Total Pageviews

Thursday 16 May 2013

IPL SPOT FIXING

क्रिकेटच्या आयपीएलच्या बैलबाजाराला आता बेईमानीचा कलंक
 
क्रिकेटच्या आयपीएलच्या बैलबाजाराला आता बेईमानीचा कलंक लागला आहे. जगातल्या क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ही बेईमानी झाल्याने आणि त्यात भारतीय कसोटीपटू श्रीसंत याला अटक झाल्याने, बेईमानीची ही बदनामी सगळ्या जगभर झाली आहे. हा सगळाच प्रकार अतिशय संतापजनक आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघातून हा फिक्सिंगचा व्हायरस पसरला आहे. याच संघातीन तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगमध्ये भाग घेतल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या तीन खेळांडूसोबतच क्रिकेटवर सट्टा खेळत लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ११ बुकींनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली काही वर्षांपूर्वी भारताने अझरुद्दीन, अजय जडेजा अशा अगदी बिनीच्या खेळाडूंना आयुष्यभरासाठी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधून बाहेर काढण्याची जबर शिक्षा दिली होती. त्यापासून या लोकांनी काही धडा घेतलेला दिसत नाही.
क्रिकेट हा खेळ विलक्षण लोकप्रिय होण्यामागे, या खेळातील प्रत्येक चेंडूबरोबर येणारे नाट्य, अनिश्‍चितता, त्याबरोबर येणारी उत्कंठा, अशा गोष्टी कारणीभूत आहेत. क्रिकेटचे वर्णनचविलोभनीय अनिश्‍चिततांचा खेळ’ असे केले जाते. मात्र, या विलोभनीय अनिश्‍चिततांना लाच घेऊन लाजिरवाण्या निश्‍चिततांचा खेळ करण्याचा चंग बेईमान लोकांनी बांधला आहे. मॅच फिक्सिंग अवघड आहे आणि त्यात जबर शिक्षा होते, असे लक्षात आल्यावर त्यातून पळवाट काढत स्पॉट फिक्सिंगकडे हे सट्टेबाज वळले आहेत. मुळात सट्टा, मटका हा बेईमानीचाच धंदा! लोकांना झुलवायचे, त्यांना आशा दाखवायची आणि मोठ्या प्रमाणावर जुगारात पैसा लावायला लावून त्यांना बुडवत स्वतः गब्बर व्हायचे, असा हा बेईमानीचा धंदा आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूनंतर येणार्‍या अनिश्‍चिततेचा फायदा घेत लोकांना झुलवायचे, पुढचा चेंडू येईपर्यंत त्यावर सट्टा घ्यायचा आणि त्यात अनेकांना नादी लावून पैसे उकळायचे, असा हा काळा धंदा आहे. यात हमखास लोकांना बुडविण्यासाठी आपल्याला हवे तसे मैदानावर घडावे यासाठी खेळाडूंना फितूर करून या लोकांनी हे स्पॉट फिक्सिंग केले आहे. जास्त पैसा कमावण्याची हाव एकदा सुटली की, सारासार विवेक नष्ट होतो. मग श्रीसंत असो की आणखी कुणी! ज्यांना आपण काय करतो आहोत त्याचा विवेक नाही, आपण ज्या खेळाच्या बळावर इथवर आलो त्याच्याशी बेईमानी करू नये असे वाटणारा प्रामाणिकपणा नाही, चोरी उघड झाली तर आपल्या संपूर्ण आयुष्याचे नुकसान आपण करून घेतो आहोत याची जाणीव नाही, अशी खेळाडू मंडळी या सट्टेबाजांच्या जाळ्यात बरोबर अडकली. अतिशय रंगात आलेल्या आयपीएलचा सगळा बेरंग झाला आहे.
आयपीएलच्या सामन्यांना सुरुवातीपासूनच बेईमानीचा जणू शाप लागला आहे. क्रिकेटमधील रंगत वाढवत २० षट्‌कांत वेगवान क्रिकेट रसिकांसमोर खेळवत, मनोरंजन करण्याच्या कल्पनेतून या स्पर्धेचा उगम झाला असला, तरी या स्पर्धा खेळवणार्‍या लोकांनी सुरुवातीपासूनच यात बेईमानीला वाव ठेवला. सरकारचे कर भरता कमावलेला काळा पैसा यात गुंतवण्याचा जणू हा एक मार्ग आहे, अशा प्रकारे यात हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा आला. ते प्रकरण नंतर बाहेर आले. त्या सर्कशीचा रिंगमास्टर ललित मोदी हा अखेर पायउतार होऊन आरोपी म्हणून न्यायालयात चकरा मारू लागला. ‘पेरिले ते उगवते, बोलिल्यासारखे उत्तर येते
|’ या उक्तीप्रमाणे जे पेरले तेच जणू आता या स्पॉट फिक्सिंगच्या रूपाने उगवू लागले आहे.वास्तविक, अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात काही चूक नाही. मात्र, त्या आयोजित करताना त्याचे जे चित्र सुरूवातीपासून उभे केले जात आहे ते काही चांगले नाही. स्पर्धा आयोजित करण्यामागचा जो सकारात्मक चांगला संकल्प आहे तो आयोजनाच्या पद्धतीतून जगासमोर प्रकट झाला पाहिजे. येथे कमी कपड्यांत निरर्थक नाच करणार्‍या चीअर लीडर्स, बैलबाजारासारखे खेळाडूंचे होणारे जाहीर लिलाव, भडक जाहिरातबाजी यामुळे खेळाच्या आनंदापेक्षा हा एक चमकधमक दाखविण्याचा आणि खोर्‍याने पैसे ओढण्याचा धंदा आहे, असेच चित्र जगासमोर उभे राहते आहे. आता उघड झालेले स्पॉट फिक्सिंग हा त्या बीभत्स प्रदर्शनाचाच एक परिणाम आहे. हे सगळे ओंगळवाणे प्रदर्शन या स्पर्धेतून वजा केले, तरी यातील रंगत, आवड, प्रतिसाद यात काहीच फरक पडण्यासारखा नाही. मात्र, खेळ, त्यातील रंगत, क्रीडारसिकांचे मनोरंजन यापेक्षाही लोकांना नादी लावून पैसा कमावण्याचा नाद ज्यांना लागला आहे त्यांना या परिणामाची काही चिंता आहे असे दिसत नाही.
क्रिकेटला थेट मूल्यहीन धंदेवाईक रूप दिल्यामुळे त्यात या सट्टेबाजीला ऊत आला आहे. ही सट्टेबाजी होणार याचा अंदाज घेऊन, त्याला रोखण्याचे काही प्रयत्न व्हायला हवे होते, ते कणभरही झालेले दिसत नाहीत. गुन्हे घडणार नाहीत याची काळजी घेण्याला बहुधा या देशातील सुरक्षायंत्रणेला वेळ, सवलत, इच्छा, वाव असे काही दिसत नाही. या क्रिकेटमधील सट्टेबाजीने अनेकांना जीवनातून उठविल्याची उदाहरणे समोर येत आहेत. एक दोन दिवसांपूर्वीच क्रिकेटमधील सट्ट्यात पैसे हरल्यामुळे पैशाची गरज आहे म्हणून सख्ख्या चुलत भावाचे अपहरण करून खून केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. माणसाला समाजापासून, माणसाला संस्कृतीपासून आणि माणसाला देशापासून तोडणे, हाच चंगळवादाचा जाहीरनामा आहे. आयपीएलमधून हा जाहीरनामा खरा होताना दिसतो आहे. नाते, इमानदारी, देशभक्ती सगळे काही या चंगळवादाच्या खेळात विकायला काढलेले दिसते आहे. या सट्टेबाजी आणि फिक्सिंगचे धागेदोरे परदेशात आहेत, असे सांगितले जात आहे. फिक्सिंग प्रकरणाचा मास्टर माईंड परदेशात आहे. भारतात दहशतवाद आणि गुन्हेगारीचा नंगानाच घालणार्‍या अंडरवर्ल्डशी या फिक्सिंगचे संबंध आहेत, असे आता बाहेर येते आहे. त्यामुळे ही बेईमानी केवळ पैशासाठी खेळापुरती मर्यादित नाही, तर तिचा परिणाम आणि संबंध समाज आणि देशाची शांतता, सार्वभौमत्व याला आव्हान देणार्‍या गोष्टींशी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आयपीएलमधील ही फिक्सिंगची लाजिरवाणी गोष्ट जाहीर होताच, हे सामनेच रद्द करा, अशा प्रकारची ओरडही सुरू झाली आहे. कोणत्याही खेळात कोणत्याही विषयात माणसे आली की, त्याबरोबर अपप्रवृत्ती येण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे तो खेळच नको, ती स्पर्धाच रद्द करा, असा अततायी विचारही योग्य नाही. आयपीएलचे स्वरूप असे हवे की, त्यामध्ये अशा प्रकारच्या बेईमानीला, धंदेवाईकपणाला, पैशाची उधळण करण्याला, बेईमानीने पैसे कमावण्याला वाव आहे असे कुणाला वाटता कामा नये. मुळात स्पर्धा भरवणार्‍यांचा धंदेवाईकपणा मर्यादा ओलांडून पुढे जाता कामा नये. अशा प्रकारच्या लाजिरवाण्या फिक्सिंगमध्ये भाग घेणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हव्यात म्हणजे पुन्हा कुणाला अशा प्रकारच्या बेईमानीच्या वाटेला जाण्याची इच्छा होता कामा नये. मात्र, पूर्वी जे मॅच फिक्सिंगचे प्रकरण बाहेर आले त्यातील अझरुद्दीनसारख्यांना क्रिकेटमधून जरी हद्दपार केले, तरी कॉंग्रेससारख्या सत्तारूढ पक्षाने अल्पसंख्यकांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवत त्याला उत्तरप्रदेशातून उमेदवारी दिली. खासदार म्हणून संसदेत नेऊन प्रतिष्ठित केले. अशा प्रकारे बेईमानीचा धंदा केला तरी या देशात प्रतिष्ठा मिळण्याचे मार्ग बंद होत नाहीत, असे एक समीकरण या राजकीय उपद्व्यापामुळे समाजासमोर चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित झाले आहे. असे चुकीचे संकेत देणारे कॉंग्रेससारखे पक्ष याला जास्त जबाबदार आहेत.
शेवटी बेईमानी ही एक प्रवृत्ती आहे. नीतिमूल्यांचे संस्कार घर, शिक्षण आणि समाजातून प्रस्थापित केले, तरच समाज नीतीच्या मार्गावरून जात असतो. आपल्याकडे नीती, संस्कार असे शब्द उच्चारले की, त्याचा संबंध भलतीकडेच जोडून भगवेकरण... भगवेकरण अशी ओरड करण्याची एक टूम धूर्त, बेईमान लोकांनी सुरू केली आहे. मुळात तेथे जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत हे बेईमानीचे झंपिंग... झपांग... फिक्सिंग... झपांग या ना त्या स्वरूपात चालूच राहणार! गिली... गिली... करत शरमेने मान खाली घालण्याची वेळ येणार. नीतिमत्तेच्या संस्कारापासून ते स्पर्धेच्या आयोजनातील हेतूची स्पष्टता, पद्धती यात चोख दक्षता घेण्यापर्यंत काळजी घेतली, तरच या गोष्टी टाळता येतील, हे लक्षात घेतले पाहिजे! इमान विकण्याचा हा बेशरमपणाचा मार्ग बंद करण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन कठोर होत हे केलेच पाहिजे!

No comments:

Post a Comment