Total Pageviews

Friday 21 October 2011

DEATH GADDAFI

राज्यकर्ता ज्या दिवशी जनतेला सत्तेखाली चिरडतो त्या दिवशी जनता त्याला कर्नल गदाफीप्रमाणे बुटाखाली तुडवते.

गदाफीच्या मौतीचा धडा!
जनतेच्या संयमाचा कडेलोट झाला तर राज्यकर्त्यांचे काय हाल होतात त्याचे उत्तम उदाहरण लिबियाच्या निमित्ताने सार्‍या जगासमोर आले आहे. लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर अल गदाफी याला गुरुवारी बंडखोर जनतेने ठार केले आणि आठ महिन्यांपासून सुरू असलेले यादवी युद्ध जिंकले. जनतेने गदाफीला नुसते ठारच केले नाही तर संतापाने धगधगणारी जनता या हुकूमशहाच्या छाताडावर नाचली. हॉलीवूडच्या थरारक युद्धपटातील दृश्यच लिबियात जिवंत झाले होते. वरून ‘नाटो’चे सैन्य हवाईहल्ले करत होते, आजूबाजूला बॉम्ब फुटत होते आणि लिबियाचा हा शहेनशाह जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळत होता. ज्या देशावर ४१ वर्षे अनभिषिक्तपणे राज्य केले त्याच देशातून परागंदा होण्याची वेळ गदाफीवर आली. सारा देशच विरोधात गेला. आश्रय द्यायला कुणीही तयार नव्हते. बॉम्बहल्ल्यातून वाचण्यासाठी कर्नल गदाफी एका पुलाखाली सिमेंटच्या पाइपमध्ये लपून बसला, मात्र बंडखोर जनतेने पाठलाग करून त्याला शोधून काढले. कर्नल गदाफीच्या मस्तकात, पायात आणि पोटात गोळ्या झाडल्यानंतरही बंडखोर सैनिकांना गदाफीची कीव आली नाही. आयुष्यभर मस्तीत जगणार्‍या कर्नल गदाफीने बंदुकीच्या जोरावर लिबियाच्या जनतेचे शोषण केले. हजारो निरपराधांची अमानुष कत्तल केली. विरोधात बोलणार्‍यांना गोळ्या घातल्या. तोच गदाफी पेटून उठलेल्या बंडखोर जनतेच्या तावडीत सापडला तेव्हा दयेची भीक मागत होता, ‘डोण्ट शूट मी’ असे आर्जव करत होता. पण संतापाने बेभान झालेल्या सैनिकांनी गोळ्या तर झाडल्याच शिवाय लिबियाच्या सत्ताधीश हुकूमशहाला बुटाखाली तुडवून त्याच्या मृत्यूचा आनंद साजरा केला.
कर्मभोग म्हणतात
ते यालाच! पापाच्या फळावर काळाने उगवलेला तो सूडच होता. गदाफीचा मुलगा मुतस्सिम आणि त्याचा सेनापती अबूबकर हेदेखील गोळीबारात ठार झाले. गदाफीचा एक मुलगा सहा महिन्यांपूर्वीच हवाईहल्ल्यात तीन लहान मुलांसह ठार झाला. गदाफीचा वारसदार असलेला सैफ अल इस्लाम हा एकमेव मुलगा आता जिवंत असून तोदेखील जीव वाचवण्यासाठी रानोमाळ भटकतो आहे. सत्तेचा माज आणि जनतेला चिरडून ऐषारामी आयुष्य जगणार्‍या गदाफी याच्या राजवटीचा असा रक्तरंजित शेवट झाला. लिबियाची जनता एकाएकी पेटून उठली आणि गदाफीविरुद्ध रस्त्यावर उतरली असे नाही. तब्बल ४१ वर्षे जनता जुलूम आणि अत्याचार सहन करत होती. ज्याने याविरुद्ध तोंड उघडले त्या प्रत्येकाला गदाफीने ठार केले. १ सप्टेंबर १९६९ रोजी लिबियाच्या सैन्यात कॅप्टन असणार्‍या गदाफीने राजे इदिस यांच्याविरुद्ध लष्करी बंड घडवून त्यांची सत्ता उलथवून टाकली. देशाची सर्व सत्ता आपल्या कुटुंबाच्या ताब्यात घेऊन गदाफी हुकूमशहा बनला. एकछत्री राजवटीविरुद्ध असंतोषाचे सूर उमटू लागले तेव्हा आपल्या राजकीय विरोधकांची धरपकड करून त्यांना मृत्युदंड देण्यात आला. एवढेच काय, देशात राजकीय चर्चा जरी कुणी केली तरी त्यास तीन वर्षे कैदेत ठेवण्याचा भयंकर कायदा आणून गदाफीने जनतेची प्रचंड मुस्कटदाबी केली. त्यामुळेच त्याच्या विरोधात जनतेच्या मनात भयंकर संताप खदखदत होता. देशात विरोधी वातावरण तापत असतानाच आंतरराष्ट्रीय जनमतही गदाफीविरुद्ध गेले होते. त्यामुळेच लिबियाच्या जनतेने उठाव केला तेव्हा ‘युनो’ने खास ठराव संमत करून बंडखोरांच्या ‘नॅशनल ट्रान्झिशनल कौन्सिल’ सरकारला मान्यता दिली. अमेरिका, फ्रान्ससह ‘नाटो’ देशांनी तर ‘लिबिया’च्या जनतेसाठी गदाफीविरुद्ध थेट युद्ध पुकारले आणि जिंकूनही दिले. देशातील जनता गरिबी, बेरोजगारी आणि विपन्नावस्थेत जगत असताना गदाफीने त्रिपोलीच्या महालात सोन्याचा डोंगरच उभा केला होता. लिबियाच्या जमिनीत पाण्यापेक्षा ‘तेल’च अधिक आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम दर्जाचे तेल श्रीमंत राष्ट्रांना विकून गदाफीने प्रचंड संपत्ती कमावली. त्यातूनच त्याला सोने खरेदीचे आणि ऐश्‍वर्यात लोळण्याचे व्यसन जडले. तेल विकायचे आणि सोन्याच्या विटा खरेदी करायचा सपाटाच त्याने लावला. थोडेथोडके नव्हे तर तब्बल १४५ टन सोने त्याने आपल्या खजिन्यात जमा करून ठेवले. नुसते सोनेच ३० हजार कोटींचे! ‘नाटो’चे हल्ले सुरू झाले तेव्हा आफ्रिकेतील एका देशात त्याने आपला हा खजिना हलवला, पण उपयोग काय! कर्नल गदाफीचे कुटुंबच यादवी युद्धात खलास झाले. शेवटी आयुष्यभर
सत्तेचा माज करून कमावलेली अफाट संपत्ती इथेच सोडून गदाफी अल्लाला ‘प्यारा’ झाला. १९८६ मध्ये अमेरिकेने केलेला पहिला हल्ला गदाफीने परतवून लावला. त्यानंतर इस्लामी दहशतवाद्यांना अमेरिकेविरुद्ध आर्थिक रसद पुरवण्याचे काम त्याने सुरू केले. अण्वस्त्रे बनवण्याची तयारीही त्याने चालवली. मात्र अमेरिकेने इराकमध्ये घुसून सद्दाम हुसेन यांची हत्या केल्यानंतर त्याने अमेरिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला होता. हिंदुस्थानपुरता विचार केला तर गदाफी हा पाकड्यांच्या प्रेमात होता. या ‘मियॉंभाईं’नी याच प्रेमापोटी कश्मीर हे स्वतंत्र राष्ट्र झाले पाहिजे असे तारेही तोडले होते. एवढेच नाही तर ‘हिंदुस्थानला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देऊ नये’ अशी थेट भूमिका ‘युनो’च्या आमसभेत त्याने मांडली. त्यामुळे या हिंदुस्थानविरोधी हुकूमशहाच्या हत्येचे आपल्या देशाने जाहीर स्वागतच करायला हवे. गदाफीच्या मृत्यूने लिबियाच्या जनतेची जुलमी राजवटीतून आता सुटका झाली आहे. इजिप्तसह अरब राष्ट्रांमध्ये वाहणार्‍या लोकशाहीच्या वार्‍यातून प्रेरणा घेत लिबियाच्या जनतेने गदाफीशाही झुगारून हा उठाव यशस्वी केला. हुकूमशहांच्या नावाने बोटे मोडणे सोपे असले तरी शेवटी तुमच्या त्या लोकशाहीतील जनतेचे राजे तरी कोणते ‘दिवे’ लावत आहेत हा प्रश्‍न उरतोच. हिंदुस्थान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शेवटी राज्यकर्ता ‘हुकूमशहा’ आहे की ‘लोकशहा’ हे महत्त्वाचे नाही. तो जोपर्यंत जनतेला सोबत घेऊन चालतो तोपर्यंत जनता त्याला डोक्यावर घेते आणि ज्या दिवशी तो जनतेला सत्तेखाली चिरडतो त्या दिवशी कर्नल गदाफीप्रमाणे त्याला बुटाखाली तुडवते. गदाफीच्या मौतीचा हाच धडा आहे

No comments:

Post a Comment