Total Pageviews

Sunday 28 May 2017

लष्करप्रमुख आक्रमक…••‘‘माझ्या जवानांवर अतिरेक्यांचे हस्तक दगडफेक करीत आहेत, पेट्रोलबॉम्ब फेकत आहेत. त्यांनी जर विचारले की, आम्ही काय करावे, तर अशा वेळी मी असे म्हणावे का की, वाट पाहा आणि मरा. तुमची ही अपेक्षा आहे का की, आमचा जवान शहीद झाला तर त्याची शवपेटी आणावी, त्यावर तिरंगा ठेवून त्या शवपेट्या त्या जवानांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन कराव्यात?


May 29, 2017015 Share on Facebook Tweet on Twitter अग्रलेख भारताला लष्करप्रमुखांची एक गौरवशाली परंपरा लाभली आहे. तसेच आमच्या जांबाज, शूरवीर आणि देशासाठी समर्पित जवानांचीही पंरपरा लाभली आहे. लष्करप्रमुख आणि पुढे फील्ड मार्शल झालेले जनरल करिअप्पा, जनरल, फील्ड मार्शल सर माणेकशा यांच्यासारख्या युद्ध व्यूहरचनेत निपुण लष्करप्रमुखांच्या योजनेमुळेच आपण १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर जोरदार मात करू शकलो होतो आणि पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना शरण येण्यास भाग पाडले होते. फील्ड मार्शल करिअप्पा यांच्या कर्तृत्वाबद्दल जेवढे बोलले तेवढे कमीच आहे. त्याच मांदियळीतील विद्यमान लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यासारखे लष्करप्रमुख आम्हाला लाभले आहेत. संदर्भ आहे, अतिरेक्यांशी प्राणपणाने लढणार्‍या मेजर लिटल् गोगोई यांनी एका दगडफेक्याला आपल्या जीपच्या बॉनेटवर बांधून त्याला नेण्याची. त्यांनी या दगडफेक्याला बॉनेटवर बांधून नेल्यामुळे दगडफेक थांबली आणि सुमारे दोन हजार नागरिक आणि जवानांचे प्राण वाचले. या घटनेवरून पाकिस्तानधार्जिण्या आणि काश्मिरी फुटीरवादी कावळ्यांना कावकाव करण्याची संधी मिळाली. देशात कायदा नावाची चीजच उरली नाही, इथपासून तर काश्मीरबाबत मोदी सरकारचे धोरण कसे चुकीचे आहे, इथपर्यंत त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. आपल्या देशात अलीकडच्या काळात अशाच देशद्रोह्यांना अप्रत्यक्षपणे मदत करणार्‍या वाहिन्यांचा सुळसुळाट झाला आहे. काही अपवाद आहेत, पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. पण, या थोड्या संख्येत असणार्‍या वाहिन्यांनीच आपल्या वृत्तमालिकांमधून राष्ट्रवादाचा हुंकार जागविला आणि अन्य वाहिन्या कशा अतिरेक्यांचे मनोबल वाढविणार्‍या आणि लष्कराचे मनोबल कशा खच्ची करणार्‍या आहेत, हे धाडसाने सांगितले. या राष्ट्रवादी वाहिन्यांनी आमच्या जवानांचे मनोबल वाढविणार्‍या कहाण्या प्रामुख्याने प्रसारित करून वास्तव लोकांपुढे मांडण्याची प्रशंसनीय कामगिरी बजावली. हे वातावरण सुरू असतानाच, आमच्या लष्करप्रुखांनी अतिशय धाडसी निर्णय घेत, मेजर गोगोई यांच्या अतिशय सृजनशील कारवाईबद्दल प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव केला. या घटनेने लष्कराचे मनोबल वाढविण्यास फार मोठी मदत झाली आणि एकाच आठवड्यात दहा कुख्यात अतिरेक्यांना आमच्या लष्कराने यमसदनी पाठविले! यात लष्कराकडून मारला गेलेला कुख्यात दहशतवादी बुरहान वाणीचा उत्तराधिकारी, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबझर भट याचाही समावेश आहे. तरीही लष्करप्रमुखांनी गोगोई यांचा गौरव का केला, यावरही या पाकिस्तानधार्जिण्या छद्म पुरोगामी पत्रकारांनी गरळ ओकलीच. लष्करप्रमुख आपल्या जवानांना चुकीचा सल्ला देत आहेत, काश्मीरला अराजकतेकडे नेण्यास हातभार लावत आहेत, अशीही वळवळ त्यांनी केली. पण, लष्करप्रमुख अशा टीकांना घाबरले नाहीत. त्यांनी त्याहीपुढे एक पाऊल पुढे जात, लष्कराला आदेश दिले की, काहीही झाले तरी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडा. शनिवारी त्यांनी पीटीआय या वृत्तसंंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तर बॉम्बगोळाच टाकला!- ‘‘माझ्या जवानांवर अतिरेक्यांचे हस्तक दगडफेक करीत आहेत, पेट्रोलबॉम्ब फेकत आहेत. त्यांनी जर विचारले की, आम्ही काय करावे, तर अशा वेळी मी असे म्हणावे का की, वाट पाहा आणि मरा. तुमची ही अपेक्षा आहे का की, आमचा जवान शहीद झाला तर त्याची शवपेटी आणावी, त्यावर तिरंगा ठेवून त्या शवपेट्या त्या जवानांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन कराव्यात? जर अतिरेकी समर्थकांनी दगड फेकण्याऐवजी आमच्या लष्करावर शस्त्रांमधून गोळ्या झाडल्या तर मला अधिकच आनंद होईल.’’ असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या चार वाक्यातच लष्करप्रमुखांची आक्रमकता सहज लक्षात येते. अतिरेकी समर्थकांनी दगडऐवजी गोळ्या घालाव्या, असे ते का म्हणाले असतील? त्याचे सरळ उत्तर असे आहे की, तिकडून गोळीबार झाला तर मग आमचे जवान मोकळे. त्यांना आमचे जवान कसे प्रत्युत्तर देतात हे पाहाच, असा त्याचा मथितार्थ आहे. आपल्या जवानांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन आणि त्यांच मनोबल वाढविणे, हे तर लष्कराच्या प्रत्येक अधिकार्‍याचे कर्तव्यच आहे. पण, प्रत्यक्षात लष्करप्रमुखांनीच पावती दिल्यामुळे आमच्या जवानांचे मनोबल पूर्णपणे उंचावले आहे. त्यांच्या मनात आता भीतीचा लवलेशही उरलेला नसेल. लष्करप्रमुखांनी ठामपणे सांगितले की, आम्हाला काश्मीर मुद्यावर सर्वंकष निदान हवे आहे. जेणेकरून तेथे शांतता नांदेल. जनरल रावत यांनी अनेक वर्षे जम्मू-काश्मिरात विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे त्यांना काश्मीर खोर्‍यातील स्थितीची पूर्ण माहिती आहे. आम्ही काश्मिरात अतिशय संयमाचे उदाहरण दिले आहे. भारतीय सेना ही मैत्रीपूर्ण सहअस्तित्वाची समर्थक आहे. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न समोर आला, तर मग समाजकंटकांना जबर बसलीच पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे. आमच्या लष्कराचे मनोबल संतत उंचावत राहावे यासाठी जे जे करणे शक्य आहे, ते मी करणारच. ते माझे कर्तव्यच आहे, असे रावत यांचे स्पष्ट विचार आहेत. माझे माझ्या जवानांना सांगणे आहे, मी सदैव तुमच्यासोबत आहे. काही घटना या आक्षेपार्ह असू शकतात. पण, त्यांचा सामना करताना आपले वर्तन निष्कलंक ठेवा. मी तुमच्या सोबत राहीन. माझ्या जवानांचे मनोबल वाढविणे हे माझे आद्यकर्तव्यच आहे, असे परखड विचार जनरल रावत यांनी देशापुढे मांडले आहेत. त्यांच्या या प्रत्युत्तरामुळे कावकाव करणार्‍या कावळ्यांनाही हा संदेश गेला आहे की, तुम्ही कितीही कावकाव करा, आमचे जवान हे निर्भीड आहेत, ते अशा टीकांना बंदुकीच्या बॉनेटने खुंटीवर टांगतील. लष्करप्रमुखांसोबतच केंद्र सरकारही आक्रमक झाले आहे. तिकडे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही एक संदेश दिला आहे. केंद्र सरकारकडे काश्मीर समस्येच्या निदानावर एक स्थायी उपाय आहे. पण, तो कोणता हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला. तथापि, विकास आणि शांततेच्या प्रक्रियेसाठी जो कुणी समर्थक पुढे येईल, त्याच्यासोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पण, आम्ही आमच्या सार्वभौम सीमांसोबत कुठलाही समझोता करणार नाही, हे त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले. तुम्ही फुटीरवादी नेत्यांसोबतचही चर्चा करणार काय, या प्रश्‍नाच्या उत्तरात राजनाथसिंह म्हणाले की, काश्मीर जळत असताना, त्यांच्यासोबत चर्चा होऊच शकत नाही. मी गतवर्षी काश्मीरला तीन दिवस होतो. अनेकांशी मी चर्चा केली. सर्वांनाच शांतता हवी आहे. जनरल बिपिन रावत यांची घणाघाती विधाने पाहता, येणार्‍या काळात भारताकडून एखादी मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

No comments:

Post a Comment