इस्रायल इराणी तेलविहिरी तसेच तेल
शुद्धीकरण प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा विचार करीत आहे; असे म्हणतात. असे झाले तर जगाचा तोटा
होईल तो होईलच; पण भारताच्या अर्थकारणाला आणि एकूण
विकासाच्या वाटचालीला तो जबर फटका असेल.
अनेकदा
इराणकडून आयात होणाऱ्या तेलाचे प्रमाण गरजेच्या दहा टक्क्यांच्या वर असते.
रशिया-युक्रेन यांच्या संघर्षात जसे भारताने दबावाला बळी न पडता रशियाकडून तेल
घेणे थांबविले नाही,
तसेच
‘इराणकडून तेल घेऊ नका,’ हे
जागतिक दादांचे फर्मानही आपण कधी ऐकले नाही. अर्थात, इराणी तेलविहिरी उद्ध्वस्त करण्यापूर्वी
इस्रायलला दहादा विचार करावा लागेल. ताजा आखाती संघर्ष सुरू झाल्यापासून तेलाच्या
किमती एकदा तीन व एकदा दोन अशा पाच टक्क्यांनी वधारल्या आहेत. जगभर शेअर बाजारांना
हुडहुडी भरते आहे. थोडी जरी अस्थिरता आली तरी लगेच सोने वधारते. तसे होते आहे. या
साऱ्या घटनाक्रमात आधी युद्धग्रस्त इराणचे आणि नंतर इतर आखाती देशांमधील खनिज तेल
भारताला मिळाले नाही तर मोठाच अनवस्था प्रसंग उभा राहील. तशी दुश्चिन्हे दिसत
आहेत.
इराणने
इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली असतानाच इराणी बंदरांजवळ इराण आणि भारत यांच्या
नौदलांचा संयुक्त युद्धसराव सुरू झाला आहे. असे युद्धसराव अचानक होत नाहीत आणि
त्यांची तयारी अनेक महिने सुरू असली तरी आखातात संघर्ष पेटल्यानंतर भारताने हा
युद्धसराव रद्द केला नाही; हे
लक्षात घ्यावे लागेल. मोठ्या युद्धाचे काळे-कभिन्न ढग आखाती आकाशात भरून आलेले
असताना भारताच्या युद्धनौका आखातात असणे; याला अतिशय महत्त्व आहे. हा औपचारिक युद्धसराव
संपल्यानंतर इराणच्या विनंतीने किंवा स्वत:हून भारतीय युद्धनौका इराणी सागरातला
मुक्काम वाढवितात का, हे
पाहावे लागेल. इराण व इस्रायल यांच्या संवादासाठी भारत प्रयत्न करेल का, या प्रश्नावर परराष्ट्रमंत्री एस.
जयशंकर यांनी परवा होकारार्थी उत्तर दिले. मात्र, भारताला रशिया व युक्रेन यांच्या संघर्षात अशी
कोणतीही भूमिका अद्याप बजावता आलेली नाही. तेव्हा इराण व इस्रायल आपले ऐकतील, असा समज करून घेण्यात काही अर्थ नाही.
अर्थात, हा संघर्ष टळला तर जागतिक शांतीइतकाच
भारतीय अर्थकारण वाचविण्याचा प्रमुख उद्देशही साध्य होणार आहे. युक्रेन-रशिया
युद्धाचा मोठा फटका भारताला आज बसतो आहे. आखाती संघर्ष अधिक पेटला तर तो कित्येक
पटींनी वाढेल.
No comments:
Post a Comment