Total Pageviews

Tuesday 18 October 2011

GOVT CORRUPTION MAHARASHTRA

ARTICLE SAMANA
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. बी. म्हसे यांची कन्या महादेश्‍वरी म्हसे यांना ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या अधिकार्‍यांनी गेल्या आठवड्यात मुंबईतून अटक केली. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी महादेश्‍वरी म्हसे यांनी ३० लाखांची मागणी केली होती. या महादेश्‍वरी म्हसे राष्ट्रीय तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष असलेले एस.बी. म्हसे यांच्या कन्या आहेत. म्हणजे कन्येने आपल्या वडिलांची उरलीसुरली अब्रू धुळीला मिळविली. ‘न्याय विकत मिळतो. न्याय बाजूने देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केली जाते!’ असा आरोप हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा जाहीर सभेत केला होता. तो पुन्हा एकदा खरा ठरला. सत्य हे कधीतरी बाहेर येतेच. न्यायमूर्ती एस. बी. म्हसे यांच्याच दिव्याखाली अंधार होता, असे खुद्द त्यांच्याच वकील कन्येने त्यांच्या नावाने ३० लाख रुपयांची लाच स्वीकारून दाखवून दिले आहे. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात सहन्यायाधीश दर्जाचे मुंबईचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त अनिल हिंमतराव शिंगणे यांना एका महिलेकडून ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ऍण्टिकरप्शनच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. शिंगणे यांनीही पुण्यातील एका जमिनीच्या वादाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी त्या महिलेकडे ५० लाख रुपयांची लाच मागितली होती; परंतु लाचेचा पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारतानाच सहन्यायाधीशांचा दर्जा असलेले सहाय्यक धर्मादाय आयुक्त पकडले गेले आणि सारी न्यायव्यवस्था हादरून गेली. महिलांना लाच स्वीकारताना पकडण्याचा प्रकार तसा दुर्मिळच आहे आणि त्यातच उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या मुलीच्या वाट्याला असा प्रसंग यावा ही त्याहून अधिक दुर्दैवी घटना आहे.
गेल्या महिन्यात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पीएसह तिघांना मंत्रालयातच नाशिक येथील एका शाळेला विनाअनुदान तत्त्वावर आठवी व बारावीचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी मागणार्‍या शाळेच्या सचिवांकडून लाच घेताना पकडण्यात आले. मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर रोकडेही आपल्या भायखळा येथील कार्यालयात ‘रोकडे’ घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना सापडले. तरीही लाच स्वीकारण्याचे, लाच मागण्याचे प्रमाण तसूभरही कमी झालेले नाही. उलट ऍण्टिकरप्शनचे ट्रॅप आता वाढले आहेत. लोक धाडस करून तक्रार करण्यास पुढे येत आहेत. तरीही भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वागण्यात काहीच फरक पडलेला नाही. अजूनही मोक्याच्या ठिकाणी टेंडर भरूनच पोस्टिंग मिळविल्या जात आहेत. त्यामुळे टेंडरची रक्कम वसूल करण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकांचे रक्त शोषत आहेत. कुणाही शासकीय अधिकारी व कर्मचार्‍याविरुद्ध कुणीही हौसेने तक्रार करीत नाही. अति त्रास झाल्यानंतरच ऍण्टिकरप्शनची पायरी चढतात, परंतु भ्रष्टाचारी खास करून टेंडर भरून पोस्टिंग मिळविणार्‍या, राजकीय वरदहस्त असणार्‍या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वत:बद्दल फारच फाजील व खोटा आत्मविश्‍वास असतो! आपलं कोण वाकडं करणार? या भ्रमात ते असतात, परंतु आता हवेत व भ्रमात राहण्याचे दिवस राहिलेले नाहीत. शासकीय अधिकार्‍यांविरुद्ध ‘ट्रॅप’ लावण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दहा महिन्यांत मुंबई पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी येथून पुढे कुणी पोलीस लाच घेताना पकडला गेल्यास, त्याला अटक झाल्यास त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची तडकाफडकी बदली करणार आणि उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरा मारणार, असा एक नवा आदेश जारी केला आहे. एम. एन. सिंग हे पोलीस आयुक्त असताना त्यांनी दहा वर्षांपूर्वी कुणी पोलीस लाच घेताना पकडला गेल्यास वरिष्ठ निरीक्षकाच्या बदल्या करण्याचा आदेश जारी केला होता, परंतु हा आदेश जारी होऊनही मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार कमी झाला नाही. माणसांची खाण्याची, लुबाडण्याचीच वृत्ती असेल तर तुम्ही कितीही नियम, कायदे करा त्याचा काहीही उपयोग होत नाही. पैसे खाणार्‍या वृत्ती सर्वच क्षेत्रांत आहे. अधिकार पदावर माणूस आहे ना, मग तो पैसे खाणारच! म्हणूनच सार्‍या जगभरात भ्रष्टाचाराविरुद्ध आगडोंब पसरला आहे. आशिया खंडासह अमेरिका, इंग्लंड, इटली आदी संपन्न राष्ट्रांसह ८२ देशांत भ्रष्टाचाराविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली आहे. एकटे अण्णा आणि त्यांची टीम नाही. माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे म्हणतात तेच खरे आहे. भ्रष्टाचार कधीही संपणार नाही. गेंड्याची कातडी असल्यावर आणखी काय होणार?

No comments:

Post a Comment