Total Pageviews

Monday 22 August 2016

दहशतवादाविरोधातील ऑनलाईन लढाई-By pudhari


दहशतवादाविरोधातील ऑनलाईन लढाई-By pudhari ट्विटरने दहशतवादाला प्रोत्साहन देणारी दोन लाखांहून अधिक ट्विटर अकाऊंटस बंद केली. यावरून दहशतवादाच्या विखारी प्रचाराची प्रचिती येते. ट्विटरने हे पाऊल उचलून दहशतवादाविरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे. इंटरनेटवरही दहशतवादाविरोधात ऐक्य दिसले पाहिजे. दहशतवादाला प्रोत्साहन देणारी 2 लाख 35 हजार ट्विटर अकाऊंट्स ट्विटरने गेल्या सहा महिन्यांत बंद केली आहेत. दहशतवादाविरोधातील ऑनलाईन लढाई इतक्या आक्रमकतेने पहिल्यांदाच लढली जात आहे, हे महत्त्वाचे आहे. 2015 पासून आतापर्यंत ट्विटरने साडेतीन लाखांहून अधिक अकाऊंटस बंद केली आहेत. सोशल मीडियाने अशा प्रकारे दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक होते आणि आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी याबद्दल फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही कंपन्यांना याविषयी सजग रहायला सांगितले होते. त्याला ट्विटरने चांगला प्रतिसाद दिला आहे. इंटरनेटमुळे दहशतवादाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होतो, हे आपण अनुभवत आहोत. अगदी साध्या साध्या घटनांवरही अतिशय आक्रस्ताळी प्रतिक्रिया दिल्या जातात हेही अनेकदा पाहण्यात येते. दहशतवादाला प्रोत्साहन देणारा मजकूर असंख्य लोकांना वाहवत नेणारा असतो. ऑनलाईन प्रचारामुळे दहशतवादी गटांकडे जगभरातून भरती होत राहते आणि कितीही मुकाबला केला तरी ही लढाई कधी संपतच नाही, अशी स्थिती आतापर्यंत निर्माण झाली आहे. अर्थात ट्विटरने कठोर पाऊल उचलल्याने दहशतवादाला आळा बसेल असे नाही; पण अशा गटांचे, त्यांच्या समर्थकांचे सामाजिक आणि मानसिक खच्चीकरण जरूर होईल. अरब देशांमध्ये दहशतवादी आणि तेथील सरकारे यांच्यात घमासान युद्धच सुरू आहे आणि यात निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे; पण दहशतवादाचा धोका सार्‍या जगाला आहे. तो किती भयंकर आहे याचे प्रत्यंतर आपल्याला युरोपात अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून आले आहे. दहशतवादापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वच पातळ्यांवर त्याचा मुकाबला होण्याची आवश्यकता आहे. लाखो ट्विटर अकाऊंट्स बंद केली तरी नवी अकाऊंट्स तयार होत राहणार आणि त्यांचा बंदोबस्त केला जाणार. ट्विटरने स्पॅम फायटिंग साधनांचा वापर करून ही अकाऊंट्स बंद केली आहेत. अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून दहशतवादी आपल्या घातक विचारांचा प्रचार आणि प्रसार करताच त्याशिवाय निधी गोळा करणे, तरुणांची भरती करून घेणे, अन्य साधने जमवणे वगैरे कारवाया करत असतात. केवळ ट्विटरच नाही तर अन्य सोशल मीडिया संकेतस्थळानीही अशी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. अर्थात एवढ्याने दहशतवादाच्या मुसक्या आवळल्या जाणार नाहीत. त्यांच्या इतर ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटीजवर बंधने येणे आवश्यक आहे. इंटरनेट हे माहितीचे जाळे आहे. तेथे इतके पर्याय उपलब्ध आहेत की एक पर्याय बंद झाला म्हणून काही बिघडत नाही. अन्य अनेक पर्याय असतात. दहशतवादी संघटना त्या पर्यायांचा आपले हेतू साध्य करण्यासाठी वापर करणार आणि करतही आहेत. ट्विटरने उचललेले पाऊल हे खरे तर अगदी छोटे पाऊल आहे; पण त्याने एक सकारात्मक संदेश गेला आहे, की दहशतवादाचा मुकाबला इंटरनेटवरही करता येऊ शकतो. सध्या भले ही गती कमी असेल; पण ज्यावेळी ट्विटरप्रमाणे इतर सोशल मीडियाही दहशतवादाविरोधात प्रभावी उपाययोजना करत असल्याचे समोर येईल तेव्हा खरी ऑनलाईन लढाई सुरू होईल. दहशतवाद्यांबरोबर रणांगणावर लढणे सोपे होत असले तरी त्यांच्या अचानक हल्ले करण्याच्या तंत्रापुढे सारे जग हतबल झाले आहे. रणांगणात कितीही दहशतवादी मृत्युमुखी पडले तर संपूर्ण जगाला हादरवण्यासाठी कोणत्याही देशात गजबजलेल्या ठिकाणी एखादा स्फोट घडवून आणणे पुरेसे असते. असे काम करण्यासाठी एखादा दहशतवादी पुरेसा असतो. त्यामुळेच अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांनी कितीही हल्ले केले तरी दहशतवादी कारवाया थांबताना दिसत नाहीत. त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय या दहशतवाद्यांचे म्होरकेही कधी समोर येत नाहीत. त्यांच्याबद्दलची खरी माहिती कधी पुढे येत नाही. दहशतवादाचा मुकाबला केवळ शस्त्राने नाही तर सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर म्हणूनच करणे आवश्यक ठरले. तेथेही संपूर्ण जगाने एकत्र यायला हवे. - वैदेही बोंद्रे

No comments:

Post a Comment