Total Pageviews

Thursday 28 April 2011

ECONOMIC SECURITY देशातील प्रमुख ३४ कंपन्यांच्या भागभांडवलापैकी ३० टक्के भांडवल विदेशी

ECONOMIC SECURITY
देशातील प्रमुख ३४ कंपन्यांच्या भागभांडवलापैकी ३० टक्के भांडवल विदेशी गुंतवणूक संस्थांकडे
कंपन्यांचे व्यवस्थापन दीर्घकालीन योजनांकडे लक्ष न देण्याची शक्यता
जागतिकीकरणात निर्बंधरहित व्यापार म्हणजेच मुक्त व्यापार अपेक्षित आहे. असा मुक्त व्यापार केवळ वस्तूंच्या बाबतीत नव्हे तर शेतमाल, सेवा, गुंतवणूक, इतकचे नव्हे तर बौद्धिक संपदेबाबतही असावा असा आग्रह आहे. एका देशातून दुसऱ्या देशात सहजतेने, केव्हाही, कितीही गुंतवणुकीचा प्रवाह असावा यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या करारातील एक 'व्यापार संबंधी गुंतवणूक करार' (ट्रिम्स) करण्यात आला. भारतासह सर्वच सभासद देशांनी आपापल्या देशाची दारे विदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली. गेली सुमारे दोन दशके मुक्त गुंतवणूक बऱ्याच अंशी सुरू राहिली. त्यातून काही फायदे झाले तर काही भयानक प्रश्न उभे राहिले. त्यातील एक महत्त्वाचे आव्हान आहे 'हॉट मनी' किवा 'अति शीघ्र चलायमान पैसा.गुंतवणूकयोग्य भरपूर पैसा असणारे जगभरातील गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी ते जगातील विविध देशांमधील व्याजदर, शेअर बाजारातील स्थिती, कंपन्यांचे कर्जरोखे, शासकीय प्रतिभूती यावर बारकाईने लक्ष ठेवतात. ज्या देशात अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण होते तेथे ते रक्कम गुंतवितात. त्यापेक्षा चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता अन्य देशात दिसली तर पहिल्या देशातील गुंतवणूक मोडून दुसऱ्या देशात गुंतवितात. साहजिकच त्यांची अशी गुंतवणूक अत्यल्प काळासाठी असते. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अनुकूल व्याजदर व परतावा (लाभांश, नफा इ.) यांचा लाभ घेण्याच्या इराद्याने एका देशातून दुसऱ्या देशात प्रवाहित होणाऱ्या अशा पैशास 'हॉट मनी' असे म्हणतात. अल्प काळात अत्युच्च परताव्याचा दर मिळण्यासाठी गुंतवणूकदार आपला पैसा जगातील वित्त बाजारपेठात नियमितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुंतवत राहतात. अशा सतत फिरणाऱ्या पैशाला हॉट मनी किवा अति शीघ्र चलायमान पैसा संबोधतात. अर्थातच असा पैसा कमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या देशातून अधिक उत्पन्न देणाऱ्या देशाकडे प्रवाहित होतो.पैशाची गुंतवणूक करणाऱ्यात बँका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंडस्, हेज फंडस्, बिगर बँकिग वित्तीय संस्था, खासगी व्यक्ती व कंपन्या यांचा समावेश होतो. ते बँकांतील ठेवी, शासकीय प्रतिभूती, कर्जरोखे यावरील व्याजदरांची छाननी करून गुंतवणूक करतात; पण त्याच बरोबर शेअर बाजारातील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याचाही विचार करतात. ज्या देशातील शेअर बाजारात तेजी असेल किवा तेजी येण्याची शक्यता त्यांना वाटत असेल अशा देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्प काळात ती विकून झटपट नफा कमविण्यासाठी असा शीघ्र चलायमान पैसा दुसऱ्या देशात झटपट फिरत असतो.
:
परिणाम : अधिक व्याजदर देणारे देश किवा प्रतिभूती या सामान्यत: जोखीमयुक्त असतात. गुंतवणूकदारांना त्यातील गुंतवणुकीचे जास्त उत्पन्न मिळते; पण रक्कम बुडण्याची जोखीमही घ्यावी लागते. त्यामुळे कर्ज उभारणारे देश अशा हॉट मनीचा तात्पुरता थांबा असतात. अधिक व्याजदराचे आमिष दाखवून ते आपली तूट भरून काढण्यासाठी कर्जदारांना आकृष्ट करतात. परिणामत: भांडवल निर्गमन (कॅपिटल फ्लाइट) आणि गैर-कानुनी वित्तीय प्रवाह यांना प्रोत्साहन मिळते. कर्जाची गरज असलेल्या विकसनशील देशांच्या दीर्घकालीन वित्तीय गरजा पूर्ण होत नाहीत. अल्पकालीन उच्च व्याजदराचे कर्जरोखे विकून शासनास कर्ज उभारावे लागते आणि परिणामी अशी गुंतवणूक त्या देशात फारच अल्पकाळ टिकते. १९९० च्या दशकात विदेशी अल्पमुदतीची गुंतवणूक एकाएकी आणि एकदम देशातून अन्य देशात गेल्यामुळे मेक्सिको आणि अग्नेय आशियातील देशात महासंकट उभे राहिले होते. भांडवलाचा असा अतिजलद प्रवाह अर्थव्यवस्थांना खूपच अस्थिरतेकडे नेतो. जेव्हा अल्प काळासाठी विदेशी गुंतवणूक देशात येते, तेव्हा त्या देशाची विदेशी चलन गंगाजळी वाढते. परिणामत: त्या देशाच्या चलनाचा विनिमय दर सुधारतो. याउलट ज्या देशातून हॉट मनी एकाएकी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो तेव्हा त्या देशाचा बॅलन्स ऑफ पेमेंट नकारात्मक होतो आणि चलनाचा विनिमय दर घसरतो. चलन सशक्त झाले की निर्यात करणे अवघड होते कारण जागतिक बाजारपेठेत त्या चलनात निर्यात महाग होते. याउलट विदेशी चलन विनिमय दर घसरला की निर्यात स्वस्त होते म्हणून वाढते. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम देशाच्या चलन गंगाजळीवर, विनिमय दरावर आणि म्हणून आयात-निर्यातीवर होतो. दीर्घकालीन गुंतवणुकीने असा परिणाम वारंवार होत नाही. परंतु हॉट मनी सतत चलायमान असल्याने देशाचा विदेशी व्यापार अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडतो. हॉट मनीची गुंतवणूक जागा शेअर बाजार असेल तर अनिश्चितता आणखी वाढते. गुंतवणूकदार देशातील चांगल्या कंपन्यांचे समभाग खरेदी करतात. त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रचंड रकमांमुळे शेअर्सचे भाग गगनाला भिडतात. त्यांना जेव्हा दुसऱ्या देशात यापेक्षा चांगली गुंतवणुकीची संधी मिळते तेव्हा ते येथील समभाग झटपट विकून मोकळे होतात. यात खऱ्याखुऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता असते. उपाय : देशाची तात्पुरती विदेशी चलनाची अथवा कर्जाची गरज भागविण्यासाठी जास्त उत्पन्नाचे गाजर दाखवून अल्प काळासाठी विदेशी पैसा आकृष्ट केला तर चलन बाजार, शेअर बाजार, विदेशी विनिमय बाजार आणि पर्यायाने अर्थव्यवस्था अस्थिर होते. भांडवल निर्गमन हते तसेच गैरकानुनी वित्तीय प्रवाहांनी अर्थव्यवस्था बाधित होते. देशातील बँका व गुंतवणूकदार यांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास टिकत नाही. देशाचा विकास होत नाही. दीर्घकालीन विकास धोरण राबविता येत नाही म्हणून हॉट मनी रोखण्यासाठी देश उपाययोजना करतात. उदा. चिली या देशाने कोणतीही विदेशी गुंतवणूक किमान एक वर्षासाठी असायला हवी असे बंधन घातले. शेअर बाजार, विदेशी चलन बाजार यातील फॉर्वर्ड ट्रॅन्झॅक्शन्सवर (वायद्याचे व्यवहार) इस्त्राइल, ब्राझील, तैवान इ. देशांनी काही मर्यादा घातल्या, तर द. कोरियासारख्या देशांनी विदेशी येणाऱ्या पैशांवर कर आकारणीचा प्रस्ताव आणला. थायलंडने विदेशी गुंतवणुकीवर मिळालेल्या नफ्यावर कर आकारणी व विदेशी चलनाच्या प्रवाहावर 'टोबिन टॅक्स' लावण्याची तयारी केली. भारताची स्थिती- भारताची उभरती अर्थव्यवस्था ही जगभरातील गुंतवणूकदारांसाठी एक संधी आहे. म्हणून गेल्या दोन दशकात विशेषत: अग्नेय आशियातील चलन संकटानंतर आणि अमेरिकेतील २००८ च्या वित्तीय संकटानंतर भारतात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येत आहे; परंतु त्यातील मोठा भाग अल्पकालीन शेअर बाजारातील गुंतवणुकीत आहे. देशाच्या एकूण विदेशी चलन गंगाजळीपैकी मार्च २०१० रोजी ५८ टक्के हिस्सा अशा अस्थिर भांडवली जमेतून होता. (मार्च २००९ रोजी तो ४८ टक्के होता.) यात अल्पकालीन कर्जे व भांडवल बाजारातील गुंतवणुकीचा समावेश आहे. हॉट मनीमुळे रुपयाचा विनिमय दर अस्थिर झाला आणि तो रु. ३९ ते रु. ५२ प्रतिडॉलर इतक्या पट्ट्यात फिरत असल्याचा अनुभव आला. जानेवारी २०११ या महिन्यात भारतीय शेअर बाजारात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रु. ९३०० कोटींचे शेअर्स विकून पैसा बाहेर नेला. देशातील प्रमुख ३४ कंपन्यांच्या भागभांडवलापैकी ३० टक्के भांडवल विदेशी गुंतवणूक संस्थांकडे आहे. त्यांच्या विकण्याने स्थानिक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते असा अनुभव आहे. शिवाय त्यांना कंपनी चालविण्यात स्वारस्य नाही तर केवळ अल्पकालीन नफा मिळविण्यास स्वारस्य आहे. अशा स्थितीत कंपन्यांचे व्यवस्थापन दीर्घकालीन योजनांकडे लक्ष न देण्याची शक्यता आहे. विदेशी चलनाच्या तात्पुरत्या गरजेपोटी किवा सहजपणे येणाऱ्या गुंतवणुकीच्या आशेने हॉट मनीकडे दुर्लक्ष झाल्यास अर्थव्यवस्थेस ते महागाचे पडू शकते इतकेच.

No comments:

Post a Comment