Total Pageviews

Monday 8 January 2024

#भारतीयांनो#BOYCOTT MALDIVES# मालदीव पर्यटनावरती बहिष्कार घाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप बेटांवरील पर्यटनाला चालना देणाऱ्या ‘X’ वरील पोस्टनंतर, प्रसार माध्यमांवर मालदीवचे राजकारणी, सरकारी अधिकारी विरुद्ध भारतीय (सोशल मीडिया वापरकर्ते) असे युद्ध सुरु झाले आहे. या आठवड्याची सुरुवातच या वादाने झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या भेटीचा संदर्भ देत, या प्रदेशाच्या सौंदर्याची प्रशंसा करणारी एक पोस्ट केली, या स्थळाविषयी कौतुक करताना पंतप्रधान मोदी लिहितात, ‘ज्यांना स्वतःतील साहसाला गवसणी घालायची आहे, त्यांच्या यादीत लक्षद्वीप असणे आवश्यकच आहे.’ असे असले तरी त्यांच्या अधिकृत निवेदनात, पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही भारतीय सरकारी अधिकाऱ्याने लक्षद्वीपचा प्रचार करताना मालदीव किंवा पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या इतर कोणत्याही बेटं असलेल्या राष्ट्राचा उल्लेख केलेला नाही. असे असतानाही सोशल मीडियावर मात्र मालदीवच्या नागरिकांकडून अश्लाघ्य भाषेत टीका सुरू झाली, याच पार्श्वभूमीवर मालदीव सरकारच्या भारताबाबतच्या भूमिकेशी त्याचा नेमका संबंध कसा आहे, हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

मालदीवमधून भारताविरोधात अपप्रचार का सुरु झाला?

पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टनंतर लगेचच, मालदीवच्या काही प्रमुख सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आक्षेपार्ह, वर्णद्वेषी, विद्वेषपूर्ण भाषेत मोठ्या प्रमाणावर भारतीयांना तसेच पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यातील भाषा अपमानजनकच होती, टीका करणाऱ्यांमध्ये मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शियुना याही होत्या, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना विदूषक आणि इस्रायलच्या हातातील कठपुतळी म्हणून हिणवले. आणि त्या पुढे #VisitMaldives #SunnySideOfLife” असे हॅशटॅग्स जोडले. ही पोस्ट आता डिलिट करण्यात आलेली असली तरी या पोस्टमध्ये शियुना यांनी भारताची तुलना गायीच्या शेणाशी केली आहे. मालदीवमधील युवा सशक्तीकरण, माहिती आणि कला मंत्रालयातील शियुनाच्या सहकारी, मालशा शरीफ यांनी ही भारत आणि लक्षद्वीपमधील पर्यटन मोहिमेविरुद्ध अशाच प्रकारची अवमानकारक टीका केली. मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या एका सदस्यानेही फ्रेंच पॉलिनेशियातील बोरा बोरा बेटांचा एक फोटो शेअर केला आणि तो फोटो मालदीवमधील एका बेटावरील रिसॉर्टचा आहे असाही दावा केला. आणि त्या खाली लिहिले, ‘मालदीवमधील सूर्यास्त’. तुम्हाला हे लक्षद्वीपमध्ये दिसणार नाही. 

No comments:

Post a Comment