Total Pageviews

Friday 27 February 2015

GOOD RAIL BUDJET BY SURESH PRABHU

दूरदृष्टीच्या ‘रेलरेषा...!’ ‘झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी...’ असे जुन्या वाफेच्या इंजिनावर चालणार्‍या रेल्वेचे वर्णन, आताच्या काळात फक्त दरवर्षी रेल्वेच्या अंदाजपत्रकांना लागू आहे, असे या देशातील सामान्य माणसाला सतत वाटत असे. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेले यंदाचे रेल्वेचे अंदाजपत्रक धुरांच्या नाही, तर दूरदृष्टीच्या रूपरेषा मांडणारे आहे. अंदाजपत्रकाचा एक नवा अध्याय प्रभू यांनी सुरू केला आहे हे नमूद करत, त्यांचे त्याबद्दल अभिनंदन केलेच पाहिजे. अंदाजपत्रक म्हणजे एक ताळेबंद, असे त्याचे स्वरूप आजवर करून टाकले गेले. त्यातल्या त्यात रेल्वे अंदाजपत्रक म्हणजे दरवाढ आहे की नाही? आणि कोणत्या राज्याला झुकते माप देत नव्या गाड्यांची घोषणा केली गेली आहे? या दोनच प्रश्‍नांभोवती चर्चा फिरती राहिली आहे. रेल्वेचा अर्थसंकल्प हा या खंडप्राय देशातील एका महत्त्वाच्या सुविधेचा संकल्प आहे याचे भान, हा अर्थसंकल्प मांडताना किंवा त्याची चर्चा करताना कधीच यापूर्वी ठेवले गेले नव्हते. मुळात अर्थसंकल्पाला स्वस्त-महागच्या चौकटीत बसविण्याची जी घाई या देशातील माध्यमे आणि तज्ज्ञ करत आले आहेत, त्याला प्रभू यांनी चांगलाच धक्का दिला आहे. रेल्वे प्रवासी भाड्यात किंवा कोणत्याही दरात कसलीही वाढ नाही, ही या अंदाजपत्रकातील पहिली बातमी आहे. कोणत्याही नव्या रेल्वेगाडीची घोषणा लगेच त्यांनी केलेली नाही, ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. रेल्वेची खरी परिस्थिती झाकून ठेवत वरवर, जनतेला काहीतरी नवे देत असल्याचे चातुर्य वापरायचे आणि वेळ मारून नेत, रेल्वे मात्र आहे तेथेच ठेवायची, असला प्रकार न करता, प्रांजळपणे रेल्वेचे खरे चित्र प्रभू यांनी जनतेसमोर ठेवले आहे. जे आहे ते आणि जसे आहे तसे लोकांसमोर ठेवण्याचा प्रांजळपणा जितका महत्त्वाचा आहे, त्यापेक्षा पुढे बदलाची दिशा कशी राहणार आहे, याचे धोरण अंदाजपत्रकातून स्पष्ट होणे जास्त महत्त्वाचे आहे. आमच्याकडून पैसे घ्या पण आमचा प्रवास सुखद होऊ द्या, अशी आज रेल्वेप्रवाशांच्या मनातली भावना आहे. आरक्षणापासून ते प्रवास पूर्ण करण्यापर्यंत आज प्रवाशांना जे हिसके सहन करावे लागतात, ते कमालीचे त्रासदायक आणि रेल्वेप्रवासाबाबत भीती निर्माण करणारे आहेत. हे भीतिदायक चित्र बदलण्याचा संकल्प सुरेश प्रभू यांच्या या अंदाजपत्रकातून व्यक्त झाला आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. रेल्वे असो की बससेवा, कोणत्याही सार्वजनिक प्रवासी व्यवस्थेत सर्वांत अडचण जर कोणती असेल तर ती अस्वच्छता! त्यावर घाव घालत प्रभू यांनी ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ या दिशेने काम करणार असल्याचे घोषित केले आहे. रेल्वे हे आपले चालतेफिरते घर आहे, ते स्वच्छ ठेवा, असे प्रभू यांनी आवाहन केले आहे. मात्र, या स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासनाकडूनच आधी सुरुवात केली गेली, तर जनता निश्‍चित त्याला जबाबदारीने सामोरे जाईल. हेल्पलाईन नंबर, मोबाईल चार्जिंग सुविधा, महिलांना सुरक्षेसाठी निर्भया कोश, ई तिकिटाची सुविधा, सीसीटीव्हीची नजर, सर्वोत्तम अन्न साखळी, तिकिटासोबतच जेवणाचे आरक्षण, चार महिने आधी आरक्षणाची सोय, पाच मिनीटात विनातिकिटाची आफत आली तर तिकीट मिळण्याची सोय अशा छोट्या, पण अतिशय महत्त्वपूर्ण सुविधा रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. अपंगांसाठी आणि अंधांसाठी विशेष विचार अर्थसंकल्पात केला गेला आहे. अंदाजपत्रकात जाहीर झालेल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात अनुभवाला येत नाहीत, असा आजवरचा प्रवाशांचा अनुभव आहे. त्याला आता तडा बसेल आणि या छोट्या छोट्या, कमी खर्चाच्या, मात्र प्रवाशांना अत्यंत सुख देणार्‍या गोष्टी सरकारने रेल्वेत घडवून आणल्या, तर लोक निश्‍चितच त्याचे स्वागत करतील. सरकारी घोषणांवरचा आणि अंदाजपत्रकांच्या परिणामकारकतेवरचा लोकांचा विश्‍वास त्यातून वाढीस लागेल. नव्या गाड्यांची घोषणा परिस्थितीचा नीट अभ्यास केल्यानंतर होईल, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, नवे रेल्वेमार्ग वीस टक्क्यांनी वाढतील आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २१ दशलक्षवरून ३० दशलक्ष इतकी वाढविण्यात येणार आहे. या विषयात येत्या पाच वर्षांत साडेआठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असे नियोजन रेल्वेमंत्रालयाने केल्याचे या अंदाजपत्रकात जाहीर केले आहे. नव्या युगातील गती आणि रेल्वेची गती यांच्यातील व्यस्त प्रमाण बदलण्याचा संकल्प रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केला आहे. नाहीतर भाषा बुलेट ट्रेनची करायची आणि बाकीच्या रेल्वेची गती मात्र एकाच रेल्वेला एकच म्हैस दोन दोनदा आडवी येत असल्याचा विनोद करण्याइतकी कमी! हे व्यस्त प्रमाण बदलून टाकण्याचा संकल्प सुरेश प्रभू यांनी जाहीर केला आहे. अगदी राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस यांची क्षमता ताशी १३० किमी वेगाने जाण्याची असतानाही, त्या प्रत्यक्षात केवळ ७० किमी वेगाने जातात, याबद्दल रेल्वेमंत्र्यांनी आश्‍चर्य व्यक्त करत, ही क्षमता ताशी १६० किमी इतकी वाढविण्याचा निश्‍चय त्यांनी केला आहे. हा वेगही प्रगतीचा वेग खूपच वाढविणारा ठरणार आहे. याशिवाय सीमाभागात रेल्वेचे जाळे वाढविण्याची घोषणाही महत्त्वपूर्ण आहे. पूर्वांचलातील राज्यांबाबत स्वतंत्रपणे विचार करून काही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. उत्तरांचल राष्ट्रीय प्रवाहात जोडला जाण्याकरिता याचा खूप उपयोग होईल. ९ अतिवेगवान गाड्या, विद्यमान रेल्वेची गती वाढविणे, चारशे रेल्वेस्थानकांवर वायफायची सुविधा, वरच्या बर्थवर जाण्यासाठी प्रवाशांसाठी सुखद शिडी, सतरा हजार जैविक शौचालये अशा काही गोष्टी रेल्वेमंत्र्यांनी घोषित केल्या आहेत. त्या झाल्या तरी रेल्वेचे चित्र सुखद होईल. नवे तंत्र, भांडवलात जनसहभाग, औद्योगिक दृष्टी, रेल्वेचे आधुनिकीकरण या विषयात या अंदाजपत्रकाने चित्र बदलण्याचाच संकल्प जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेमंत्रालय प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या हातात होते. त्या काळात प्रत्येकाने देशाच्या अंदाजपत्रकावर आपापल्या प्रदेशाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला होता. आपापल्या भागात नव्या रेल्वे गाड्या, नवे रेल्वेमार्ग असे संकुचित पक्षपात या लोकांनी केले होते. पहिल्यांदाच रेल्वे अंदाजपत्रकाला या प्रादेशिक अस्मितेतून आणि आग्रहातून प्रभू यांनी बाहेर काढले आहे. रेल्वेला आधुनिक विकासाची दिशा देणारा, नव्या तंत्राचा अवलंब करणारा, प्रवाशांच्या हिताची काळजी घेणारा असा हा रेल्वे अर्थसंकल्प आहे. रेल्वेतील स्वच्छतेवर भर देतानाच, रेल्वेत जमा होणार्‍या कचर्‍याचाही वेगळा विचार रेल्वेमंत्र्यांनी मांडला आहे. हा कचरा एकत्रित करून रेल्वे टर्मिनस जेथे असेल तेथे या कचर्‍यापासून वीजनिमिंती करण्याचे प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. रेल्वेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक असल्याचे कबूल करतानाच रेल्वेमंत्र्यांनी, देशाच्या अर्थव्यवस्थेत रेल्वे आपले योगदान चांगल्या प्रकारे निभावून नेईल, असा विश्‍वासही व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे अंदाजपत्रकाची स्तुती करताना, हे अंदाजपत्रक भविष्याकडे पाहणारे आणि सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करणारे अंदाजपत्रक आहे, असे म्हटले आहे. रेल्वेच्या डब्यांपासून ते रेल्वेगाड्यांपर्यंत सर्वंकष रेल्वे सुधारणेचा विचार या अंदाजपत्रकातून व्यक्त झाला आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताना ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ अशी जी जाहिरात केली होती, त्या ‘अच्छे दिना’ची चाहूल जनतेला आणून देणारा अर्थसंकल्प, असे या अंदाजपत्रकाचे वर्णन करावे लागेल. पैशाविना केवळ कल्पनाविलासात निव्वळ धुरांच्या रेषा हवेत न काढता, दूरदृष्टीच्या ‘रेलरेषा’ सुरेश प्रभू यांनी आखल्या आहेत, एवढे खरे...

No comments:

Post a Comment