Total Pageviews

Monday 3 October 2011

SHEE ANNA HAZARE & VISIT TO PAKISTAN

अण्णा, जरा याचाही विचार करा!अण्णा, आपल्यासारखेच एक देशभक्त आणि कॉंग्रेसला समर्पित महाराष्ट्राचे नेते नरहरी विष्णू गाडगीळ यांना स्वातंत्र्यानंतर सिंचनमंत्री असताना पं. नेहरूंनी नेहरी पाणी करारासाठी पाकिस्तानात पाठवले होते. अण्णा, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही गाडगीळांचे आत्मचरित्र वाचा, म्हणजे पाकिस्तानी नेत्यांनी त्यांना कशी वागणूक दिली ते तुम्हाला माहिती होईल...
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी पाकिस्तानातील एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धीला पोहोचले. अण्णांची भेट घेतल्यानंतर या शिष्टमंडळातील सदस्यांनी अण्णांना पाकिस्तानात येण्याचा आग्रह केला. अण्णांचे दिल्लीतील उपोषण यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सदस्य हिंदुस्थान दौर्‍यावर आले. त्यांनी अण्णांना विनंती केली की, आपण पाकिस्तानात येऊन तेथील भ्रष्टाचार निवारणासाठी जनतेचे नेतृत्व करावे. अण्णांनी निमंत्रण स्वीकारले आणि त्यांना पाकिस्तानात येण्याचे आश्‍वासन दिले.
अण्णा एका खेडेगावात राहात असले तरी त्यांना एवढे नक्कीच माहीत आहे की, पाकिस्तानी सरकार आपल्याला व्हिसा देणार नाही. त्यामुळे आपण पाकिस्तानात जाण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही. हिंदुस्थानी जनतेच्या अण्णांना शुभेच्छा आहेत. अण्णांनी अवश्य पाकिस्तानात जावे आणि तेथील जनतेच्या दु:खात सहभागी व्हावे. पण अण्णा, तुम्ही पाकिस्तानात प्रवेश करताच तुमच्या सवयीनुसार ‘भारतमाता की जय’ म्हणून वंदे मातरम्चा नारा देणार का? असे करण्यापासून जर रोखले गेले तर आपणास अडचणी येतील. त्यामुळे तुम्ही तेथे जाण्याऐवजी पाकिस्तानलाच येथे बोलवा!
अण्णा, तुम्ही 1965च्या युद्धात पाकिस्तानविरुद्ध सहभाग घेतला होता. ट्रक ड्रायव्हर म्हणून या युद्धात शहीद झालेल्या हिंदुस्थानी सैनिकांचे मृतदेह तुम्ही वाहिले होते. तुमच्या कपाळावर गोळी लागली होती. तुम्ही त्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला ‘पाकिस्तान्यांनी त्यावेळी आमच्यावर चढाई का केली होती?’ असे का विचारले नाही? इतक्या प्रदीर्घ काळानंतरही अण्णा, ज्या पाकिस्तान्यांचे हृदयपरिवर्तन झाले नाही, आता त्यांचे विचार बदलतील का? आमच्या देशावर ज्यांनी अन्याय केला, त्यांचे मन बदललेय का? आपल्याला निमंत्रण देणार्‍यांना याचा पश्‍चात्ताप झाल्याचे दिसले का? त्याच अत्याचारी देशात तुम्ही जाल तेव्हा तुमच्यासोबत राहिलेल्या त्या शहीद जवानांचे आत्मे काय म्हणतील? त्या शहीद जवानांना तुम्ही पाकिस्तानात श्रद्धांजली कशी अर्पण करणार?
भ्रष्टाचाराशी लढण्यापूर्वी आपणास पाकिस्तानात भ्रष्टाचारामुळे दहशतवाद आला की, दहशतवादामुळे भ्रष्टाचार आला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. सार्‍या जगाला माहीत आहे की, पाकिस्तान मृत्युशय्येवर पडलेला देश आहे. खुद्द पाकिस्तानी नेतेही हे मान्य करतात. आगामी दहा वर्षांमध्ये पाकिस्तानचे अस्तित्व राहील किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे अण्णा, त्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला मी पाकिस्तानात येण्यापेक्षा तुमच्याकडे जे थोडेफार शिल्लक राहिले आहे ते हिंदुस्थानात घेऊन या, असा आग्रह धरा. पाकिस्तानचा जन्मच मुळात भ्रष्टाचारापासून झाला आहे. जगाला माहीत आहे की, लाहोरमध्ये 60 टक्के हिंदू होते. त्यामुळे फाळणीच्या वेळी लाहोरच्या आर्यसमाजी नेत्यांनी हिंदू लोकसंख्येच्या आधारावर लाहोर हिंदुस्थानला मिळावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र विभाजन रेषा तयार करणार्‍या रेडक्लीफने 20 लाख रुपये द्यावेत आणि लाहोर घ्यावे, अशी मागणी केली. आर्यसमाजी नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांना खूप समजावले, पण काहीच फरक पडला नाही आणि आपल्या हातून लाहोर गेले.
13 ऑगस्ट 2011 च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पान क्र. 17 वर 1947 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात कोणत्या घडामोडी सुरू होत्या या संबंधी एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. त्यात ढाक्याचे 94 वर्षीय रवींद्रनाथ गुप्ता आणि कोमिलाचे 90 वर्षीय इंद्रकुमारसिंह या दोन हिंदूंची मुलाखत प्रकाशित केली आहे. विभाजनाच्या वेळी दोन्ही शहरे हिंदुबहुल होती. खुलनामध्ये तर 92 टक्के हिंदू होते. ढाका व चितगॉंगमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू होते. त्यावेळी असे निश्‍चित झाले होते की, ही दोन्ही शहरे दिल्लीच्या केंद्रीय सरकारच्या अधीन राहतील. परंतु नंतर परिस्थिती बदलली. हा निर्णय का बदलण्यात आला ही या दोघांची वेदना आहे. कदाचित विभाजन निश्‍चित करणार्‍यांचे खिसे गरम केले गेले. त्यामुळे हिंदुबहुल भाग पाकिस्तानच्या ताब्यात दिला गेला. लॉर्ड माऊंटबॅटन, मोहंमद अली जीना आणि पं. जवाहरलाल नेहरू यांनी आधी आपण फाळणीसाठी सहमत आहोत म्हणून या दस्तऐवजावर स्वाक्षर्‍या केल्या. फाळणी कशाप्रकारे होईल आणि कोणता भाग कुणाला मिळेल हे नंतर निश्‍चित केले गेले. त्यामुळे खरी गोष्ट ही आहे की, ही फाळणी अगदीच चुकीची झाली. भ्रष्ट ब्रिटिश विकले गेले आणि मुस्लिम लीगवाल्यांची चांदी झाली. त्यामुळे अण्णा, ज्या देशाचा पिंडच भ्रष्टाचारी आहे, तो आधी दुरुस्त करावा लागेल. त्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार निवारणाच्या गोळ्या त्या पाकिस्तान्यांना सेवन करण्यासाठी द्या. विभाजनावेळी इंग्रजांना भ्रष्ट करून त्यांनी राजे-महाराजे, नवाब आणि धर्मगुरूंच्या पैशातून वाट्टेल ते खरेदी केले आणि त्याला ‘पाकिस्तान’ हे नाव दिले. जो खरेदी करू शकतो तो विकूही शकतो. त्यामुळे चीनला काय-काय दिले हे कुणापासून लपून राहिलेले नाही. सद्य:परिस्थितीत चीन हिंदुस्थानी सीमांमध्ये घुसखोरी करतो आहे. पाकिस्तानला सुविधाही देत आहे आणि वाट्टेल तेवढा पैसा, हत्यारे पुरवीत आहे. अण्णा, आंदोलन तर त्या देशासाठी चालवले जाते, जो देश आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असतो. पाकिस्तानची तर मातृभूमीला विकण्याची आणि हिंदुस्थानशी शत्रुत्वामुळे ती दानामध्ये देण्याची परंपरा आहे. त्या देशासाठी चारित्र्याच्या आधारावर आंदोलन करण्यात काय अर्थ आहे? पाकिस्तानच्या दृष्टीने मातृभूमी म्हणजे जमिनीचा तुकडा आहे. म्हणून ते वंदे मातरमलाही विरोध करतात.
कोणताही हिंदुस्थानी नेता चर्चेसाठी पाकिस्तानात गेला तर त्याच्यासमोर जीना केवळ आपल्या मुंबईतील मलबार हिल येथील बंगल्याची आठवण काढत असत. आपल्या बंगल्याला कस्टोडियन प्रॉपर्टी घोषित करून हिंदुस्थानी सरकारने कब्जा करू नये, असा जीनांचा प्रयत्न असायचा. पाकिस्तानातील हिंदुस्थानचे पहिले राजदूत श्रीप्रकाश यांचे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की, आपल्या खासगी संपत्तीची चिंंता करणारे देशाची चिंता करीत नाहीत. हिंदुस्थानात भ्रष्टाचार जास्तीत जास्त धन आणि संपत्ती जमविण्याचा आहे. परंतु पाकिस्तानात भ्रष्टाचार आपल्या देशालाच विकण्याचा आहे. अखंड हिंदुस्थानवर विश्‍वास ठेवणारे आपल्या पासपोर्टवर पाकिस्तानी व्हिसाची मोहोर लावून घेत नाहीत!
- मुजफ्फर हुसेन

No comments:

Post a Comment