Total Pageviews

Saturday 18 November 2017

गोपीचंदनी श्रीकांतला दुहेरीकडून एकेरीकडे वळवत नेलं. तेव्हा गोपीचंद अकॅडमीतील तीन तारे होते : सायना, कश्यप व सिंधू.

गोपीचंदनी श्रीकांतला दुहेरीकडून एकेरीकडे वळवत नेलं. तेव्हा गोपीचंद अकॅडमीतील तीन तारे होते : सायना, कश्यप व सिंधू. २००७ च्या मोसमात थायलंडच्या बुनसाक पोनसानवर त्यानं मात केली अन् त्याची दखल घेतली जाऊ लागली. त्यानंतर सात वर्षांनी पाचदा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या लिन डॅनला त्यानं पराभवाचा धक्का दिला. पण त्यापाठोपाठ ९ स्पर्धांत तो पहिल्याच फेरीत बादही झाला. पण त्याची काळजी गुरू गोपीचंदना.

असाच एक दिवस बहुधा सेवाग्राममधला. छोट्या-मोठ्या जमीनदारांनी आपल्याकडील काही जमीन आपणहून समाजाला परत करावी, असे शांततामय क्रांतीचे, भूदानाचे आवाहन करणारे आचार्य विनोबा भावे मौनव्रतात गेलेले होते. कोणी तरी सेवक- सहायकाने त्यांच्या कानी निरोप दिला की, नंदू नाटेकर आलेले आहेत. व्रतस्थ विनोबांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले : नंदू नाटेकर आले आहेत? ‘जय बॅडमिंटन’ असा प्रतिसाद त्यांनी लगेच दिला.
सुमारे १९५२ ते १९६६ असा दीड दशकाचा तो जमाना होता नंदू नाटेकरांचा. देविंदर मोहन अस्ताला जात होते. हेन्री फरेरा. जॉर्ज लुईस, त्रिलोकनाथ सेठ, अमृतलाल दिवाण, चावला, दिनेश खन्ना, दत्ता धोंगडे, सुदेश गोयल अन् गजानन हेम्माडी-मनोज गुहा, घोष बंधू, मनोहर बोपर्डीकर, बाळा उल्लाळ, दत्ता मुगवे, विक्रम भट आदी एकेरी-दुहेरीतील नामवंत बॅडमिंटनपटू त्या जमान्याचे प्रमुख मानकरी. पण त्यांचा केंद्रबिंदू नंदू नाटेकरच. सहा-सहादा एकेरीचे-दुहेरीचे राष्ट्रीय जेतेपद, तीन-चारदा एकेरी-दुहेरी जेतेपद. त्या जमान्यात वैयक्तिकरीत्या परदेशी दौऱ्यांची संधी अपवादात्मकच. मिळणाऱ्या संधीचं सोनं केलं होतं नंदू नाटेकरांच्या प्रेक्षणीय खेळानं अन्् सुसंस्कृत वागण्या-बोलण्यानं. म्हणूनच नाटेकर रूढ झालं होतं, नाटेकर म्हणजे बॅडमिंटन, चालतं-बोलतं फिरतं बॅडमिंटन!

विनोबाजींच्या त्या उत्स्फूर्त दोन शब्दांची आठवण कुणी चाहत्यानं करून दिली की आजही वयाच्या ८४ व्या वर्षी, चिरतरुण नाटेकरांचा चेहरा उजळून निघतो. किमान शब्दांत ते चाहत्यांचे ऋण नम्रतेने स्वीकारतात. “यापेक्षा या खेळानं आणखी काय द्यायला हवं?”

बॅडमिंटनचा खेळ, नाटेकरांनंतर असाच जोडला गेला, बंगळुरातील प्रकाश पदुकोणशी. आजची युवा पिढी प्रकाशचं नाव, त्याच्या कलावंत मुलीशी, दीपिका पदुकोणशी जोडणं पसंत करील. तो असेल काळाचा महिमा. पण नंदूइतकेच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे नंदूइतकेच देखणे व सुसंस्कृत अन् नंदूपेक्षाही फिट अन् नंदूंना न मिळालेल्या वैयक्तिक परदेशी स्पर्धा-सहभागाचे चीज करणारे प्रकाश आहेत. ऑल इंग्लंड विजेते, जागतिक स्पर्धा अजिंक्यपद अन् काही वर्षे जगातील अव्वल तिघांत स्थान टिकवून धरणारे बुजुर्ग. तसेच निवृत्तीनंतर प्रकाश अकॅडमीचा उपक्रम भारतात प्रथमच सुरू करणारे प्रकाश पदुकोण. मला खात्री वाटते की, रसिक विनोबाजींनीही त्यांचा नामोल्लेख होताक्षणी,‘जय बॅडमिंटन!’ असाच प्रतिसाद दिला असता.

मला असंही वाटतं की, ऑल इंडिया विजेते खेळाडू अन् त्यापेक्षाही आदर्शवत अॅकॅडमी चालवणारे गुरु पुल्लेला गोपीचंद हेही नाटेकर-पदुकोण यांचे वारसदार म्हणून, ‘जय बॅडमिंटन!’ प्रतिसादास पात्र ठरतील. अन् या त्रिमूर्तीनंतर गोपीचंद यांचा चेला किदम्बी श्रीकांत हाही (आशा करूया की, येत्या सात-आठ वर्षांतील झगमगत्या कारकीर्दीनंतर) असाच प्रतिसाद मिळवेल.

श्रीकांतचं भाग्य थोर असं की, नाटेकर-पदुकोण यांना न लाभलेला मार्गदर्शक त्याच्या नशिबी आला. नाटेकर-पदुकोण यांच्यातील उपजत प्रतिभा मुख्यत: त्यांनीच जोपासली. विशेषत: नाटेकरांना, त्यांना गोपीचंद यांच्यासारख्या कडक, शिस्तप्रिय हेडमास्तर लाभला असता तर त्या गुणवत्तेस फिटनेसची जोड मिळाली असती, तर त्यांचं यश द्विगुणीत झालं असतं. त्यांच्या काळातील मलायात (वा आजचा मलेशियन), इंडोनेशियन खेळाडूंना त्यांच्या घरी व जगात इतरत्र आव्हान देणारा भारतीय म्हणून त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरला होता. फिटनेसचं महत्त्व प्रकाशच्या मनावर बिंबवलं इंडोनेशियातील अव्वल प्रशिक्षण शिबिरानं. तसंच डेन्मार्कमधील वास्तव्यानं. पण या दोघांनाही एकच एक आदर्शवत गुरू कुठे लाभला?

गोपीचंद यांना काही काळ प्रकाशने जरूर मार्गदर्शन केलेलं आहे. हैदराबादमध्ये आरिफकडे त्यांनी घडे गिरवलेले आहेत. २००१मध्ये ऑल-इंग्लंड जेतेपद त्यांनी खेचून आणलं तेव्हाचे गुरू गांगुली प्रसाद गोपीचंद यांच्याबरोबर जरूर होते. हे सारं प्रशिक्षण-साहाय्य प्रगत वयात लाभलेलं, तेही नवनव्या तीन-चार गुरूंकडून. पण श्रीकांतला त्याच्या आई-वडिलांनी गोपीचंद यांच्याकडे ठेवले ते वयाच्या १५व्या वर्षापासून. गेली ९-१० वर्षे तो आहे एकच एक मार्गदर्शकाच्या हाताखाली. नाटेकर-पदुकोण आपापली काळजी घेत होते. पण श्रीकांतची काळजी गोपीचंद यांना! त्यांच्या खांद्यावर श्रीकांतनं आपला भार टाकला आहे. किंबहुना हा आवडता बोजा, इतर डझनभर बोजांसह, गोपीचंद यांनी मोठ्या आस्थेनं आवडीनं उचललाय!

आंध्रमधील खम्माम, विजयवाडा व त्यांच्यापाठोपाठ गुंटूर ही प्रशिक्षण केंद्रं. त्यात संस्कारित होत होते बालवयातील तेलगू बॅडमिंटनपटू. गोपीचंद यांनी सुधाकर शेट्टी यांच्या केंद्राला धावती भेट दिली, तेव्हाही त्यांच्या नजरेत भरले, डावखुऱ्या नंदगोपालने उंच उड्या मारत लगावलेले स्मॅशेस. त्यांच्या नजरेस खटकली ती नंदूचा धाकटा भाऊ श्रीकांतची निष्काळजी वृत्ती. नंदकुमार त्यांच्यासह हैदराबादला गेला, तेव्हा आई-वडिलांनीही श्रीकांतला दादा नंदकुमारसह ढकललंच. कुमार वयातील श्रीकांत, या नव्या घरातील बॅडमिंटन वर्गात रमला, तो एकेरीपेक्षा दुहेरीत, सिंगल्सपेक्षा डबल्समध्ये. विशिष्ट सिनेमांचे आकर्षण त्याला जबरदस्त जाणवू लागले. तेलगूतील ‘हॅपी डेज’ फिल्म व तिचे दिग्दर्शक शेखर कामुला यांचा तो भक्त बनला म्हणाना! त्याबाबत स्वप्ने बघू लागला. आपली फिल्म कशी असेल, कोणकोणत्या दृश्यांचे दिग्दर्शन आपण कसंकसं करू हे तो सहकारी मित्रांना सांगू लागला. त्यात झोपमोड झाली तर त्याची पर्वा ना किदम्बी श्रीकांतला ना त्याच्या नव्या घरातील मित्रांना.

श्रीकांत व त्याचे नवे सहकारी यांच्यासारख्यांच्या काही खोड्या, शिस्तभंग टिपण्याचं काम, त्यांच्या खोलीबाहेर लावलेला कॅमेरा अचूक करी. शिक्षाही ठोठावली जायची. कोर्टवर पहाटे साडेचार वाजता हजेरी लावायची अन् छोट्या छोट्या मुलांसाठी शटल्स उंच उचलत सराव. त्या पाठोपाठ आपला सराव. पहाटे साडेचार ते सकाळी साडेदहा. सहा तासांची अखंड मेहनत. गोपीचंद यांनी श्रीकांतला दुहेरीकडून एकेरीकडे वळवत नेलं. तेव्हा गोपीचंद अकॅडमीतील तीन तारे होते : सायना, कश्यप व सिंधू. २००७ च्या मोसमात थायलंडच्या बुनसाक पोनसानवर त्यानं मात केली अन् त्याची दखल घेतली जाऊ लागली. त्यानंतर सात वर्षांनी पाचदा जगज्जेतेपद पटकवणाऱ्या लिन डॅनला त्यानं पराभवाचा धक्का दिला. पण त्यापाठोपाठ ९ स्पर्धांत तो पहिल्याच फेरीत बादही झाला. पण त्याची काळजी गुरू गोपीचंद यांना. श्रीकांतच्या खेळात विजयमालिकांत सातत्य आणण्याची त्यांची व इंडोनेशियन गुरू मुलयो हंडोयो यांची कल्पक धडपड. यंदा सुपर सेरीजमधील अव्वल स्पर्धांतील चार विजेतेपदं हे तिला आलेलं फळ.

श्रीकांतच्या विकासाला ही वेळ अनुरूप आहे. लिन डॅन प्रभृतींच्या असामान्य पिढीचा अस्त होत आहे. जगातील पहिल्या २० खेळाडूंत आता आहेत चक्क पाच भारतीय! नाटेकर, पदुकोण व गोपीचंद यांच्या जमान्यापेक्षा सर्वस्वी वेगळं असं हे नवयुग. असंच ते सात-आठ वर्षे श्रीकांतने ( व भारतीयांनी) गाजवावं अन् सायना-सिंधू-श्रीकांत यांचं नाव घेताक्षणी ‘जय बॅडमिंटन!’ असा प्रतिसाद मिळावा, अशी गुलाबी स्वप्न पाहण्यास ही वेळ तरी अनुकूल दिसतेय!

No comments:

Post a Comment