्रीनगरमधील जाकुरा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून ‘इसिस’ने हिंदुस्थानसाठी धोक्याची पहिली घंटा वाजवली आहे. हिंदुस्थानी सुरक्षा दलांच्या धडक कारवाईत जम्मू-कश्मीरमध्ये वर्षभरात शे-दीडशे दहशतवादी मारले गेल्याचा आणि तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचा दावा सरकारतर्फे केला जात आहे. अशा वेळी जाकुरा येथील हल्ला ‘इसिस’ने हिंदुस्थानला दिलेली पहिली धडक ठरणार असेल तर हे ‘भूत’ वेळीच बाटलीबंद करणे आवश्यक ठरेल

No comments:

Post a Comment