Total Pageviews

Tuesday 25 October 2011

BULLOCKS PUNE POLICE

विद्यानगरीतले दयाळू पोलीस
ऐक्य समूह
Tuesday, October 25,

"पुणे तिथे काय उणे?' ही म्हण बहुरंगी, बहुढंगी अचाटपणामुळेच प्रचलित झाली. पुणे आणि पुणेकर हा चर्चेचा, साहित्यातल्या कथा-नाटकांचा विषय कायमचाच झाला. पु. ल. देशपांडे यांनीही पुणेकरांचे अनेक किस्से, कथा कथनातून सांगून  प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पुणेरी माणूस वाद-विवादात कधी हरत नाही. पुण्यासारखे शहर जगाच्या पाठीवर नाही, हे ठाम मत तो कधीही सोडत नाही. हे ऐतिहासिक शहर महाराष्ट्राची विद्यानगरी. भांग्या मारुतीपासून ते खुन्या मुरलीधरापर्यंत वेगळ्या नावाची मंदिरेही याच शहरात आहेत. पुणे आता विस्तारले. लोकसंख्याही वाढली. पण पुणेकरांनी आपली वैशिष्ट्ये मात्र सोडलेली नाहीत. पुण्याचा जगभर गाजणारा गणेशोत्सव, पुणेकरांच्या दारावरच्या पाट्या, पाच बाय पाचच्या दुकानाबाहेर आमची अन्यत्र कोठेही शाखा नाही, असे अभिमानाने मिरवणे हे सारे पुण्याचे वैभवच आहे, असे पुणेकरांना वाटते. याच शहरातल्या सदाशिव पेठेत समाजवादी पक्षात फाटाफूट झाल्यावर, प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब गोरे, तर संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष एस. एम. जोशी होते. एकाच पेठेत राष्ट्रीय पक्षाचे दोन अध्यक्ष हा विक्रमही पुण्यानच नोंदवला.
पुणेकर शहाणे असतातच. आता पुण्यातले पोलीसही शहाणेच असल्याचे, त्यांनी अलिकडंंच बैलाला पोलीस ठाण्यात आणून सिध्दही केलं. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत काही गणेश मंडळांनी नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सव्वा महिन्यापूर्वी संबंधितांवर गुन्हे नोंदवले होते. पोलिसांच्या त्या कारवाई विरुध्द मंडळांनी आरडाओरडाही केला. पण, कायद्याशी बांधिल असलेल्या कर्तव्यकठोर पोलिसांनी कुणाचं काही एक ऐकलं नाही. काही गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनाच्या मिरवणुकीत बैलगाड्यांचा वापर केला होता. त्या बैलांना त्रास झाल्याचा शोध विश्रामबाग पोलिसांना, या प्रकरणांची चौकशी करताना लागला. त्यांनी त्या बैलाच्या मालकासह बैलालाही पोलीस ठाण्यात आणलं.
मुका बैल काय बोलणार? आणि त्याला कशासाठी पोलीस ठाण्यात बोलावलं, याचा उलगडा काही बैलाच्या मालकाला झाला नाही. बिचारा बैल फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात उभा होता. पोलिसांनी त्याला आंजारलं गोंजायलं. त्याचं वजन, लांबी, उंची अशी मापं घेतली. या बैलाशी पोलीस काय बोलले, ते बैलाच्या मालकाला आणि लोकांना काहीच समजलं नाही. प्रसारमाध्यमांनी पोलिसांच्या या अतिशहाणपणाची मापं काढली. पुणेकर तर अशा घटनांची चर्चा करण्यात तरबेजच. पुण्यातल्या चौका-चौकात बैलाला पोलीस ठाण्यात का बोलवलं असावं? यावर विद्वान पुणेकरांनी निर्भिडपणे आपली मतंही मांडली. पण, त्याचा काही एक परिणाम   पोलिसांच्यावर झाला नाही.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बैलाच्या पाठीवर जास्त ओझं लादलं, बैलांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास झाल्यानं  ते घाबरून थरथर कापत होते. बैलांच्या मालकांनी त्यांना बेदम मारझोडही केली. बैलाने घाबरून रस्त्यातच पातळ शेण टाकलं. त्या शेणावरून घसरून सहा जण पडले, असा गुन्हा विश्रामबाग पोलिसांनी बैलाच्या मालकावर नोंदवला. बैलांचा छळ झाल्याचा निष्कर्षही पोलिसांनी काढला.
पोलिसांच्या या कारवाईवर टीका झाल्यानं मागं हटतील तर ते पुण्याचे पोलीस कसले? त्यांनी या टीकाकारांना चोख उत्तर देवून टाकलं. कायद्याप्रमाणं जनावरांना दर दोन तासांनी पाणी पाजायला हवं. त्यांना दोन तास विश्रांती द्यायला हवी, त्यांना मारहाण होता कामा नये, ही प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यातली कलमंच पोलिसांनी टिकाकारांच्या तोंडावर मारली. घाबरलेला बैल थरथर कापत असल्याचे 9 जणांचे साक्षी पुरावेही पोलिसांनी नोंदवले. बैलानं घाबरून पातळ शेण टाकल्याची ध्वनिचित्रफीतही पोलिसांनी मिळवली आणि ती पुराव्यात दाखलही केली. आपण केलेली कारवाई योग्य, कायदेशीर असल्याचा दावाही संबंधित पोलिसांनी केल्यानं या प्रकरणाचं नवं लळीत सुरु झालं.
कसबा गणपती मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द विश्रामबाग पोलिसांनी बैलाचा छळ केल्याप्रकरणी गुन्हाही नोंदवला आहे. आता या कार्यकर्त्यांवर न्यायालयात आरोपपत्रही दाखल होईल. खटल्याची सुनावणी सुरु होईल तेव्हा, बैलालाही पोलीस न्यायालयात आणायला लावतील. पोलिसांनी ठेवलेले आरोप खरे असल्याचं पुणे पोलीस त्याच्याकडून कसं वदवून घेणार? हा आता पुणेकरांच्या उत्सुकतेचा विषय झाला. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेदमंत्रांचं पठण करून घेतल्याची कथा माहिती आहे. आता पुण्याचे पोलीस बैलाला बोलायला लावतात का? हे दिसेलच!

No comments:

Post a Comment