Total Pageviews

Saturday, 13 July 2024

अग्नीपथ’ : विशाल दृष्टीकोन ठेवून चालू केलेली परिवर्तनकारी योजना !

सरकारने सैन्यासाठी चालू केलेल्या ‘अग्नीपथ’ योजनेवर टीका केली. या पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे ? या योजनेवर होणारी टीका आणि त्याविषयीचे खंडण, तसेच या योजनेविषयी तरुणांनी दिलेले अभिप्राय

 कित्येक वर्षे सैन्यात भरती करण्याविषयीच्या योजनेमध्ये पालट करून जून २०२२ मध्ये केंद्र सरकारने ‘अग्नीपथ’ योजना लागू केली. ही योजना भूदलातील सैनिक, नौदलातील खलाशी आणि वायूदलातील एअरमन यांची भरती करण्यासाठी लागू करण्यात आली. या योजनेनुसार जे कुणी भरती केले गेले आहेत, त्यांना ‘अग्नीवीर’, असे संबोधले जाईल. प्रारंभीला वर्ष २०२२ मध्ये सरकारने ४० सहस्र अग्नीविरांची भरती करण्याचे नियोजन केले होते. कायमस्वरूपी भरती केलेले आणि अग्नीवीर यांचे अपेक्षित प्रमाण ५०ः५० होईपर्यंत अग्नीविरांच्या भरतीचे प्रमाण हळूहळू वाढवत नेले जाईल. या योजनेमुळे लष्करात भरती होणार्‍यांचे सरासरी वय ३२ वर्षांवरून २४ ते २६ वर्षे असे न्यून करता येईल, असा अंदाज केला गेला.

 

१. काय आहे अग्नीपथ योजना ? आणि योजनेतील अग्नीविरांना कोणते लाभ मिळणार आहेत ?

अ. अग्नीपथ योजनेतून भरती झालेल्यांच्या नोकरीचा कालावधी

 

४ वर्षांचा असून त्यांना ‘ग्रॅच्युइटी’ (उपदान) किंवा निवृत्ती वेतन नसेल. त्यांचा ४ वर्षांचा कालावधी संपल्यावर जे इच्छुक आहेत, त्यापैकी २५ टक्के अग्नीविरांना सैन्यात नियमित सेवेत घेतले जाईल. इतर अग्नीविरांना वेगवेगळ्या राज्यातील सरकारी संस्था किंवा राज्य पोलीस दल यांमध्ये नोकरी मिळण्यास प्राधान्य दिले जाईल. केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्स यामध्ये १० टक्के जागा अग्नीविरांसाठी राखीव ठेवल्या जातील. गृह विभाग आणि संरक्षण खाते यांमध्येही अग्नीविरांसाठी १० टक्के जागा राखीव असतील.

 

 

आ. या योजनेखाली नावनोंदणी करण्यासाठीचे वय १७ वर्षे ५ मास ते २१ वर्षे असेल. ही भरती सर्व प्रकारच्या श्रेणीसाठी अखिल भारतीय स्तरावर केली जाईल. अग्नीवीर म्हणून भरती होऊ इच्छिणार्‍यांची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण अशी असेल. याखेरीज त्यांना ठरवण्यात आलेली शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध करावी लागेल.

 

इ. भरतीच्या वेळी अग्नीवीर अविवाहित असले पाहिजेत. त्यानंतर त्यांच्या ४ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत त्यांना विवाह करण्याची अनुमती दिली जाणार नाही.

 

ई. अग्नीविरांना पहिल्या वर्षात प्रतिमास एकूण वेतन ३० सहस्र रुपये दिले जाईल आणि नंतर हळूहळू त्यात वाढ होऊन चौथ्या वर्षापर्यंत वेतन ४० सहस्र रुपये असेल. याखेरीज त्यांना सर्व अधिकृत भत्ते मिळतील.

 

उ. नोकरीच्या कालावधीत अग्नीविरांना देण्यात येणार्‍या वेतनापैकी ३० टक्के वेतन सेवा निधी फंडामध्ये जमा केले जाईल. केंद्र सरकारही तेवढीच रक्कम या फंडामध्ये जमा करील. ४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अग्नीविरांना करविरहित १० लाख ४ सहस्र इतकी रक्कम आणि त्यावरील व्याजही मिळेल. (एकूण रक्कम ११ लाख ७१ सहस्र रुपये होईल.)

 

ऊ. सर्व अग्नीविरांना ‘अग्नीवीर प्रशिक्षित’ प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्रामध्ये त्या अग्नीविराने मिळवलेली योग्यता आणि त्याने प्राप्त केलेली कौशल्ये यांचा उल्लेख करण्यात येईल. जे १० वी इयत्ता उत्तीर्ण होऊन या सेवेत रूजू होतील, त्यांना नंतर १२ वी उत्तीर्ण झाल्याचे प्रशस्तीपत्रक दिले जाईल.

 

ए. अग्नीवीर जर युद्धामध्ये मरण पावला, तर ४८ लाख रुपये विनासहयोगी विमा, ‘एक्स ग्रॅटीआ’ म्हणून ४४ लाख रुपये आणि त्याची सेवा निधीतील रक्कम असे मिळून एकूण १ कोटी रुपये त्याच्या कुटुंबियांना दिले जातील.

 

 

२. ‘अग्नीपथ’ योजनेविषयी केली जाणारी टीका आणि त्यावरील खंडण

या योजनेविषयी अप्रसन्नता व्यक्त करणे आणि त्यावर टीका करणे, हे नेहमीचे आहे. विशेषतः नेहमी विरोध करणारे आणि समीक्षण करणारे टीका करतील. सद्यःस्थितीत यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. ‘अग्नीपथ’ योजनेविषयी जी टीका होत आहे, त्या सूत्रांविषयीची चर्चा येथे केली आहे.

 

२ अ. टीका : अग्नीविरांना सेवा वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन आयुष्य प्रारंभ करणे आव्हान होणार ! : पहिली टीका, म्हणजे ४ वर्षांचा अल्प कालावधी हा योजनेचा निराशाजनक पैलू आहे. वर्ष १९६५ पूर्वी सैनिक म्हणून सेवा करण्याचा किमान कालावधी ७ वर्षांचा होता आणि त्यापैकी दोन तृतीयांश सैनिक हे निवृत्तीवेतनाविना निवृत्त होत असत. असे निवृत्त झालेले सैनिक आपल्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी शेतीकडे किंवा अन्य व्यवसायाकडे वळले. त्यांच्यासाठी जीवन जगणे कठीण झाले; कारण बहुतांश जण अल्पशिक्षित होते आणि २७ ते ३० वर्षे वय असतांना नवे आयुष्य प्रारंभ करणे त्यांच्यासाठी एक आव्हान होते.

 

खंडण : सेवा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अग्नीविरांना नोकरी / व्यवसाय यांच्या नवीन संधी उपलब्ध : या तुलनेत अग्नीवीर म्हणून सेवेत रूजू झालेले तुलनात्मक दृष्टीने अल्पवयात, म्हणजे २५ व्या वर्षी आपली सेवा पूर्ण करतील. विवाहित नसल्याने त्यांना कुटुंबियांचे उत्तरदायित्व अल्प प्रमाणात असेल. त्यापैकी २५ टक्के जणांना लष्करात सामावून घेतले जाईल, तर उर्वरितांना सरकारी संस्थांमध्ये नोकरी मिळवण्यास संधी उपलब्ध होईल. खासगी क्षेत्रामधील आस्थापनांनीही ‘अग्नीविरांना प्राधान्य दिले जाईल’, असे घोषित केले आहे. त्यामुळे दुसर्‍यांदा कोणता व्यवसाय करू ? हा प्रश्न नसेल. याखेरीज सर्व अग्नीविरांना १२ वी उत्तीर्ण झाल्याविषयीचे प्रशस्तीपत्रक मिळेल. अतिरिक्त कौशल्य प्राप्त करण्यासाठी ते ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींग’ यांनी घोषित केलेल्या विशेष अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू शकतील. ज्यांना उद्योजक व्हायचे असेल, ते आपल्या सेवा निधीमधील ११ लाख ७१ सहस्र या रकमेतून एखादा उद्योग चालू करू शकतील. त्यांच्या उद्योगांना सरकार साहाय्य करील.

 

२ आ. टीका : नियमित सैनिकांपेक्षा न्यून निधी मिळण्याची भीती : अनेक जणांनी म्हटले आहे की, अग्नीवीर म्हणून युद्धात मरण पावणार्‍याला नियमित सेवेतील सैनिकांपेक्षा न्यून प्रमाणात निधी मिळेल.

 

खंडण : प्रत्यक्षात अग्नीविरांना भरघोस निधी मिळणे : त्यांना अल्प प्रमाणात निधी मिळेल, हे मान्य आहे; परंतु या दोघांच्या नोकरीतील अटी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. तरीही अग्नीविरांसाठी १ कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ (निधी योजना) आहे. अलीकडेच हुतात्मा झालेल्या अशोक लक्ष्मण गवाटे याच्या कुटुंबियांना लष्करातील कल्याण निधीतील रक्कम धरून एकूण १ कोटी ३ लाख रुपये मिळाले. याखेरीज त्याच्या नोकरीचा ४ वर्षांचा कालावधी संपेपर्यंत त्याचे पूर्ण वेतन मिळणार आहे. निवृत्त सैनिकाला मिळणार्‍या सवलतींचा विचार करता ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड्’ अधिकार्‍यांनाही अशी सवलत मिळत नाही.

 

२ इ. टीका : अग्नीविरांना बंदुकीचे प्रशिक्षण मिळाल्याने ते पुढे समाज अन् राष्ट्र यांसाठी धोका ठरण्याची भीती : अग्नीवीर म्हणून नोकरीनंतर पुढे कायमस्वरूपी न झालेले अग्नीवीर असंतुष्ट रहातील आणि त्यांना बंदुका वापरण्याचे चांगले प्रशिक्षण असल्याने ते समाज अन् राष्ट्र यांसाठी धोका ठरतील, अशा प्रकारची भीती व्यक्त केली जात आहे.

 

खंडण : अग्नीविरांमध्ये शिस्त आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते ! : लष्करातील प्रशिक्षणात प्रत्येक सैनिकामध्ये शिस्त आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होत असते. त्यामुळे असे प्रशिक्षण घेतलेले अग्नीवीर समाज आणि देश यांसाठी धोकादायक ठरणार नाहीत. यापूर्वी ७ वर्षे नोकरी झाल्यानंतर ज्या सैनिकांना सेवेतून मुक्त केले, त्यांनी देशातील नागरिकांना धमक्या देण्यासाठी कधीही बंदूक उचलली नाही. एखादा सैनिक (अग्नीवीर किंवा दुसरा कुणी) देशाला हानी पोचवण्यासाठी आपल्या प्रशिक्षणाचा दुरुपयोग करील, हे कल्पनेच्याही पलीकडे आहे. वरवर पहाता असे संशय घेणार्‍यांना लष्करातील नोकरीचा मानवी मनावर होणार्‍या परिणामाविषयी जाणीव नाही.

No comments:

Post a Comment