Total Pageviews

Monday 26 January 2015

फ्रान्सच्या अभिव्यक्तीवरील इस्लामी आक्रमण-प्रमोद वडनेरकर

एखाद्या देशातील समाजजीवनात उलथापालथ घडवून आणण्याची ताकद येथील वाङ्‌मयात असते. फ्रांसचे प्रसिद्ध कादंबरीकार मायकेल होऊलेबेन यांनी लिहिलेल्या इन्फंट टेरीबल ह्या नव्या कादंबरीत फ्रांसचे इस्लामीकरण सन २०२२ पर्यंत होण्याची शक्यता दर्शविली होती. एवढेच नव्हे, तर पुढे येणारा फ्रांसचा प्रेसिडेंट हा इस्लामला मानणारा असेल, असेही दाखविले होते. तेव्हढ्यावरून तेथील युरोपीयन युनीयनच्या लोकांनी कादंबरीविरुद्ध वादंग माजविले. त्यावेळी फ्रांसच्या युरोपीयन समाजाला ही गोष्ट अशक्य कोटीतील वाटत होती. पण आज जेव्हा फ्रांसमध्ये मुसलमानांची संख्या पन्नास ते साठ लाखापर्यंत पोहचली आहे. त्याच्या परिणामाची त्यांना भीती वाटायला लागली आहे. ह्या ८ ते १० टक्के मुसलमानांनी मागील फ्रांसच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांच्या निर्णायक मतांद्वारे अंदाज बदलवून टाकले होते. पुढच्या काळात तेथे मुसलमान समुदायाच्या लोकसंख्येचे प्रमाण निश्‍चित वाढणार आहे. कारण सिरिया, इराकमधून दहशतवादाचे प्रशिक्षण घेतलेले मुसलमान तरुण तेथे स्थलांतरित होतच असतात. एकेकाळी फ्रेंचांची वसाहत असलेल्या अलिनरीया या अफ्रिकी देशातूनही तेथे येणार्‍या मुसलमानांचा ओघ सुरूच आहे. आता ते तेथील समाजजीवनाचा एक भाग बनून गेले आहेत. अत्यंत कडक इमिग्रेशन कायदे करूनही हे स्थलांतर ते थांबवू शकलेले नाहीत. तुरुंगातून सुटलेले कैदी जिहादी बनून आजही फ्रांसमध्ये वावरत आहेत. इस्लामसाठी वाटेल ते करायला ते तयार असतात. त्यांना युरोपीयन देशातील हा धर्मनिरपेक्ष साम्यवाद पचनी पडणे शक्य नाही. त्याचाच परिणाम म्हणून ७ जाने. २०१५ ला पॅरिस येथील ‘शार्ली हेब्दोे’ या नियतकालिकाच्या कार्यालयावर अमानुष हल्ला झाला. कारण त्यांनी महंमद पैगंबरांचे व्यंग्यचित्र त्यांच्या पत्रिकेत छापले होते. दोन दहशतवाद्यांची अंदाधुंद गोळीबार करून १२ जणांना ठार केले. त्यात दोन पोलिस ऑफिसर्स देखील होते. गेल्या पन्नास वर्षांत झालेला हा फ्रांसमधला सर्वात अमानुष असा हल्ला होता. चार्ली हेब्दो हे नियतकालिक राजकीय व धार्मिक विसंगतीवर कार्टून काढून प्रसारित करत असते. देशोदेशीच्या वृत्तपत्र जगतात त्यामुळे ते आपले वेगळे वैशिष्ट्य राखून आहे. त्यांच्या या धारिष्ट्याबद्दल अनेकदा दहशतवादी गटाने त्यांना धमक्या दिल्या आहेत. २००६ मध्ये देखील त्यांनी महंमदाचे कार्टून छापले होते. त्यावर इस्लामी जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. याच वर्षानंतर अशाच एक व्यंग्यचित्राबद्दल त्यांच्या पॅरिस येथील कार्यालयावर बॉम्बफेक झाली होती. त्यानंतर त्याचे ते कार्यालय नेहमीच पोलिस संरक्षणाखाली होते. पण ते दोन पोलिस ऑफिसर्स काय करणार! या पूर्वनियोजित हल्ल्यात ते दोघेही मारले गेले. चार्ली हेब्दोचे संपादक स्टेफन चार्बोनिअर व इतर व्यंग्यचित्रकार यांचा मृत्यू हा व्यक्तिगत हल्ला नसून संपूर्ण पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचा आघात आहे. मुसलमान कलाकार इतर धर्मीयांच्या देवतांवर व्यंग्य करून जेव्हा एखादी कलाकृती पेश करतात, तेव्हा त्यावर विसंवाद होऊ नये, अशी त्यांची अपेक्षा असते. कुणी त्यांच्या विरोधात निदर्शने केली, तर त्यामुळे कलेचा आत्मा मारला जाईल, अशी अभिरुचीसंपन्नतेची कळकळ त्यात व्यक्त केली जाते. पण जेव्हा त्यांच्या महंमद पैगंबरांविषयी कुणी व्यंग्य प्रसिद्ध केले तर सारा समाज खवळून उठतो. त्यांचे जिहादी गट केवळ त्या कलेलाच नष्ट करण्याचे मनसुबे रचत नाहीत, तर कलाकारांच्या जिवावरही उठतात. ही जाणीव न होण्याइतपत आज मुसलमान समाज अशिक्षित राहिला आहे काय? त्यांच्या बुरसटलेल्या मानसिकतेला अजूनही खुल्या जगातील विचारांच्या देवाणघेवाणीची सवय झालेली नसल्याचे दिसून येते. वृत्तपत्रावरचा हा हल्ला एखादा अपघात समजून कुणालाही टाळता येणार नाही. कारण संपूर्ण पाश्‍चिमात्य वृत्तपत्रांच्या विचार स्वातंत्र्यावर इस्लामचा वचक बसावा म्हणून हा हल्ला मुद्दामून घडवून आणला होता. इस्लामवर कुणीही आपली व्यंग्यात्मक प्रतिक्रिया व्यक्त करावी इतका हा धर्म दुबळा नसून, त्याचे अनुयायी ते खपवून घेणार नाहीत, असा संदेश सर्वत्र पोहचावा ही त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच जिवावर उदार होऊन त्यांनी हा रक्तपात घडवून आणला. या झालेल्या उत्पातामागे दहशतवाद्यांचा उद्देश काहीही असो, पण फ्रांस सरकारपुढे त्यामुळे मोठा प्रश्‍न उभा राहिलेला आहे. त्यांनी यापुढे स्वतःवर निर्बंध लादून घ्यावेत की परत तेव्हढ्याच जोमानं पत्रकारितेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं? खरं तर अनिर्बंध लोकशाही आणि इस्लामिक कट्टरता यामधील संघर्ष आता हळूहळू संपूर्ण युरोपीय देशात व्यापून राहिला आहे; आणि दहशतवाद्यांमुळे त्याला एका युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे. फ्रांसमधल्या कायद्यानुसार अशा तर्‍हेने धार्मिक व राजकीय घडामोडींवर टिकाटिप्पणी करणं, कार्टूनद्वारा त्यावर व्यंग्य करणं हा गुन्हा नाही. पण आज जर त्यामुळे हिंसाचार वाढत असेल, तर त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. चार्ली हेब्दो हे फक्त इस्लामविरुद्धच आपले विचार व्यक्त करते असं नाही, तर सर्वच धर्मांविषयी व प्रस्थापित राजकारण्यांविषयी आपली प्रतिक्रिया व्यंग्यचित्रातून व्यक्त करत असते. फ्रेंच सरकारच्या अहवालानुसार अंदाजे एक हजार जिहादी हे इस्लामिक स्टेटची दहशत बसावी म्हणून फ्रांसमध्ये उतरले आहेत. पॅरिस येथील विमानतळावर अत्यंत कडक असे नियम अमलात असूनही त्याहून हे बाहेर आले आहेत. हा अमानुष हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांपैकी एक हा अफगाणिस्तान व पाकिस्तानमधून दहशतवाद्यांचं प्रशिक्षण घेऊन आला होता. सिरीया व इराकमधून होणारं मुस्लिम जिहादींचं फ्रांसमधील स्थलांतर हेही त्याला बर्‍याच अंशी कारणीभूत आहे. हा इस्लामिक दहशतवाद काही एकाच उद्देशाएवढा मर्यादित नाही, तर त्याचे अनेक पैलू आहेत. त्याची पार्श्‍वभूमी अन् उद्देशही वेगवेगळे आहेत. फ्रांसने आपली धर्मनिरपेक्ष छबी जपण्यासाठी शाळेतील मुलांना कुठलाही धार्मिक चिन्ह असलेला पोषाख घालण्यापासून बंदी केली आहे. तिथे सार्वजनिक ठिकाणी मुसलमानी पद्धतीचा बुरखा घालण्यावरही बंदी करण्याचा कायदा नुकताच अमलात आणलेला आहे. या कायद्याविरुद्ध तेथे मुसलमानी समुदायाने आंदोलने केली आहेत. हे दहशतवादी हल्ले त्याचीही प्रतिक्रिया असू शकते. तसे फ्रांस सरकारला हे दहशतवादी हल्ले नवीन नाहीत. अल्जेरियाच्या स्वातंत्र्याशी निगडित असलेल्या प्रश्‍नावरून १९९५ मध्ये एका हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला होता. फ्रांसची वृत्तपत्राकरिता अनेक वर्षांपासून अल कायदा या दहशतवादी गटाच्या निशाण्यावर आहे. सिरिया व इराकमधून अनेक जिहादी प्रशिक्षण घेऊन फ्रांसमध्ये परतत आहेत. त्यातल्याच एका मेहंदी नेमाऊच या जिहादीने मागच्याच वर्षी ज्यूइश म्यूझियममध्ये गोळीबार करून चौघांना ठार केले होते. ह्या शार्ली हेब्दोच्या हल्ल्याकडे इस्लामिक स्टेटच्या धर्मांधतेचा अजून एक प्रयोग म्हणूनही पाहता येईल. इस्लामिक स्टेटचे अधिकारी त्यांनी जिंकलेल्या प्रदेशातील अन्य लोकांवर ज्याप्रमाणे अमानुष अत्याचार करत आहे. अजूनही तेथे युद्धात सापडलेल्या तरुण स्त्रियांचा भर बाजारात लिलाव होतो. लहान मुलांना निर्दयपणे गनच्या टोकावर झेलले जाते. लहानशा गुन्ह्यासाठी दगडाने ठेचून मारणे किंवा हात छाटणे यासारख्या भयानक शिक्षा फारशी चौकशी न करता त्यांचे अधिकारीच अमलात आणतात. इस्लामिक स्टेटच्या अशा अमानवीय कृत्यांवर पाश्‍चिमात्य वृत्तपत्रे सतत टीका करत असतात. त्यांच्या या विचित्र कार्यपद्धतीवर असंख्य विनोदी किस्से सतत प्रसारित होत असल्यामुळे इस्लामिक स्टेट (खड) चे अधिकारी आता तिकडे विनोदाचा विषय झाले आहेत. केवळ बंदुकीच्या धाकावर आपले विचार पसरविणार्‍यांना अशा विनोदाचा भयंकर धोका वाटत असतो. पण त्यापलीकडे सुविद्य नागरिक काय करू शकणार आहेत. वृत्तपत्र केवळ कागदावरचीच लढाई लढू शकतात. त्याचा नवाब इस्लामिक स्टेट(खड) च्या पुरस्कर्त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून घ्यायला हरकत नाही, पण त्याऐवजी बंदुकीच्या गोळ्यांनी त्याचं उत्तर देणं हे निर्बुद्धतेचं लक्षण आहे. आजच्या सामाजिक व राजकीय धारणा या अनेक वर्षांच्या विचारमंथनातून निर्माण झाल्या आहेत. अनेक दृष्टींनी जग जवळ आल्यामुळे परस्परसौंहार्द वाढले आहे. जर कुणाला अशा वेळी आपल्या धर्मधारणेवर अजूनही विश्‍वास असेल, तर त्याने त्याचे समर्थन वादविवादाच्या माध्यमातून करायला पाहिजे. अशा भ्याड हल्ल्यातून इस्लामिक स्टेट (खड) ची अगतिकताच व्यक्त झाली आहे. त्यांना जर शस्त्रांचीच भाषा समजत असेल, तर तसेच प्रत्युत्तर द्यायला यापुढे प्रत्येक देशाला आपली शक्ती पणाला लावावी लागेल. फ्रांस, जर्मनी अशा अनेक युरोपीय देशात इस्लाम विरुद्ध जनमत आता वेगळ्या स्वरूपात व्यक्त होत आहे. जर्मनमध्ये चाळीस लाख, तर इंग्लंडमध्ये ३० लाख मुसलमान आहेत. त्यांचेवर अंकुश ठेवायला झशसळवर म्हणजे पॅट्रीऑटीक, युरोपीयन अगेंस्ट द इस्लामायझेशन ऑफ द ऑसीडेंट ही संस्था आता इस्लामिक हिंसाचाराविरुद्ध ठिकाठिकाणी निदर्शने करीत आहे. जर्मनीत त्यांचा प्रभाव जास्त आहे. त्यात आता न्यूयो नाझीचे समर्थकही शामील झाले आहेत. शार्ली हेब्दोच्या मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी पॅरिसमध्ये त्यानंतर महाप्रचंड मोर्चा निघाला. जर्मनी, इटली, स्पेन, पॅलेस्टाईन, इस्रायल अशा अनेक देशांतून दिग्गज नेते तेथे उपस्थित होते. युरोपीय देशातला हा १० लाखाचा मोर्चा अभूतपूर्वच म्हणावा लागेल. कदाचित त्यांना याद्वारे युरोपीय राष्ट्रांमधील एकजुटीचं प्रदर्शन करायचं असेल. पण तरीही यातून मूळ दहशतवाद्यांच्या हिंसाचाराचा प्रश्‍न सुटेल असे नाही. कारण जोपर्यंत या हिंसाचाराला इस्लाम मानणार्‍या जनतेकडून प्रतिसाद मिळतो, तोपर्यंत आपण काही चूक करतो याची जाणीव दहशतवाद्यांना होणार नाही. इस्लाम धर्मात त्याचा धर्म न मानणार्‍यांना खतम करावे असा आदेश असेलही, पण या काळात ती जिद्द बाळगणे सर्वस्वी मूर्खपणाचे आहे. इतर धर्मांप्रमाणे इस्लाममध्ये धार्मिक दृष्टीने संशोधन करून त्यात नव्या जगाच्या संदर्भात बदल करण्याचे प्रयोग झाले नाहीत. ह्या परिवर्तनशीलतेच्या अभावामुळे तेथे नवे मतप्रवाह येण्यास वाव नव्हता. सर्व जगावर राज्य करण्याच्या दृष्टीने तसेच धर्माच्या प्रचारार्थ त्या काळात तसे आदेश देण्यातही आले असतील, पण आज त्याकडे तर्कशुद्ध व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. इतरांप्रमाणे मुसलमान समुदायाने देखील शार्ली हेब्दो सारख्या घटनांच्या विरोधात मोर्चे काढून आपल्या प्रगतिशीलतेचा परिचय करून द्यायला हवा. लहानपणापासून मुलांना धार्मिक कट्टरतेचे धडे देण्याऐवजी त्यांच्या विचारात प्रगल्भता येईल व इतरांच्या विचारांचा आदर करण्याइतपत सोशीकता येईल, अशा तर्‍हेचे शिक्षण द्यायला हवे. त्याशिवाय हा हिंसाचार थांबणार नाही.

No comments:

Post a Comment