Total Pageviews

Saturday 24 June 2023

#मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी #सैन्याच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन जरूर...

लेफ्टनंट जनरल एल एन सिंग यांचे ट्विट 
मणिपूरमध्ये गेल्या ६ आठवड्यापासून हिंसाचार सुरू आहे .रोज घरे जाळली जातात, रस्ते बंद केले जातात, राजकीय पक्ष ,मंत्री आमदार, खासदार यांची घरे जाळली जाता,एक जमात दुसर्या जमातीवर हल्ले करते .परवा एक घटना घडली, ज्यामध्ये मणिपूर मधले रिटायर्ड लेफ्टनंट जनरल एल एन सिंग यांनी सोशल मीडिया वरती ट्विट केले की, मणिपूरची परिस्थिती हिंसाचारामुळे सीरिया, लिबिया किंवा अफगाणिस्तान सारखी झाली आहे. कोणीही कोणालाही मारतो आहे. मी एक रिटायर सैनिकी अधिकारी आहे, इथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती मी माझ्या आयुष्यात कधीही बघितलेली नव्हती. मणिपूर मध्ये फक्त जंगल राज्य काम करत आहे .आमच्या वेदना कोणी समजू शकेल का ?
जनरल एल एन सिंग हे भारतीय सैन्याच्या मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये 40 वर्षाहून जास्त कार्यरत होते . ते भारतीय सैन्याच्या पुण्यामध्ये असलेल्या इंटेलिजन्स स्कूलचे कमांडान्ट होते, म्हणजे गुप्तहेर माहिती कशी काढायची, त्याची त्यांना चांगले माहीती आहे.त्यामुळे मणिपूरमध्ये सध्या नेमके काय चालले आहे हे त्यांना चांगले माहित आहे. ते मणिपूर मध्ये राहात आहेत .त्यांनी केलेले ट्विट भारताचे कारगिल युध्दाच्या वेळेचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मलिक यांनी बघितले आणि ते पण म्हणाले की देशाने मणिपुरकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे .मणिपूर मधुन आज 300 हून जास्त सैनिकी अधिकारी सैन्यात कार्यरत आहेत, त्यामधले अजून दुसरे लेफ्टनंट जनरल के एच सिंग यांनी सुद्धा परिस्थिती अतिशय गंभीर आहे, यावर भाष्य करुन उपाय सुचवले आहेत. ते सुद्धा मणिपूरची राजधानी इम्फालमध्ये राहतात आणि त्यांची पत्नी एक महाराष्ट्रीयन महिला आहे. 
सर्वात महत्त्वाचे अराजकता, हिंसाचार थांबवणे 
मणिपूर विषयावरती गेल्या महिन्याभरात अनेक लेख लिहिण्यात आलेले आहे. या लेखांमध्ये मणिपूरच्या मैतेयी, कुकी आणि नागांमध्ये चालू असलेला वाद, त्याची विविध कारणे यावरती लिहिण्यात आलेले आहेत .अनेक टीव्ही चॅनेल वरती सल्ले देण्यात येत आहे की इथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. परंतु जो मुख्य मुद्दा अनेकांना कळत नाही, तो म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे , तिथे असलेली अराजकता, हिंसाचार थांबवणे . देशाची एकच संस्था परिस्थिती पूर्ण पदावर आणू शकते, ती म्हणजे भारतीय सैन्य. 
सुरक्षा दले नेमकी परिस्थिती 
अनेक सुरक्षा दले मणिपूरमध्ये आहेत, त्यांची सध्या नेमकी परिस्थिती काय आहे? मणिपूर पोलीस आणि मणिपूर रायफल म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेलं स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, यांनी आपल्याकडे असलेली चार ते पाच हजार हत्यारे रायफल न लढता अराजकिय तत्वांना देऊन टाकली.मणिपूर पोलिसांवरती तिथल्या जनतेचा फारसा विश्वास नाही .अनेक पोलीस आपल्या जाती जमाती प्रमाणे आपापल्या समूहांना मदत करताना/ यांच्याबरोबर हिंसाचार करताना पकडले गेले आहेत. पोलीस नेतृत्व कंट्रोल रूमच्या बाहेर जायला तयार नाही.मोठ्या संख्येने जी अर्थ सैनिक दले आणि सैन्य मणिपूर मध्ये आले आहे त्यांचा योग्य उपयोग आक्रमक कारवाई करतात होत नाही. धोकेदायक परिस्थितीमध्ये पोलिसांचे नेतृत्व एखाद्या हवालदार पोलीस करत आहे.
आपली हत्यारे शत्रूला दिल्याची एक सुध्दा घटना गेल्या पन्नास वर्षांमध्ये सैन्याच्या बाबतीत घडलेली नाही.चार मे नंतर भारतीय सैन्याच्या दोन डिव्हिजन्स आणि आसाम रायफल मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले.आसाम रायफल हे एक पॅरामिलिटरी फोर्स दल आहे, मात्र याचे अधिकारी फक्त भारतीय सैन्या मधले असतात. त्यामुळे या दोन दलांमध्ये चांगले कोऑर्डिनेशन असते.आज तिथे सैन्याचे आणि आसाम रायफलचे मिळून 148 कॉलम्स आहेत.एक कॉलम एका कंपनीच्या ताकदीचा असतो. ऐंशी ते शंभर सैनिक दोन किंवा तीन ऑफिसर्सच्या नेतृत्वाखाली कॉलम मध्ये काम करतात.
मणिपूरमध्ये झालेल्या सिझफ़ायर करारामुळे शरणागती पत्करलेल्या अनेक बंडखोर गटांना त्यांच्या शस्त्रां बरोबर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे,ज्या वरती सी्झ फायर मॉनिटरीग ग्रुपचे लक्ष असते. तिथून अनेक शस्त्र गायब झाली आहेत.म्यानमारमधुन शस्त्रे आणि दारूगोळा येत आहे,त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांकडे शस्त्र आणि दारुगोळा यांचा मोठा साठा आहे.कुकी आणि मैत्री जमातीमध्ये एकमेकाविषयी एवढा द्वेष आहे की ते रोज एकमेकांवरती हल्ले करून हिंसाचार वाढवत आहे .रोज हेच बघितले जाते की की कुठली जमात जास्त हिंसाचार करू शकते?मणिपुरी युवक स्वभावता आक्रमक असतात, चांगले सैनिक बनू शकतात, परंतु सध्या त्यांची  शक्ती एकमेकांना मारण्यावरती खर्च केली जात आहे. हिंसाचारामध्ये अनेक महिला सुद्धा सामील आहेत .या महिला गटांनी आणि अनेक संघटनांनी आसाम रायफलच्या कंपनी बेसेसना अनेक ठिकाणी वेढा घातला आहे, ज्यामुळे आसाम रायफलच्या सैनिकांना आपल्या कॅम्पच्या बाहेर येणे कठीण होते.कारण बायकांच्या गटांवर फ़ायर करणे सोपे नसते. काही ठिकाणी आसाम रायफलला हेलिकॉप्टरच्या मदतीने अन्नपुरवठा करण्यात आलेला आहे. 
कठीण परिस्थितीत वरती मात करून भारतीय सैन्याचे उत्कृष्ट काम 
अशा कठीण परिस्थितीत वरती मात करून आसाम रायफ़ल आणी भारतीय सैन्य मात्र तिथे दिवस-रात्र काम करून अनेकांना वाचवत आहे, अनेक शस्त्रे पकडत आहे आणि अनेक हिंसाचार करणाऱ्यांना पकडत आहे.
ज्या भागामध्ये सर्वात जास्त हिंसाचार सुरू आहे, आणी मणिपूरच्या डोंगरामध्ये सैन्याला तैनात करण्यात आले आहे .रोजच सैन्याची तिथे वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स सुरू असतात. सैन्याने आतापर्यंत 40 हजार हून जास्त नागरिकांना हिंसाचारापासून वाचवले आहे, अनेकांना गाडीच्या मदतीने, हेलिकॉप्टरच्या मदतीने  सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. ज्या वेळेला हिंसाचार करणारा गट एखाद्या गावामध्ये येतो,सैन्य तिथे जाऊन त्याच्या विरुध्द लगेच कारवाई करते, यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. 
डोंगराळ भागांमध्ये लोक एका मोठ्या गावात राहत नाही.ते वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहतात, कुठे 50 ते 60 घरे किंवा कुठे 100 ते 120 घरे एवढीच असतात. लांब पसरलेल्या डोंगराच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या जनतेला 148 कॉलम पुरेसे नाही. तिथे असलेल्या सैन्याच्या कॉलमची संख्या दुप्पट करावी लागेल.
अनेक राजकीय पक्ष ,संस्था सल्ले देण्यामध्ये पुढे आहेत. त्यांना मणिपूरमध्ये स्थापन झालेल्या पिस कमिटीमध्ये पाठवले जावे आणि हिंसाग्रस्त भागामध्ये हातात शस्त्रे असलेल्या युवकांशी संवाद करायला भाग पाडायला पाहिजे. वेगवेगळे समाज फक्त आपल्या समाजाच्या बाजूने बोलतात आणि दुसऱ्या समाजाला दोष देत आहेत. 
परिस्थिती सुधारण्याकरता नेमके काय करावे लागेल 
मणिपूरचे पोलीस नेतृत्व आपल्या कामांमध्ये पूर्णपणे अयशस्वी झालेले आहे. त्या जागी निधड्या छातीच्या सैनिकी नेतृत्वाची गरज आहे, की जे आपल्या सैनिकांबरोबर धोकेदायक परिस्थितीमध्ये जाऊन आपल्या सैनिकांचं नेतृत्व करतील आणि परिस्थितीला सामान्य करतिल.
सध्या मणिपूर जनतेचा फक्त भारतीय सैन्यावरतीच विश्वास आहे आणि प्रत्येक गाव किंवा वस्ती आमच्याजवळ सैन्याला तैनात करावे असे म्हणत आहे. सैन्य ज्यावेळेला शोध मोहिमेला जाते त्यांच्याबरोबर कायदा सुख व्यवस्थे वरती लक्ष ठेवण्याकरता सीआरपीएफ ची एक तुकडी पण बरोबर असते, जसे कश्मीरमध्ये केले जाते, तसेच मणिपूर मध्ये व्हावे.
80 च्या दशकामध्ये मिझोराम मध्ये हिंसाचार वाढला. त्यावेळेला सैन्याचे अधिकारी जनरल सगत सिंग यांनी परिस्थिती काबू मध्ये आणली. यावेळेस सुद्धा सैन्याच्या दिमापुर स्तिथ ३ कोरच्या नेतृत्वाखाली सगळ्या सुरक्षा दलांना आणले  जावे आणि सुरक्षा दलांचा वापर कसा केला पाहिजे हे ३ कोर ने ठरवावे. 
पुढचे काही दिवस मणिपूरमध्ये सैन्य वाढवून सिमा सुरक्षित केल्या पाहिजे, ज्यामुळे नवीन शस्त्रे, दारू गोळा मणिपूरमध्ये येणार नाही. हिंसाग्रस्त भागांमध्ये शोध मोहीम राबवून लुटलेली सगळी शस्त्रे परत मिळवली पाहिजे. कुठलाही गट जर शस्त्र घेऊन फिरत असेल तर त्यांना लगेचच फायरिंग करून निष्क्रिय केले पाहिजे.कुठल्याही शस्त्रधारी गटांच्या बरोबर कुठलाही संवाद होऊ शकत नाही.

No comments:

Post a Comment