Total Pageviews

Wednesday 25 May 2011

DAWOOD FAMILY ARTICLE IN SAMANA

भाईंच्या साम्राज्याला सुरुंग
चेंबुर ते पाकमोडिया स्ट्रीट
क्बाल हसन शेख इब्राहीम कासकर (५२) हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अतिरेकी दाऊद इब्राहीमचा चौथ्या क्रमांकाचा भाऊ! शाबीर, दाऊद, नुरा, इक्बाल, अनीस मुस्तकीम व हुमायून असे हे सात भाऊ. त्यातील शाबीर व नुरा हे पैगंबरवासी झाले. शाबीर हा १९८१ साली प्रभादेवी पेट्रोल पंपाजवळ पठाण टोळीतील आमीरजादा व आलेमजेबकडून मारला गेला, तर नुरा याचे अलीकडेच हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानात निधन झाले. दाऊदच्या पाच बहिणींपैकी एक बहीण सईदा ही रत्नागिरीच्या मुमके गावी नदीत पडून मरण पावली. हयात असलेल्या अन्य चार बहिणींपैकी नागपाडा, गार्डन अपार्टमेंट येथे राहणारी हसिना पारकर सध्या दक्षिण मुंबईत दाऊदपेक्षाही अधिक प्रकाशात आहे. तिचा नवरा इब्राहीमला अरुण गवळी टोळीच्या गुंडांनी हॉटेलात घुसून १९९२साली गोळ्या घातल्या आणि हसिना नावाची ‘गॉडमदर’ उदयाला आली. त्यानंतर आता दाऊदनंतर इक्बाल कासकरच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्या मंगळवारी दाऊदच्या पाकमोडिया स्ट्रीट येथील बालेकिल्ल्यात घुसून इक्बालचा अंगरक्षक कम वाहनचालकावर गोळीबार करून त्याला ठार मारण्यात आले. हा हल्ला दाऊदला इशारा देण्यासाठी छोटा राजनने घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु जोपर्यंत सूत्रधार सापडत नाही तोपर्यंत इक्बालच्या अंगरक्षकावरील हल्ल्याचे खरे कारण कळू शकणार नाही, परंतु दाऊदच्या इलाक्यात घुसून गोळीबार करण्याचे शूटरनी दाखविलेले धाडस म्हणजे दाऊदला प्रचंड हादराच असल्याचे सांगण्यात येत आहे.
१९८४ साली करीम लालाचा भाचा समद खानने पाकमोडिया स्ट्रीटमधील डांबरवाला इमारतीसमोर बसलेल्या इक्बाल कासकरवर प्रथम असाच गोळीबार केला होता. त्यावेळीही इक्बाल नाट्यमयरीत्या बचावला होता. एक गोळी त्याच्या डोक्याच्या पाठच्या भागाला चाटून गेली आणि इक्बाल वाचला. डोंगरी पोलीस ठाण्यात समद खानविरोधात गुन्हा दाखल झाला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आपला भाऊ इक्बालवरील हल्ल्याचा बदला दहाबारा दिवसांतच घेण्यात आला. ४ ऑक्टोबर १९८४ रोजी गिरगाव येथील सिक्का नगर येथे दाऊद, अनीस, छोटा राजन, मजीद, हमीद व रमा नाईक यांनी फिल्डिंग लावून समद खानला उडविले. समद खान म्हणजे एक जितेजागते क्रौर्य होते. तो जर टिकला असता तर त्याने दाऊद टोळीच संपविली असती. दाऊदने हे सारे हेरले आणि समदचाच प्रथम खात्मा केला. या हल्ल्यानंतर दाऊद व त्याच्या सर्व भावंडांनी मुंबई सोडली आणि सुरक्षित अशी दुबई गाठली.
पाकमोडिया स्ट्रीट हा दाऊदचा अड्डा होता. हाजी मुसाफीरखाना या इमारतीमधील पहिला माळा तर दाऊदच्याच गुंडांच्या ताब्यात होता. सतीश राजे, खलीद पेहलवान, लंबू शकील, अनीस, रईस फारुकी व दाऊद या इमारतीमधून अंडरवर्ल्डची सूत्र हलवीत होते आणि मुंबईवर राज्य करीत होते. पाकमोडिया स्ट्रीटवरील डांबरवाला इमारत तर इक्बाल कासकरच्याच ताब्यात होती. पाकमोडिया स्ट्रीटवर दाऊदचेच साम्राज्य होते, परंतु आता त्याला तडा गेला आहे. एका तपानंतर (२००३ साली) मुंबईत परतलेल्या इक्बाल कासकरला आता जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. त्याने त्याचा भाऊ शाबीर व मेहुणा इब्राहीम पारकरचा उघड्या डोळ्यांनी अंत पाहिला असतानाच आता त्याच्या अंगरक्षकालाही प्रतिस्पर्धी टोळीने ठार करून दाऊद व इक्बालला हादरा दिला आहे. इक्बालची दुबईत आजही कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. त्याची मुले दुबईतच केंब्रिज शाळेत शिकली आहेत. दुबईत इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय असताना तो मुबईत पुन्हा का परतला याचेच सार्‍यांना कोडे आहे. दाऊदची अर्धीअधिक फॅमिली दुबईत वास्तव्याला आहे. मग इक्बाल मुंबईत का आला? याचे उत्तर एकच आहे, दाऊदचीच मुंबईतील बेनामी मालमत्ता सांभाळणे! परंतु आता काळ बदलला आहे. दाऊदच्या काळात सारे काही मॅनेज होत होते. पोलिसांना, सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी घेऊन प्रकरणे दडपता येत होती. आपला हेतू साध्य करून घेता येत होता, परंतु आता सार्‍यांच्या नजरा तुमच्यावर रोखल्या गेल्या आहेत. कुणा अधिकार्‍याने मदत करायची ठरविली तरी तो तुम्हाला करू शकत नाही इतकी पारदर्शकता कामात आली आहे. त्यामुळे दाऊदचे साम्राज्य सांभाळणे तितके सोपे नाही. आता प्रसिद्धी माध्यमांमुळे भलेभले जेलमध्ये गेले आहेत. सुरेश कलमाडी स्वत:चे राज्य दिल्लीत असूनही स्वत:ला वाचवू शकले नाहीत. अण्णा द्रमुकचा मंत्री राजा व खासदार कनिमोझीलाही जेल कस्टडी झाली. मग काळे धंदे करून इक्बाल कासकर तरी कसा वाचेल? त्यालाही शेवटी त्याच मार्गाने जावे लागणार आहे. दाऊद टोळीने कुठे जाऊन कुणावर हल्ले केले नाहीत? मग आता पाकमोडिया स्ट्रीट या त्याच्या बालेकिल्ल्यात घुसून त्याला कुणी आव्हान दिले असेल तर ती त्याच्याच कर्माची फळे असल्याचे अंडरवर्ल्डमध्ये बोलले जात आहे. चेंबूर टिळकनगरच्या इलाक्यात घुसून भरत नेपाळीने फरीद तनाशाला ठार मारले आणि छोटा राजनला हादरा दिला. म्हणजे अंडरवर्ल्ड डॉनच्याच पायाखालची आता वाळू सरकू लागली आहे. त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. अमर नाईक चकमकीत मारला गेला, अश्‍विन नाईकने अंडरवर्ल्डमधून रिटायरमेंटच घेतली. अरुण गवळी जेलमध्ये आहे. दाऊद व छोटा राजन या आजच्या टोळ्यांना घरघर लागली आहे. मग आता शिल्लक कोण राहिले? पुजारी व शेट्टी या काय टोळ्या आहेत? मुंबई पोलिसांनी ठरविले तर त्यांची वळवळ कधीच थांबेल. पोलिसांच्या चकमकी थांबल्यामुळेच या किड्यांची फसफस सुरू आहे.

No comments:

Post a Comment