Total Pageviews

Tuesday, 18 February 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वतःला विचारा की मी देशाकरता आज काय करू शकतो

 



अनेक  थोर पुरुषांची प्रेरणा शि-वा-जी- या मंत्रात आहे,या मंत्राची प्रेरणा आज पण जरुरी आहे. आज देशा समोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. इतिहास हा गत काळाचा साक्षीदार,भावी काळाचा वाटाड्या असतो, जे राष्ट्र इतिहासा पासुन शिकत नाही ते कधीही महासत्ता बनु शकत नाही .राजांच्या असंख्य गुणांपैकी किती देशाच्या लोक प्रक्रुतीमधे उतरले हे महत्वाचेआहे.नर दुर्ग म्हणजे किल्यासारखी बुलंद,मजबुत,शुर,निष्ठावान,पराक्रमी माणसे महाराजांनी बनवली.

लढाईमध्ये सर्वांत महत्वाचा घटक सैनिक आणि त्याचे शौर्य असते. लढाई सैनिकांमुळे जिंकली जाते, प्रत्येकच लढाईमध्ये सैनिक कसे लढतात यावर हरणे आणि जिंकण्याचा फैसला होतो. शिवाजी महाराजांनी धोकेदायक परिस्थितीमध्ये सर्वात पुढे लढाई करून सैनिकांचे नेतृत्व केले आणि त्यामुळेच मराठ्यांनी त्यावेळेला महा पराक्रम गाजवला. शिवाजी महाराजांची पुढुन नेतृत्व करायची परंपरा आज सुद्धा भारतीय सैन्य चालवत आहे, ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानचा आपण धडा शिकवतो. परंतु त्याची किंमत आपल्याला आपल्या अधिकार्यांचे रक्त सांडून करावी लागते.

शिवाजी महाराज शूर होते आणि त्यांनी देशाप्रती आपली जबाबदारी निभावली. आपला इतिहास अभिमानास्पद आहे परंतु प्रश्न आज उठतो की आज आम्ही देशाकरता काय करत आहे किंवा रोजच्या जीवनामध्ये एक देशभक्त देशप्रेमी नागरिक म्हणून आम्ही देशाकरता काय करू शकतो. याविषयीचे माझे काही विचार खाली देण्यात आलेले आहेत.

 

स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?

कुठलाही देश महाशक्ती बनण्यामध्ये, देशाच्या सामान्य नागरिकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो . असे असेल तर भारतीय देशाप्रती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पणे निभावत आहे का? तर उत्तर नाही ,असे  आहे.

जबाबदार नागरिक बना

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, भडकावु पोस्ट सोशल मीडिया वरती टाकू शकतो ,त्यामुळे हिंसाचार झाला तरी पर्वा नाही.

भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्ये सुद्धा दिली आहेत. बर्याच वेळेला या कर्तव्यांकडे अनेक  दुर्लक्ष करतात.

 सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा बहुतेकांना  विसर पडतो. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं , जागा मिळेल तिथं मलमूत्र विसर्जन न करणं ,सार्वजनिक अस्वच्छता हा नवीन विषय नाही. कार मधून रस्त्यावर प्लास्टीक आणि शीतपेयांच्या बाटल्या भिरकावल्या जातात,  किनाऱ्यावर दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच असतो, हे आपल्यातलेच काही सुशिक्षित लोक करतात .परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे,आपल्याकडील कचरा सर्रास रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आपण टाकतो.येथे स्वच्छता राखा, असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर असतो. म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा आहे.

आपण इतके बेजबाबदार आहोत की काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी सरकार जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढतो. आज प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही, पण तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रुप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम अनेक पायदळी तुडवतात. आपण जबाबदार नागरिक का बनत नाही?

शहरांमधील वाहतुकीला शिस्त लावा

वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जातात, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे ,अगदी छातीटोकपणे आपल्याकडे केले जाते. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर, हेच आपले दुर्दैव आहे. वेगवेगळ्या मिरवणुका काढून शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी अजून कठीण करणे चालूच आहे.

वाहतूक पोलिसांची मजबूत फळी असावी. वाहतूक नियम तोडणार्या नागरिकांना शिक्षा द्यावी.वाहतुकीचे नियम पाळुन आपण प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलची बचत करू शकतो आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मदत करू शकतो.

हिंसक आंदोलनाचा मोठा दुष्परिणाम देशावर

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात, ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. शहरात हिंसाचार , दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले, त्यामुळे देशाचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. दिल्लीत झालेल्या तथाकथित शेतकरी आंदोलनामुळे दोन रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रेटर दिल्लीचे रोज हजारो कोटी रुपयांची नुकसान होत होते.एवढे नुकसान कुठल्याही प्रकारच्या दहशतवादामुळे झालेले नाही.

हिंसक आंदोलने हा  दहशतवादाचा प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणुन हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करुन घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे.

येत्या २०२5मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.मणिपूर मधल्या हिंसाचारामध्ये मैतेयी जमातीला कुकी जमातीचे नुकसान आणि कुकी जमातीला मैतेयी जमातीचे नुकसान भरण्यास भाग पाडले पाहिजे. टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात .हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे.

नागरिकांचा सहभाग

सामान्य माणसांनी पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे.कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय पोलिसांना ते सक्षमपणे करता येणार नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करून कायदा-सुव्यवस्था स्थिती राखली जाऊ शकते.

स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.

आपापलं काम व्यवस्थित करणं हीच देशभक्ती

 

रस्त्यावरील सिग्नल पाळणं , रस्त्यावर न थुंकणं , स्त्रियांचा आदर करणं , दिलेली वेळ पाळणं , भ्रष्टाचारास उत्तेजन न देणं ,  आपल्याआधी लोकांचा विचार, जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं , सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे.

 

मतदान करणं , योग्य उमेदवार निवडणं, ही देशभक्ती आहे,मात्र 50 टक्के भारतीय निवडणुकांमध्ये मतदान करत नाही आणि मतदान दिवस सुट्टीचा दिवस म्हणून मजा करण्यामध्ये घालवतात.

स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, वाद न घालता काम करणं ,ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं , स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं , सार्वजनिक विकास कामांना अडथळा निर्माण करून देशाचा विकास थांबवणे, सध्या जोरात सुरू आहे. स्वत:पलीकडे पाहणं आणि खरं सांगायचं तर "सुजाण नागरिक' बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे.

प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.

शिवाजी महाराजांची युद्ध पद्धती राज्यपद्धती आधुनिक भारताला आज सुद्धा योग्य मार्गावर जाण्यामध्ये मदत करू शकते..१००% शिवाजी होणे शक्य नसेल तर ४०-५०% ,२०-३० तरी शिवाजी बना.तसे झाले तरच आपण जागतिक महाशक्ती बनू शकतो.


No comments:

Post a Comment