Total Pageviews

Monday 19 March 2012

शिवाजीराजांच्या शिवस्मारकाच्या प्रश्‍नावर महाराष्ट्रातच जी सरकारी लफंगेगिरी सुरू आहे ती बेशरमपणाची बेइमानीची हद्द आहे.
शिवस्मारकासाठी नाक का रगडता?
कासी हुकी कला जाती
मथुरा मसीत होती।
सिवाजी होतो
सुनति होत सबकी॥
जर शिवाजीराजे झाले नसते तर काशीची कळा गेली असती मथुरेत सर्वत्र मशिदी दिसल्या असत्या. जर शिवाजीराजे झाले नसते तर सर्व हिंदूंची सुंता झाली असती. कविराज भूषण याने शिवरायांचे केलेले हे वर्णन सार्थ आहे. यशवंतराव चव्हाण यांनी शिवरायांचे वर्णन फक्त एका वाक्यात नेटके केले, ‘शिवाजीराजे नसते तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या दरवाजापर्यंत पोहोचल्या असत्या.’ म्हणजे संपूर्ण हिंदुस्थान हाच पाकिस्तान झाला असता. असे हे शिवरायांचे शौर्य, थोरवी आणि कार्य. त्याचे पुन: पुन्हा पुरावे देण्याची गरज नाही. शिवराय म्हणजेच महाराष्ट्र! शिवराय म्हणजेच राष्ट्र! पण शिवाजीराजांच्या शिवस्मारकाच्या प्रश्‍नावर महाराष्ट्रातच जी बनवाबनवी आणि सरकारी लफंगेगिरी सुरू आहे ती बेशरमपणाची बेइमानीची हद्द आहे. भ्रष्ट, लुटारू कृपाशंकर यास वाचविण्यासाठी दिल्लीचे महाराष्ट्राचे राज्यकर्ते नुसता आटापिटा करताना दिसत आहेत. उद्या हे कॉंग्रेसवाले कृपाशंकरांचे स्मारक उभारण्यास मुंबईत जागा देतील, पण शिवबांच्या स्मारकासाठी महाराष्ट्राला दिल्लीच्या पायरीवर नाक रगडावे लागत असेल तर ती मराठ्यांची शोकांतिका आहे. इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास आहे असे छाती फुगवून सांगितले जाते ते फक्त छत्रपती शिवरायांमुळेच. याच शिवाजीराजांचे स्मारक अरबी समुद्रात मुंबईजवळ व्हावे यासाठी घोषणा झाल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री वगैरे लोक बोटीतून त्यासाठी खास सागरी सफर करून आले. एकंदरीत शिवस्मारकाच्या नावाखाली कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या मंत्र्या-संत्र्यांनी जीवाची मुंबई केली आता शिवस्मारक होणार म्हणजे होणारच! अशा गर्जना केल्या असल्या तरी नेहमीप्रमाणे केंद्रीय पर्यावरण खात्याने शिवस्मारकाच्या वाटेत कोलदांडा
घातला आहे. महाराष्ट्रातील शिवरायांच्या स्मारकास अडथळे निर्माण करण्याची हिंमत होतेच कशी? आणि कोणते ते तुमचे पर्यावरण खाते? अरबी समुद्र त्यांच्या बापाचा आहे काय? पण महाराष्ट्राचे कॉंग्रेजी राज्यकर्ते पडले पुचाट आणि शेळपट. छत्रपती शिवाजीराजे हे कॉंग्रेस पक्षाचे चार आण्याचेही सदस्य नव्हते. दिल्लीतील नेहरू, गांधी खानदानाशी त्यांचा संबंध नसल्याने शिवस्मारकाचा खेळखंडोबा महाराष्ट्रास उघड्या डोळ्यांनी पाहावा लागत आहे. समुद्रात शिवरायांचे स्मारक झाल्याने पर्यावरणास असे कोणते खतरे निर्माण होणार आहेत हे त्या बिनमेंदूच्या पर्यावरणवाल्यांनाच माहीत. जगभरात अशा थोर पुरुषांची स्मारके समुद्रात उभी राहिलीच आहेत. अमेरिकेच्या समुद्रात स्वातंत्र्यदेवतेचे अतिविराट स्मारक उभे आहे तिचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील पर्यटक तेथे येतच असतात. केरळ, तामीळनाडूच्या समुद्रातही स्मारके उभी झाली आहेत. मग मुंबईच्या अरबी समुद्रात शिवस्मारक उभे राहिल्याने हा समुद्र मागे हटणार आहे की समुद्रच आटणार आहे? याच समुद्रात भराव टाकून, समुद्र बुजवून जे सर्वबॅकबेचे भूखंड कॉंग्रेसवाल्यांनी लुटले तेव्हा कुठे गेला होता पर्यावरणवाल्यांचा धर्म? याच समुद्रात स्पीड बोटीने सपासप प्रवास करीत पाकिस्तानी कसाब मुंबईत उतरला तेव्हा त्या समुद्रपर्यावरण रक्षकांची डुलकीच लागली होती. समुद्रावर नुसती घाण करून ठेवली आहे. तो समुद्रकिनारा, चौपाटी हा प्रकार मुंबईतून तसा अदृश्यच झाला आहे. तेथे या पर्यावरणवाल्यांचे अजिबात लक्ष नाही. समुद्राचे विषारी गटार झाल्याने सागरी वनस्पती, मासे, सागरी जीव तडफडून मरत आहेत. त्याकडेही कुणाचे खास लक्ष दिसत नाही, पण मुंबईच्या समुद्रात शिवरायांचे स्मारक उभे राहणार म्हणताच पर्यावरणवाले विरोध करू लागले. मुंबईच्या समुद्रात शिवस्मारक म्हणजे तुमचे ते लवासा नव्हे. लवासाला जो न्याय लावता तोच न्याय शिवस्मारकास लावता येणार नाही. ‘लवासाला पर्यावरणाच्या कचाट्यातून मोकळीक मिळावी म्हणून कॉंग्रेस- राष्ट्रवादीवाल्यांच्या बंद दाराआड जोरबैठका सुरू आहेत. शिवस्मारकापेक्षा त्यांना लवासा महत्त्वाचे वाटत असेलही. तो त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग आहे. पण शिवस्मारकाची घोषणा करून ते असे अपमानास्पदरीत्या लटकून राहणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाला आहे त्यास विरोध करणे गरजेचे आहे. शिवस्मारकाचा घोळ घालून ते रखडवत ठेवणे ही बाब असह्य आहे. जर पर्यावरण खाते असे आडवे येणारच होते तर मग घोषणा करण्याआधी सर्व परवाने घेणे गरजेचे होते. पण शिवरायांच्या नावाने हात की सफाई करणार्‍या काही जातीय संघटनांना खूश करण्यासाठीच घाईगडबडीत स्मारकाची घोषणा केली गेली. शिवरायांचे महाराष्ट्रातील स्मारक आता पूर्णत्वास न्यावेच लागेल. शिवरायांचे गड-किल्ले हाच खरा आमच्या शौर्याचा, हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे. इतिहासाचे हे बुरुज ढासळत आहेत त्यांची निदान डागडुजी करणे तरी गरजेचे आहे. शिवनेरी, रायगड यासह अनेक जलदुर्गही उद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. या स्मारकांनाही मदतीचा हात द्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मार्गातील सर्व अडथळे वेळीच दूर करा. विधिमंडळात शिवस्मारकासाठी मावळ्यांनीहरहर महादेवचा गजर करीत हाती थर्माकोलच्या तलवारी उगारल्या, पण पर्यावरण खात्याला थर्माकोलच्या तलवारींची भाषा कळत नसेल तर महाराष्ट्राच्या म्यानात भवानी तलवार आहेच हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. शिवबांच्या तलवारीची धार बोथट झाली नाही हे पुचाट कॉंग्रेसवाल्यांना आता दाखवावेच लागेल!

No comments:

Post a Comment