Total Pageviews

Tuesday 7 May 2013

CORRUPTION IN MAHARASHTRA

प्रभाकर पवार
गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंगला व नाशिकच्या पालकमंत्र्यांचा वरदहस्त असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर तसेच शाखा अभियंता जगदीश वाघ हे लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. विजय सिंगला यांनी पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांच्याकडे रेल्वे बोर्डावर बढती मिळवून देण्यासाठी काही कोटींची मागणी केली होती. त्याचा ९० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना विजय सिंगला व त्यानंतर लाच देणारे महेशकुमार हेही सीबीआयकडून पकडले गेले, तर नाशिकचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी सतीश चिखलीकर हेही बढत्या व बदल्यांसाठी पैसा जमा करताना पकडले गेले. रस्त्याच्या कामाच्या ३ लाखांच्या टेंडरमधील सहा टक्के हिस्सा (फक्त २२ हजार) घेताना चिखलीकर व जगदीश वाघ एप्रिलच्या अखेरीस पकडले गेले. त्यानंतर ऍण्टी करप्शनने त्यांच्या शासकीय बंगल्यात धाड टाकली असता घरातच कोट्यवधींची रोकड व कोट्यवधींचे सोने आढळून आले. चिखलीकरकडून तूर्तास १५ कोटी रुपयांची रोकड व सोने जप्त केल्याचे ऍण्टी करप्शनकडून रेकॉर्डवर आणले गेले आहे; परंतु चिखलीकरची बेनामी मालमत्ता ५०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍याकडे कोट्यवधीची बेहिशेबी रोकड व सोने सापडते याचा अर्थ या अधिकार्‍यांना मंत्री पाठीशी असल्यामुळे कुणाचेही भय वाटत नाही. त्यामुळेच त्यांनी खुलेआम पैसे मागायचे, न दिल्यास त्यांची कामे रखडवायचा धंदा सुरू केला होता. सतीश चिखलीकरसारख्या भ्रष्ट प्रवृत्ती आज पदोपदी आहेत. त्यामुळेच आज भ्रष्टाचार कमी व्हायला तयार नाही. लाच घेताना रंगेहाथ पकडले जाणारे पोलीस व महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी अधिक आहेत. त्यात आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची भर पडली आहे. गेल्या महिन्यात तर नेहरू नगर पोलीस ठाण्यातील ३७ पोलिसांना भ्रष्टाचारप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले. एकाच वेळेला एकाच पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायांना निलंबित करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. पैसे खाता खाता पैशानेच त्या पोलिसांना खाऊन टाकले. त्यांच्यावर घरी बसायची वेळ आली. माणसाला किती जरी पैसे मिळाले तरी तो थांबत नाही. त्याचे समाधान होत नाही. एक हजार विनाकष्ट मिळाल्यानंतर एक लाख कधी मिळतील याची तो वाट बघतो. लाख हाती आल्यावर तो काही कोटी रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न करतो. मग हळूहळू तो पैशाच्या जाळ्यात अडकतो. त्याची लालसा काही संपत नाही. ती वाढतच जाते. त्या लालसेपोटी मग त्याचा सतीश चिखलीकरप्रमाणे घात होतो. होती नव्हती ती सारी अब्रू चव्हाट्यावर येते. ऍण्टी करप्शनचे झंझट मागे लागते आणि मग तो आयुष्यातून उठतो. सारा मानसन्मान धुळीला मिळतो. ऍण्टी करप्शनच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागला की तो संपत नाही. त्यात त्याचे कुटुंबही होरपळून निघते. शारीरिक रोग होतात, टेन्शन वाढते आणि जीवनातील रसही निघून जातो. हे ऍण्टी करप्शनकडून ट्रॅप झालेल्या असंख्य अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेदनेतून उघडकीस आले आहे. तरीही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वर्तनात बदल होत नाही याचे आश्‍चर्य वाटते.
ऍण्टी करप्शनने ठरविले, त्यांना पुरेसा स्टाफ मिळाला तर खरोखर भ्रष्टाचाराचे निर्मूलन होऊ शकते; परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा आहे कुठे? भ्रष्टाचाराच्या तक्रारी येऊनही त्याची दखल घेण्यास ऍण्टी करप्शन सक्षम नाही. मुंबई ऍण्टी करप्शनचेच उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईमध्ये आज १६ एसीपी, २१ पोलीस निरीक्षक, १०० पोलीस हवालदार व कर्मचारी कार्यरत आहेत. दीड कोटींच्या या महाकाय मुंबईत ऍण्टी करप्शनचा हा स्टाफ किती ‘ट्रॅप’ यशस्वी करणार? मुंबई ऍण्टी करप्शनच्या कार्यालयात रोज हजारो लेखी तक्रारी येतात; परंतु सर्वच तक्रारींची कमी मनुष्यबळामुळे ऍण्टी करप्शन चौकशी करीत नाही. तपासाविना त्या तक्रारी दप्तरी दाखल केल्या जातात किंवा संबंधित विभागाकडे चौकशीसाठी पाठविल्या जातात. ऍण्टी करप्शनचा कोणताही एक तपास अधिकारी वर्षाकाठी जास्तीतजास्त ‘ट्रॅप’च्या तीन केसेस यशस्वी करू शकतो व १५ ते २० अपसंपदा केसेसच्या अर्जांची चौकशी करू शकतो. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात दरवर्षी ५० ते ६० सापळेच यशस्वी होतात. मुंबईत आज प्रचंड भ्रष्टाचार आहे. अख्खा देश बांधून होईल इतका काळा पैसा या मुंबईत आहे हे लेडीज बारमध्ये फेरफटका मारल्यावर व नवी मुंबईतील ‘कपल’ बारमध्ये सापडलेली कोट्यवधी रुपयांची रोकड पाहिल्यावर दिसून येते. तेव्हा भ्रष्टाचारात जसे शासकीय अधिकारी, कर्मचारी गुंतले आहेत तसेच राजकारणीही आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारीच बढत्या व बदल्यांसाठी राजकीय पुढार्‍यांना पैसे पुरवितात. नाशिकचा सतीश चिखलीकर हे त्यातील एक ताजे उदाहरण आहे. भ्रष्टाचाराने सार देशच बरबटला आहे. त्यामुळेच आपल्या देशातील प्रगती खुंटली आहे. देशातील मूठभर लोकांकडे सारा काळा पैसा एकवटला आहे. तेच गुंतवणूक करतात, तेच किमती वाढवितात आणि तेच गब्बर होत आहेत. सामान्य जनता मात्र दुष्काळाने होरपळून निघत आहे.

-

No comments:

Post a Comment