Total Pageviews

Monday 7 October 2019

डाव्यां'चे शेपूट वाकडे ते वाकडेच!- दिनांक 07-Oct-2019 19:54:02 –TARUN BHARAT- दत्ता पंचवाघ



जादवपूर विद्यापीठात केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर हल्ला करण्याची घटनाजेएनयुमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांच्या भाषणाच्यावेळी हुल्लडबाजी करण्याचाकलम ३७० रद्द केल्याबद्दल निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा देण्याचा प्रकारतसेच दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार या सर्वांमधून एकाच प्रकारच्या देशविघातक मानसिकतेचे दर्शन घडते.

प. बंगालमधील जादवपूर विद्यापीठात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्यावर हल्ला होण्याची घटना ताजी असतानाच नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यापुढे निदर्शने करून त्या विद्यापीठातील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेने पुन्हा आपल्या देशद्रोही प्रवृत्तीचे दर्शन घडविले. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय संसदेच्या संमतीने केंद्र सरकारने घेतल्यानंतर काहींना अजूनही तो निर्णय पचनी पडला नसल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांविषयी त्यांच्या प्रेमाचा पान्हा अजूनही फुटत असल्याचे दिसत आहे. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्याचे निमित्त करून त्या राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न होऊ नये, या हेतूने त्या राज्यातील काही राजकीय नेते आणि फुटीरतावादी नेते यांना नजरकैदेत वा कारावासात ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. अशा चिथावणीखोर नेत्यांना नजरकैदेत वा बंदिवासात ठेवल्याने त्या राज्यात सर्व व्यवहार सुरळीत राहण्यास मदत झाली. पण, केंद्र सरकार देशहितास प्राधान्य देऊन जी पावले टाकत आहे ती, काहींना अजिबात रुचत नाहीत, असे दिसून येत आहे.

जादवपूर विद्यापीठात अभाविपच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. राज्यपालांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांची तेथून सुटका होऊ शकली. जादवपूर विद्यापीठातील ही घटना विरते न विरते तोच गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याबाबतही दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा देशविरोधी सूर उमटल्याचे दिसून आले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटना सातत्याने देशविरोधी भूमिका घेत असल्याचा इतिहास आहे. संसदेवर हल्ला केल्याबद्दल फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या अफजल गुरूचा पुळका येऊन त्या विद्यापीठात जी देशविरोधी निदर्शने झाली,त्याचा अनुभव संपूर्ण देशाने घेतला आहे. त्या निदर्शनात फुटीरतेची भाषा वापरण्यात आली. भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. देशद्रोही घोषणाबाजी केल्याबद्दल कन्हैयाकुमार, उमर खलिद आदी नेत्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर अनेक डाव्या मंडळींना, भाजप विरोधकांना त्यांचा पुळका आला. सरकारविरोधात रान उठविण्याचा प्रयत्न झाला. पण, भाजप हा देशहितास प्राधान्य देणारा पक्ष असल्यावर देशातील जनतेचा दृढविश्वास असल्याने जनतेने राष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या पक्षांना, त्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

केंद्र सरकारने सर्व लोकशाही संकेतांचे पालन करून जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केले. त्याचे संपूर्ण देशाने उत्साहात स्वागत केले. काश्मीरमधील काही स्वार्थी नेत्यांना मात्र हा निर्णय पटला नाही. या निर्णयामुळे आपल्या मक्तेदारीवर घाला घातला गेल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. कलम ३७० रद्द करण्याबाबतची चर्चा सुरू झाल्याबरोबरच काही नेत्यांनी, तसा निर्णय घेतला तर भारत आणि जम्मू-काश्मीरचे संबंध संपुष्टात येतील, अशी भाषा वापरून अप्रत्यक्षपणे, आमचा भारताशी काही संबंध राहणार नसल्याचे जाहीर भाष्यही केले होते. पण, संसदेने ठामपणे जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असण्यावर शिक्कामोर्तब केले. काश्मीरचे वेगळेपण रद्द करण्याचा निर्णय घेऊन, त्या राज्याच्या विकासाच्या मार्गात जे अडथळे येत होते, ते रद्द करण्याच्या दिशेने पाऊल उचलले. गेल्या ५ ऑगस्ट रोजी काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेऊन देशाने एक ऐतिहासिक पाऊल टाकले. त्या घटनेस सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अजूनही अनेकांची त्या सत्याचा स्वीकार करण्याची तयारी असल्याचे दिसत नाही. त्यामध्ये जम्मू-काश्मीरमधील काही नेत्यांचा; तसेच अन्य काही नेत्यांचा समावेश असल्याचे दिसून आहे. सातत्याने देशविरोधी भूमिका घेणाऱ्या डाव्या विद्यार्थी संघटनाही यामध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्याने त्याचा शांतता, स्थैर्य आणि जम्मू -काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी कसा लाभ होऊ शकतो,याचे विश्लेषण करण्यासाठी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण, या कार्यक्रमाच्या वेळी डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी, हुल्लडबाजी केली. एकीकडे विचारस्वातंत्र्यावर घाला येत असल्याची आवई उठवायची आणि दुसरीकडे, कोणी आपली बाजू मांडू लागला तर त्यामध्ये व्यत्यय आणायचा, हुल्लडबाजी करायची, अशीच लोकशाही डाव्या मंडळींना हवी आहे काय? या कार्यक्रमाच्या वेळी दिल्या जात असलेल्या विरोधी घोषणांना अभाविप कार्यकर्त्यांनी 'काश्मीर से कन्याकुमारी, भारतमाता एक हमारी' घोषणा देऊन सडेतोड उत्तर दिले. आम्ही आमच्या राष्ट्रास सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी त्यामधून दाखवून दिले.

डाव्या विद्यार्थी संघटनेने जितेंद्रसिंह यांच्या कार्यक्रमाच्यावेळी जो गोंधळ घातला, त्यामुळे नाउमेद न होता, कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करणारे कार्यक्रम यापुढेही आमच्याकडून योजले जातील, असे अभाविपने ठामपणे सांगितले. डाव्या विचारसरणीच्या गुंडांनी जितेंद्रसिंह यांच्या कार्यक्रमाच्यावेळी जो गोंधळ घातला, त्याचा तीव्र शब्दांत अभाविपने निषेध तर केलाच. त्याचबरोबर भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य या गोष्टी डाव्यांच्याकडे फक्त उपदेश करण्यापुरत्या असतात,अनुकरण करण्यासाठी नसतात, हेही अभाविपने सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. जेएनयुमधील डाव्या विचारसरणीच्या गुंडपुंडांच्या विरोधात, राष्ट्रास सर्वोच्च प्राधान्य देणारी आणि त्यानुसार व्यवहार करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठामपणे उभी असल्याचे या घटनेवरून दिसून आले. आज ना उद्या ही राष्ट्रविरोधी विषवल्ली मुळापासून उखडून टाकण्यात या अभाविपला नक्कीच यश येईल. जादवपूर विद्यापीठात केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर हल्ला करण्याची घटना, जेएनयुमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांच्या भाषणाच्यावेळी हुल्लडबाजी करण्याचा, कलम ३७० रद्द केल्याबद्दल निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा देण्याचा प्रकार; तसेच दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार या सर्वांमधून एकाच प्रकारच्या देशविघातक मानसिकतेचे दर्शन घडते. राष्ट्राचा विचार करून मार्गक्रमणा करीत असलेल्यांना विरोध करीत राहणे, असा एककलमी कार्यक्रम अशी मानसिकता जपणाऱ्यांचा आहे. जे जे देशहिताचे त्यास काहीही करून विरोध करीत राहायचा, असे या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांचे, त्यांच्या संघटनांचे, त्या विचारसरणीच्या पक्षांचे वर्तन राहिले आहे. देशाने सातत्याने तसा अनुभवही घेतला आहे. आपल्या विचारांना जनता धूप घालत नसल्याचे लक्षात येऊनही त्यांच्यामध्ये काही बदल होताना दिसत नाही. कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडे ते वाकडेच, अशी या डाव्या विचारसरणीच्या मंडळींची अवस्था आहे


No comments:

Post a Comment