Total Pageviews

Wednesday 27 April 2011

720 किलोमीटरची किनारपट्टी सुरक्षित

गांभीर्य नसलेले राजकीय नेते, स्वतःच मश्‍गूल असलेली नोकरशाही, किनारपट्टीच्या रक्षणासाठी अयोग्य नौका वापरणारे नौदल आणि तटरक्षक दल अशी सध्याची स्थिती गंजलेली यंत्रणा कधी दुरुस्त होणार? 720 किलोमीटरची किनारपट्टी सुरक्षित NATIONAL SECURITY IS A MOVEMENT WHICH MUST REACH ALL PATRIOTIC INDIANS http://brighemantmahajan.blogspot.com/ मुंबईवर पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेला २ १/२ वर्षे पूर्ण झाली. पुन्हा असा हल्ला झालाच, तर आपण आपल्या देशात खरोखर सुरक्षित आहोत का? महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर सर्वत्र आनंदीआनंद आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांसारखी दले संभ्रमाच्या स्थितीत काम करत आहेत. गुप्तचर विभागही पुरेसा सक्षम नाही. कशाचे गांभीर्य नसलेले राजकीय नेते, स्वतःच मश्‍गूल असलेली नोकरशाही, किनारपट्टीच्या रक्षणासाठी अयोग्य नौका वापरणारे नौदल आणि तटरक्षक दल अशी सध्याची स्थिती आहे.मुंबईची सागरी सुरक्षा कडेकोट केली जाईल, अशी आश्‍वासने देण्यात आली खरी; मात्र हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही ही सुरक्षा दैवाच्याच हवाली असल्याचे दिसत आहे. "26/11' नंतर कफ परेड, राजभवन अशा "व्हीआयपी' किनारपट्टीवरच सुरक्षा वाढवली; इतर किनारपट्ट्या मात्र मोकळ्याच आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून स्थानिक मच्छीमारांना "स्मार्ट कार्ड' देण्यात येतात. पोलिस त्यासाठी पाच-पाच हजार रुपये घेतात, असा आरोप महाराष्ट्र मच्छीमार समितीच्या अध्यक्षांनी केला आहे. राज्य सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या 29 गस्तीनौकांपैकी पाच नौका सागरी पोलिसांत दाखल होत असून, पुढील पाच नौका नोव्हेंबर महिन्यात, तर उर्वरित 19 नौका जानेवारी 2012 मध्ये दाखल होतील. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय म्हणजे सर्व काही ठीक झाले, असे नाही. या निर्णयांची पूर्तता होण्यासाठी ज्या काही कार्यपद्धतीमधून जायचे असते ते पाहता, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा लवकर सुरक्षित होईल, असे वाटत नाही. योजना आणि निधी तयार आहे; परंतु अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा नाही. कूर्मगतीने चालणारी यंत्रणा, भ्रष्टाचार राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे देशाच्या संरक्षणाचा बोजवारा उडाला आहे.मच्छीमारीच्या ट्रॉलरसह पाच टन वजनापर्यंतच्या सर्व छोट्या नौकांना "एआयएस' यंत्रणा बसविण्याची शिफारस करण्यात आली आहे. किती कालमर्यादेत महाराष्ट्र सरकार सर्व जहाजांची नोंदणी करणार आहे आणि किनारपट्टीवरील कोट्यवधींच्या लोकसंख्येला ओळखपत्रे देणार आहे? मुंबईभोवती समुद्रात फिरणाऱ्या सुमारे 28 हजार नौकांची नोंदणीदेखील झालेली नाही. किनारपट्टीवर रडारचे जाळे विणण्यास किती वेळ लागणार आणि स्वयंचलित ओळख यंत्रणा कधी बसणार?
सागरी मार्गावर गस्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या नौका मागविण्यात येणार होत्या. त्यांपैकी अवघ्या तीन आल्या. त्या कशा वापराव्यात याचे संबंधित यंत्रणेला प्रशिक्षण मात्र अजून दिले गेलेले नाही. पोलिसांना अत्याधुनिक हत्यारे त्यांची जीवितहानी टाळण्यासाठी बुलेटप्रूफ जाकिटे देण्याबद्दल चर्चा झाली; फक्त अंमलबजावणी बाकी आहे. पासपोर्ट वितरणातील बेजबाबदारपणा थांबलेला नाही. गेल्या वर्षभरात त्रुटी दाखविणाऱ्या अनेक घटना उघडकीस आल्या; तथापि केंद्र आणि राज्य सरकार कार्यपद्धती सुधारायला तयार नाही. राम प्रधान समितीने सुरक्षाविषयक उपाय सुचविले. त्यावरील कृती समितीची गेल्या वर्षभरात एकही बैठक झालेली नाही. पुरेसे प्रशिक्षण नसल्याने 40 हजारांचे मुंबई पोलिस दल दहा दहशतवाद्यांशी धड सामना करू शकले नाही. घुसखोरी रोखण्यासाठी प्रत्यक्ष ताबारेषेवर तैनात असलेल्या, तसेच जम्मू-काश्‍मीर आसाममध्ये दहशतवादविरोधी मोहिमेत गुंतलेल्या लष्करी तुकड्यांबरोबर पोलिसांना प्रशिक्षण द्यावयास हवे. प्रशासकीय काम आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी गुंतलेल्या पोलिसांना सामान्य माणसाच्या रक्षणासाठी मोकळे करायला हवे. पोलिस मुख्यालय अतिमहत्त्वाच्या व्यक्तिरक्षणासाठीच फक्त असल्याची भावना सामन्यांना अस्वस्थ करते. सागरी सुरक्षेची स्थिती सुधारण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलातील माजी सैनिकांना पोलिसांनी भरती करून घ्यावे. लढायची ऊर्मी जागृत करण्यासाठी "नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड' (एनएसजी) आणि लष्करातील निवृत्तांना पोलिसांनी भरती करावे. घुसखोरी रोखण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाने महाराष्ट्र तमिळनाडूत "ताशा' आणि "स्वान' या मोहिमा सुरू केल्या; पण त्या निष्फळ ठरल्या नसत्या, तर "26/11' ची घटना घडलीच नसती. सध्या गरज आहे ती नौदल, तटरक्षक दल, पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि विविध सरकारी मंत्रालयातील समन्वयाची. दहशतवादाचा सैतान गेलेला नाही; फक्त त्याचे लक्ष सध्या दुसरीकडे आहे. याचाच अर्थ, गंजलेली यंत्रणा दुरुस्त करावी लागणार आहे. दहशतवादाच्या दृष्टीने आपण सोपे लक्ष्य होतो; आजही आहोत

PASS IT ON TO ALL YOUR FRIENDS & RELATIONS

No comments:

Post a Comment