Total Pageviews

Tuesday 13 January 2015

केरींचे ‘कीर्तन’;पाकड्यांचा ‘तमाशा’

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी जरी सर्वच दहशतवादी संघटनांविरुद्ध पाकिस्तानने लढावे असे ‘कीर्तन’ केले तरी दहशतवाद आणि दहशतवादी संघटना यांना पोसण्याचा ‘तमाशा’ पाकडे सुरूच ठेवणार हे उघड आहे. केरींचे ‘कीर्तन’; पाकड्यांचा ‘तमाशा’ -SAMNA अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हिंदुस्थान भेट आटोपून पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले. अमेरिकन राज्यकर्त्यांची ही एक प्रथाच आहे. कधी पाकिस्तान आटोपून हिंदुस्थानात यायचे किंवा कधी हिंदुस्थानची भेट आटोपली की पाकिस्तान दौरा करायचा. जॉन केरी यांनी त्याच परंपरेचे पालन केले. अर्थात हिंदुस्थानात असताना त्यांनी आर्थिक गुंतवणूक, व्यवसायवृद्धी, हिंदुस्थान-अमेरिका व्यापारी संबंधांना आणखी चालना देणे वगैरे मुद्द्यांचा ऊहापोह केला. पाकिस्तानात मात्र ते दहशतवादावरच बोलले. खरे तर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हा गुणात्मक फरकही दोन देशांच्या भवितव्याविषयी बरेच काही सांगून जातो. अर्थात, पाकिस्तान आणि दहशतवाद या तशा एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यावर केरी महाशय तरी त्या देशात गेल्यावर दुसरं काय बोलणार? पाकिस्तानने एखाद्दुसर्‍या नव्हे तर सर्वच दहशतवादी संघटनांविरुद्ध लष्करी कारवाई करावी असा सल्ला केरी यांनी दिला. अर्थात हा सल्ला पाकिस्तान किती मानतो हा प्रश्‍न वेगळा, पण अमेरिकेने दहशतवादासंदर्भात पाकिस्तानला इशारे अथवा सल्ले वगैरे देणे आणि पाकिस्तानने ते ऐकून न ऐकल्यासारखे करणे हीदेखील एक परंपराच होऊन बसली आहे. कारण पाकिस्तान हाच अनेक इस्लामी दहशतवादी संघटनांचा पोशिंदा असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. तरीही अमेरिका दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची खैरात त्या देशावर करीतच असते. पुन्हा हा प्रचंड पैसा दिला जातो तो दहशतवादविरोधी लढ्यासाठी. म्हणजे चोराच्या हातात जामदारखान्याच्या किल्ल्या देण्यासारखाच हा प्रकार. मात्र अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील हा ‘खेळ’ वर्षानुवर्षे सुरू आहे. याच पाकपुरस्कृत दहशतवादाचे चटके अमेरिकेलाही बसल्यामुळे त्यांची भाषा थोडी बदलली इतकेच. बाकी धोरणात काहीच बदल झालेला नाही. किंबहुना अमेरिकेकडून पाकिस्तानला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा आणि लष्करी सहाय्यात गेल्या वर्षी चांगलीच चालना मिळाली. लष्करी सामग्रीशिवाय ‘एफ-१६’ जातीची ३५ अत्याधुनिक विमाने पुरविण्यात आली आहेत. शिवाय दोन अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक अर्थसहाय्य आतापर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळाले आहे. आता ही अब्जावधी अमेरिकी डॉलर्सची मदत जर पाकड्यांनी खरोखरच दहशतवादविरोधी लढ्यासाठी वापरली असती तर ना ‘९/११’ झाले असते, ना ‘२६/११’. गेल्या महिन्यातील पेशावरमधील नृशंस हत्याकांडही टळले असते आणि ‘चार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकावरील ताजा हल्लादेखील. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी महाशयांनी पाकिस्तानला सर्वच दहशतवादी संघटनांविरुद्ध लढण्याचा दिलेला सल्ला योग्य असला तरी हे दोन्ही देश एकमेकांचे खायचे आणि दाखवायचे दात पक्के ओळखून आहेत. त्यामुळे ‘सल्लागार’ जॉन केरींचे विमान इस्लामाबादेतून वॉशिंग्टनच्या दिशेने उडाले की त्यांचा सल्ला पाकिस्तानी राज्यकर्ते कचर्‍याच्या डब्यात टाकतील. ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेविरुद्ध सध्या पाकिस्तानची जोरदार लष्करी कारवाई सुरू आहे हे खरे आहे. तथापि त्याचा संबंध पेशावरमधील ‘आर्मी स्कूल’मध्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या चिमुरड्या शाळकरी मुलांच्या निर्घृण हत्याकांडात आहे. तेव्हा केरी यांच्या सल्ल्यानुसार ‘तेहरिक’पाठोपाठ पाकिस्तानी आणि अफगाणी तालिबान, लश्कर-ए-तोयबा, हक्कानी दहशतवादी गट आणि अन्य संघटना यांच्याविरुद्धही पाकिस्तान कारवाई करेल अशी शक्यता नाही. थोडक्यात, सर्वच दहशतवादी संघटनांविरुद्ध पाकिस्तानने लढावे असे ‘कीर्तन’ जरी जॉन केरी महाशयांनी केले असले तरी दहशतवाद आणि दहशतवादी संघटना यांना पोसण्याचा ‘तमाशा’ पाकडे सुरूच ठेवणार हे उघड आहे.

No comments:

Post a Comment