Total Pageviews

Sunday 22 February 2015

इसिसच्या दीर्घकालीन लढ्यामागचे रहस्य-प्रमोद वडनेरकर

इसिसच्या दीर्घकालीन लढ्यामागचे रहस्य इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरीया (आयएस)विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला सहा महिन्यांपेक्षाही जास्त काळ उलटून गेला आहे. पण, इराक व सीरियाचा त्यांनी बळकावलेला भाग त्यांच्यापासून हिरावून घेण्याचे कसब संयुक्त सेनेने दाखविलेले नाही. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या अहवालानुसार त्यांच्या हवाई हल्ल्यात आयएसचे अंदाजे ६००० जिहादी आजपर्यंत ठार झालेले आहेत. तरीही आयएस सर्वच आघाड्यांवर जोरदार मुकाबला करते आहे. आयएसमध्येे सतत होणार्‍या जिहादींच्या भरतीमुळे, त्यांना या आघाताची झळ पोहोचत नाही. आयएसविरुद्ध लढण्यासाठी सीरियन व इराकी कूर्दच्या आर्मीला ट्रेनिंग देण्यापासून तर नवीन शिया पंथीय जिहादींची पलटण उभी करण्यापर्यंत अनेक प्रयोग करण्यात आले, पण इराकी सेना फारशी आघाडी घेेऊ शकलेली नाही. एवढे मात्र खरे की, अमेरिकेच्या अधिपत्याखाली या संयुक्त सेनेने आयएसच्या विस्तारवादी कार्यक्रमाला रोखले आहे. त्यांनी जिंकलेला भाग टिकविण्यासाठीच आयएसची बरीच शक्ती खर्च होत आहे. आजपर्यंत तुर्की व सीरिया यांच्या सीमेवर असलेले कोबाने शहर जिंकण्याचा आयएस सतत प्रयत्न करीत होते. पण, कूर्द जमातीचा अड्डा असलेले हे शहर कूर्द जिहादी गटाने आजवर लढविले आहे. चार महिने चाललेल्या या संघर्षात आयएसला मागे हटविण्यात कुर्दीश फोर्सेसच्या यशामागे अमेरिकन फायटर प्लेन्सचे महत्त्वाचे योगदान आहे. बगदाद शहराच्या ईशान्येला असलेल्या ‘दियाला’ प्रांतातून आयएस अतिरेक्यांना नुकतीच माघार घ्यावी लागली आहे. इराकी आर्मी व शिया जिहादींनी इराकमधील दुसर्‍या नंबरचे शहर ‘मासूल’ लढविण्यात यश मिळविले आहे. पण, या अपयशामुळे आयएसच्या विचारसरणीत व युद्धखोरीत कोणताच बदल झालेला नाही. उलट, त्यांनी चिडून जाऊन लिबियात पकडलेल्या २१ इजिप्शियन ख्रिश्‍चनांचा सरेआम शिरच्छेद करून ते दृश्य व्हिडीओवर प्रसारित केले. इजिप्तमधून व्यापारासाठी सीरियात जाणारे ख्रिश्‍चन व्यापारी जर अशा प्रकारे आयएसच्या क्रौर्याला अचानक बळी पडत असतील, तर त्यामुळे त्या देशातील व्यापारावर गंभीर परिणाम होऊ शकतात. इजिप्तमधे या ख्रिश्‍चन समुदायाची लोकसंख्या १० टक्के एवढी आहे. इजिप्तचे पंतप्रधान अब्देल फतेद यांनी, ‘‘आम्ही या हत्येचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशारा आयएसला दूरचित्रवाणीवरून दिला. पण, त्याच वेळी पुढे जाऊन आयएसचे अधिकारी आपला रोमवर विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त करत होते. मागे जॉर्डनच्या एका वैमानिकाची, आयएसच्या अधिकार्‍यांनी, त्याला लोखंडी पिंजर्‍यात बंद करून नंतर तो जळत असताना त्या पिंजर्‍यावर बुलडोझर चढवून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्या करण्याच्या या विकृत प्रकारांचे इस्लामचे खंदे समर्थकदेखील समर्थन करणार नाहीत! यानंतर जॉर्डनचे किंग अब्दुला यांनी हत्येला प्रत्युत्तर देताना आयएसच्या ठिकाणावर प्रचंड हवाई हल्ले केले. किंग अब्दुला हे केवळ जॉर्डनचे राजे नाहीत, तर एक यशस्वी लेफ्टनंट जनरल आहेत! जॉर्डनमधे ९० टक्के संख्या सुन्नी मुस्लिमांची आहे आणि आयएसदेेखील सुन्नी पंथीयांची संघटना आहे. त्यामुळे जॉर्डनच्या या प्रतिक्रियेवर सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. किंग अब्दुला यांनी मागे ‘चार्ली हेब्दो’प्रकरणावरून उद्भवलेल्या आतंकी हल्ल्याविरुद्ध पॅरिसमध्ये झालेल्या निषेध मोर्चात जॉर्डनचे किंग म्हणून त्यांच्या समर्थनार्थ प्रत्यक्ष भाग घेतला होता. पण, त्यांच्या या कृतीचा जॉर्डनच्या नागरिकांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. थोडे इतिहासात मागे गेल्यास असे दिसते की, किंग अब्दुल्ला यांचे वडील हुसेन हे प्रेषित महंमदाच्या कुळातले म्हणून त्यांचा सन्मान होता. ते मुस्लिम ब्रदरहूड संस्थेचे प्रमुख सदस्य होते. त्यांनी हमास पंथियांना मदत करून पॅलेस्टिनी लष्कराला इस्रायलच्या विरोधात लढण्यास शस्त्रदेखील पुरविले होते. पण, १९९९ नंतर जॉर्डनच्या सत्तेची सूत्रे हाती आल्यानंतर त्यांचे पुत्र अब्दुला यांच्या वागण्यातला धोरणात्मक फरक दिसू लागला. किंग अब्दुला यांनी मुस्लिम ब्रदरहूडचे अध्यक्ष महंमद मोर्सी यांना डावलून इजिप्तची सत्ता काबीज करणार्‍या जनरलच्या स्वागतार्थ इजिप्तला प्रत्यक्ष भेट दिली होती. किंग अब्दुला यांनी त्यांचे हमाससोबत असलेले संबंधदेखील संपुष्टात आणले होते. आयएसला जॉर्डनसारख्या ९० टक्के सुन्नी पंथीय असलेल्या देशातूनही राजकीय पातळीवर विरोध सुरू आहे, तरी आयएस आज सर्व इस्लामिक गटांना त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचा संकल्प जाहीर करते, हे कशाच्या भरवशावर? आयएसने निर्माण केलेल्या या समस्येला लष्करी बळाच्या आधारे सामोरे जाण्यावर अनेक मर्यादा आहेत. तसेच वैचारिक पातळीवरही त्यांच्याशी सामना करायला पश्‍चिम आशियातील मुस्लिम राष्ट्रे समर्थ नाहीत. इराक, सीरियाच्या भवतालची सारीच मुस्लिम राष्ट्रे लोकाभिमुख होऊन, खर्‍या अर्थाने जनतेची काळजी घेण्यात अपयशी ठरलेली आहेत. बर्‍याच मुस्लिम राष्ट्रांची शासनव्यवस्था ढासळलेली आहे. तेथे जिहादी संघटनांचाच शासनावर वचक असतो. याच परिस्थितीचा आयएस फायदा घेत आहे. त्यांनी आवाहन केल्यावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम युवक आयएसमधे सामील होण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातून येत असतात, ते याच कारणामुळे! आयएसच्या बाजूने आज २०,००० च्या वर विदेशी जिहादी लढत आहेत. त्यात आता युरोपीय राष्ट्रासोबत दक्षिणपूर्व आशियातील राष्ट्रेही ओढली गेली आहेत. इंडोनेशियातील पोलिस सूत्रांनुसार तेथून ५०० जिहादी आयएसमध्ये सामील झाले आहेत. मलेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स येथून १५० जिहादी आयएसच्या वाटेवर आहेत. मलेशियातही काही महिन्यांपूर्वी आयएसशी संलग्न असलेल्या ५१ युवकांना पकडले होते. खरं तर दक्षिणपूर्व आशियातील मुस्लिमांची मानसिकता ही आयएसच्या विचारप्रणालीशी अजीबात जुळत नाही. ते शांतताप्रिय व सहिष्णू आहेत. त्यामुळेच अल् कायदासारखी प्रखर जिहादी संघटना दक्षिणपूर्व आशियात मूळ धरू शकली नाही. पण, समाजात अशांतता पसरवायला बोटावर मोजण्याइतके घटकदेखील पुरेसे असतात. मागे अशाच घटकांनी इंडोनेशियातील बाली बेटावर बॉम्बस्फोट घडवून २०० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला होता. आयएसच्या लढ्यात सामील होण्यासाठी भारत व प्रामुख्याने काश्मीरमधूनही अनेक तरुण गेले आहेत. यावरून इस्लामिक स्टेटचे व्हिडीओ आणि प्रचारप्रणाली ही बॉलिवूडपेक्षाही अधिक प्रभावी दिसते. त्यांच्या आवाहनात जी मने पेटविण्याची क्षमता आहे, त्यापुढे उदारमतवादी राष्ट्रेदेखील हतबल झाली आहेत. आयएसने आपली सत्ता आर्थिक स्तरावर भक्कम करण्यासाठी तेलसाठ्यांवर कब्जा मिळविला आहे. या चारपाच महिन्यात तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे, त्यांची २ ते ३ मिलियन डॉलर्सएवढी रोजची आवक आता ३० टक्क्यांवर आली आहे. जिहादींच्या पगारवाटपासाठीही त्यांचेकडे पुरेसा निधी नसल्याचे अमेरिकन एजन्सीच्या लक्षात आले आहे. तरी आयएस जिद्दीने पुढे जाऊन आघाडी लढविण्यात कमी पडत नाही. कारण त्यांच्याजवळ प्राणपणाने लढणार्‍या, इस्लामसाठी कोणतीही कुर्बानी द्यायला तयार असलेल्या फौजा आहेत. इस्लाम विरोधकांना ते किती क्रूरतेने संपवू शकतात, याचे दर्शन त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओतून होतच असते. त्यामुळे जोपर्यंत मुस्लिम राष्ट्रे जॉर्डनप्रमाणे आयएसच्या अतिरेकी क्रौर्याच्या व अत्याचाराच्या विरोधात त्यांना धडा शिकवत नाहीत, तोपर्यंत आयएसच्या आव्हानांना आळा बसणार नाही. त्यांचे जगाला इस्लाममय करण्याचे इरादे किती निरर्थक वा फोल आहेत, हे पुरोगामी विचारांची मुस्लिम राष्ट्रेच त्यांना चांगल्या तर्‍हेने पटवून देऊ शकतात. प्रमोद वडनेरकर

No comments:

Post a Comment