Total Pageviews

Tuesday 20 September 2011

POLICE & GANESH CHATURTHI

गेला आठवडा पुण्यातील गणेश मंडळांचा होता. विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळला म्हणून, पारंपारिक वाद्ये वाजविली म्हणू आदल्या दिवशी दिलेल्या सूचनेनुसार विसर्जन मिरवणूकीचा रथ दहा फूट बाय दहा फूट आकारात केला नाही, गणपतीचा रथ ओढण्यासाठी बैलांचा वापर केला म्हणून पोलिसांनी गणेश मंडळांवर खटले भरले. त्याच्या विरोधात या सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद संपलेला आहे, याचेच हे चिन्ह आहे. रात्री बारा ते सकाळी पाच या काळात ध्वनीप्रदूषण होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही पोलिसांनी करण्यास कोणाचीच हरकत नाही; पण गणेशोत्सवापूर्वी झालेल्या बैठकीत जेव्हा पारंपारिक वाद्यांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे आश्वासन ज्येष्ठ पोलिस अधिकारी देतात आणि मिरवणूक संपली की गुन्हे दाखल केले जातात याला काय म्हणायचे? संपूर्ण राज्यात पारंपारिक वाद्ये वाजविल्याचा एकही गुन्हा गणेश मंडळांवर दाखल झाला नाही. मात्र, पुण्याचे पोलिस हे वेगळे असल्याने त्यांनी गुन्हे दाखल करून दाखविले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यातही मानाच्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिस्त लावायला पाहिजे असे अनेकांना वाटते. त्यात तथ्यही आहे. मात्र, शिस्त लावण्याची ही पद्धत असू शकत नाही. महिनाभर खपून तयार केलेले रथ कोणत्या, तरी एका घाशीराम कोतवालाला वाटले म्हणून गणेश मंडळांनी बाजूला ठेवावेत, हे म्हणणेही चुकीचे आहे. गेली अनेक वर्षे ग्रामदैवत कसबा गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढली जाते. तरीही त्यांनी बैलांचा वापर केला म्हणून खटला दाखल केला गेला. ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर त्यांच्या नगाऱ्याच्या गाड्याला बैल लावलेले होते म्हणून हा खटला आहे, अशी सारवासारव करण्यात आली. मिरवणुकीत किती आकाराचा गाडा असावा, किती पथके असावीत हे सगळे मुद्दे गणेशोत्सवाच्या अगोदर बैठक घेऊन सामोपचाराने सोडविणे शक्य आहे. तसे काही करायची मानसिकताच पोलिस दाखवित नाहीत. त्याबद्दल त्यांना जाब विचारण्याची हिंमत एकाही राजकीय पुढाऱ्यामध्ये नाही. आयुक्त बदलले की पोलिसांची धोरणे बदलतात. काही वर्षांपूर्वी ही मिरवणूक कार्यकर्त्यांची आहे, त्यांनी ती कितीही वेळ चालवावी, त्यात पोलिस हस्तक्षेप करणार नाहीत अशी मुलाखत तत्कालीन पोलिस आयुक्तांनी दिली होती.

यंदाच्या पोलिस आयुक्तांनी प्रत्येक मंडळापुढे दोनच पथके असावीत असा आदेश काढला. पुढच्या वषीर्चे आयुक्त आणखी काही वेगळे सांगतील. यामध्ये सुसूत्रता आणण्याची जबाबदारी कोणाची? गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले म्हणून अनेकांना आनंदही झाला; पण तो खरा नाही. गणेशोत्सव एका वेगळ्या वळणावर असताना पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या उत्सवात सहभागी होत असलेला सुशिक्षित युवकवर्ग त्यापासून दुरावणे हा सगळ्यात मोठा तोटा ठरणार आहे. तो होऊ नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत

No comments:

Post a Comment