Total Pageviews

Tuesday, 22 October 2019

लष्कराची अभिनंदनीय कारवाई!-TARUN BHARAT-22-Oct-2019एयर स्ट्राईकआणि सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्यामुळे, भारताने रविवारी पुन्हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी गुलाम काश्मीरच्या नीलम आणि लिपा घाटीत लष्करी कारवाई केली. या धडाकेबाज कारवाईत पाकिस्तानचे 10 जवान आणि हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मदचे जवळपास दोन डझनावर अतिरेकी मारले गेले. या कारवाईत लष्कराने चार लॉन्चिंग पॅडही उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे या भागात भारतीय लष्कराने सात दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई होती. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असताना भारताने लष्करी कारवाई करत, देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकारने ही लष्करी कारवाई केल्याचा आरोप करायलाही काँग्रेस आता मागेपुढे पाहणार नाही. पण, मोदींसाठी निवडणुकीतील विजयापेक्षा देशाची एकता आणि अखंडता महत्त्वाची आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज पडेल, मोदी पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाहीत. मग, त्या वेळी निवडणुका असो वा नसो. कारण, निवडणुकीतील विजयापेक्षा मोदींसाठी देशहित जास्त महत्त्वाचे आहे. 


भारतात घातपाती कारवाया करण्याचे पाकिस्तान थांबवत नाही, गुलाम काश्मीर भागातून भारतात घुसखोर घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. त्यासाठी युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत पाकिस्तानने शनिवारी रात्रीपासूनच भारताच्या हद्दीत गोळीबार सुरू केला होता. नियंत्रण रेषेवरील उरीच्या तंगधार भागात, या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानवर ही लष्करी कारवाई केली, ती योग्यच म्हटली पाहिजे. भारताकडून वारंवार मार खावा लागत असतानाही पाकिस्तानला शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तानची वागणूक कुत्र्याच्या शेपटीसारखी आहे, कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, अगदी नळीत जरी घातले, तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही, वाकडे ते वाकडेच राहते, तसेच पाकिस्तानचे झाले आहे.


मुळात भारताशी थेट युद्ध करण्याची धमक पाकिस्तानात नाही. आतापर्यंत भारताशी केलेल्या सर्व युद्धांत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. आजही दोन-तीन दिवसांच्या युद्धात भारत पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकतो. भारताविरुद्धच्या थेट युद्धात आपण िंजकू शकत नाही, हे माहीत असल्यामुळे, दहशतवादी कारवाया करत भारताला त्रास देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यामुळेच पाकिस्तान चवताळल्यासारखा वागत आहे. भारताचे काहीही बिघडवण्याची ताकद नसताना, भारताचे बिघडवण्याच्या प्रयत्नात आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहे. पायावर धोंडा पडल्यामुळे छोटी जखम होत नाही, तर पाकिस्तानचा पूर्ण पायच फॅक्चर होत आहे, तरीसुद्धा पाकिस्तानचे डोळे उघडत नाहीत.


आपल्या भारतद्वेषाचे प्रदर्शन पाकिस्तानने आतापर्यंत अनेक जागतिक व्यासपीठांवर करण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याच देशाकडून त्याला सहानुभूतीचे दोन शब्दही मिळाले नाहीत. उलट, प्रत्येक देशाने त्याला झिडकारून लावले, त्याला त्याची जागा दाखवून दिली. पण शहाणपण येईल तो पाकिस्तान कसला? एफएटीएफमध्ये पाकिस्तान एकदा पडला, काही अटींची पूर्तता केली नाही, तर पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भारतविरोधी कारवायांमुळे पाकिस्तानी जनतेत असंतोष उफाळून आला आहे, इम्रान खान यांचे सरकार डळमळीत झाले आहे.


पाकिस्तानी लष्कराची मर्जी आहे, तोपर्यंत इम्रान खान पंतप्रधानपदावर राहू शकतात, म्हणजे पाकिस्तानी लष्कराच्या तालावर नाचायची तयारी आहे, तोपर्यंत इम्रान खान यांचे पंतप्रधानपद राहणार आहे. ज्या क्षणी ते पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात जातील, त्याच्या दुसर्‍या क्षणी त्यांना एकतर तुरुंगात वा पाकिस्तानबाहेर निर्वासिताचे जीवन जगावे लागेल. सध्या इम्रान खान यांची भूमिका ही पाकिस्तानी लष्कराच्या तालावर नाचण्याची आहे. मात्र, अशी भूमिका घेत इम्रान खान पाकिस्तानचे आणि पाकिस्तानच्या जनतेचे अपरिमित नुकसान करत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय खराब आहे. भीक मागून आणलेल्या पैशावर कशीबशी पाकिस्तानची गुजराण सुरू आहे. मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावी पाकिस्तानी जनतेला हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. विकास तर दूरदूरपर्यंत दिसत नाही.


पाकिस्तानने भारताशी नेहमीच शत्रुत्वाची वागणूक ठेवली आहे. भारताला आपला शत्रू समजून भारताचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान स्वत:चेच नुकसान करून घेत आहे. भारताने नेहमीच पाकिस्तानसमोर मैत्रीचा आणि मदतीचा हात केला आहे आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानने भारताचा मैत्रीचा हात झिडकारून लावला. मुळात पाकिस्तान ज्या देशांना आपले मित्र समजून भारताशी शत्रुत्व घेत आहे, ते देश पाकिस्तानचे खरे मित्र नाहीत, तर मित्रत्वाचा भास निर्माण करत आपला स्वार्थ साधणारे कोल्हे आहेत. पण, पाकिस्तानला म्हणण्यापेक्षा पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आपले हित कशात आहे, ते समजत नाही वा समजत असले, तरी पाकिस्तानी लष्करापुढे ते हतबल आहेत. जोपर्यंत पाकिस्तानी राज्यकर्ते लष्कराच्या इशार्‍यावर नाचत राहतील, तोपर्यंत पाकिस्तानात यापेक्षा वेगळे काही होऊ शकणार नाही.


मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 35-ए आणि 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान पिसाळल्यासारखा झाला आहे. मुळात या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे पाकिस्तानला काही कारण नव्हते. कारण, भारताने पाकिस्तानवर अतिक्रमण केले नव्हते वा हल्लाही केला नव्हता. त्यामुळे राजकीय शहाणपणा म्हणजे मुत्सद्देगिरी दाखवत पाकिस्तानने चूप बसायला पाहिजे होते. पण, पाकिस्तानच्या नेतृत्वात याच राजकीय शहाणपणाचा अभाव आहे.


आधी अटलबिहारी वाजपेयी सरकारने आणि आता नरेंद्र मोदी सरकारनेही पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. अटलबिहारी वाजपेयी तर बस घेऊन पाकिस्तानात गेले होते. पण, पाकिस्तानने त्याची जाणीव कधी ठेवली नाही. भारत हा आपला शत्रू असल्याचा चष्मा पाकिस्तानने आपल्या डोळ्यांवर चढवला आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या डोळ्यांवरून हा चष्मा काढत नाही, तोपर्यंत त्याला भारताने समोर केलेला मैत्रीचा हात कधीच दिसणार नाही. दोष पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या चष्म्यात आहे. या सदोष चष्म्यामुळे पाकिस्तानला जे खरे मित्र आहे, ते शत्रू वाटतात आणि जे शत्रू आहेत, ते मित्र वाटतात. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी आपल्या डोळ्यांवरून हा चष्मा काढण्याची गरज आहे. हा चष्मा काढल्यावर त्यांना नेमकी वस्तुस्थिती काय आहे, आपल्या देशाचे हित कशात आहे, याची जाणीव होईल. पाकिस्तान भारताविरोधात ज्या दहशतवादी संघटनांचा वापर करत आहे, त्या भस्मासुरासारख्या पाकिस्तानच्याच मुळावर उठल्या आहेत. भारताचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान स्वत:चे नुकसान करून घेत आहे. पण, पाकिस्तानला याची जाणीव नाही, हे दुर्दैव आहे.


No comments:

Post a Comment