Total Pageviews

Saturday, 11 June 2016

REMAINING SAFE DURING LIGHTENING-विजांचा कडकडाट; जीव वाचवा!

विजांचा कडकडाट; जीव वाचवा! डॉ. सुनील पवार मान्सूनच्या आगमनापूर्वी आणि नंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतो. या काळात विजांचा प्रचंड कडकडाट होतो. अशावेळी वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. वीज कशी पडते आणि त्यामागची कारणे काय आहेत, यावर पुण्याच्या केंद्र सरकारच्या भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थानमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी गेली २० वर्षे संशोधन केले आहे. मोबाईलवर बोलत असताना वीज पडत नाही, हे संशोधनातून सिध्द करतानाच झाडाखाली उभं राहिल्यानंतर जवळपास ९० टक्के मृत्यू वीज पडून झाल्याचे त्यांना दिसून आले आहे. अवकाळी पाऊस म्हटलं की विजांचा कडकडाट असतोच. मान्सून दाखल होण्यापूर्वी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. विजांचा कडकडाट सुरु झाला आहे. त्यापासून सावधान राहण्याची वेळ आली आहे. वीज जेव्हा चमकते आणि तिचा आवाज होतो तेव्हा ती पडली असे म्हटले जाते. म्हणजेच विजेची ऊर्जा जमिनीत जाते. उंचावर असणारी ठिकाणी म्हणजे पर्वत, डोंगर, इमारती, उंच वृक्षावर वीज पडते. जेवढे उंच ठिकाण असते तिथे वीज पडण्याचे प्रमाण जास्त असते. समाजात असा एक असा समज दिसतो की, मोबाईलवर बोलत असताना विजांचा कडकडाट सुरू असेल तर, ती मोबाईलमधील लहरींकडे आकर्षित होऊन वीज पडते. मात्र, संशोधनातून असे सिध्द झाले आहे की, त्या मोबाईलमध्ये मेटलचे प्रमाण किती आहे. त्यावर वीज पडण्याची शक्यता आहे. मात्र, मोबाईलमध्ये मेटलचे प्रमाण जास्त नसते. त्यामुळे मोबाईलवर बोलत असताना वीज पडण्याची शक्यता नाही असे दिसून आले आहे. अगदी मेटलच्या दागिन्यांनीसुध्दा विजेतून येणार्‍या लहरी आकर्षित होतात. आपल्याकडे वीज पडून होणार्‍या मृत्यूंमध्ये ९० टक्के प्रमाण हे झाडाखाली उभं राहिल्यानंतर दिसून आले आहे. ज्या घरांना ओल आहे. किंवा घरातली फरशी सतत ओली असेल तर, तिथे वीज पडते. विजेच्या प्रकारांचा अभ्यास करताना परदेशातील आणि आपल्या देशातील विजांचे प्रकार वेगवेगळे आढळून आले. देशात मुख्यत: ईशान्य हिंदुस्थानात वीज चमकण्याचे आणि वीज पडण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. कारण ईशान्य हिंदुस्थानात वीज चमकते तेव्हा वादळ, वारे जोराने वाहतात. गारा पडतात. मात्र, महाराष्ट्रात वार्‍याचा वेग असतोच असे नाही. शिवाय विजा चमकत असताना घराबाहेर पडण्याचे प्रमाण ईशान्य हिंदुस्थानात फारसे नसते. मात्र, आपल्याकडे सर्रासपणे शेतात काम करणे, रस्त्याने फिरणे सुरू असते. काहीच होणार नाही, असे समजून आपण काम करण्यात व्यस्त असतो. विदर्भामध्ये वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त दिसते. यावर उपाय योजनांचा विचार केल्यास एक गोष्ट आपण करू शकतो. वीज चमकत असेल तर, शेतात काम करू नये. आम्ही नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांसाठी त्यांचा शेतात अडोसा म्हणून काही शेल्टर उपलब्ध करून द्यावेत असे सुचविले. हे शेल्टर्स अनुदान स्वरूपात मिळावेत. जेणेकरून शेतकर्‍यांना पावसात किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना या शेल्टर्समध्ये थांबता येईल. अजून एक महत्त्वाचा उपाय करता येतो. घरावरती लोखंडी रॉड बसवून त्यावरून ‘अर्थिंग’ची वायर घेऊन ती जमिनीत पुरायची. ज्यामुळे विजेचा प्रवाह जमिनीकडे जातो. ती घरावर पडत नाही. काही घरांवर असे प्रयोग केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले. शिवाय पाऊस पडल्यानंतर रस्त्याने साठलेल्या पाण्यातून चालणे टाळावे. बर्‍याचदा वीज महावितरणचे पोल रस्त्याच्या शेजारी असतात. त्यातून प्रवाह पाण्यात उतरतो. त्याचवेळी विजाही चमकत असतील तर, हमखास वीज त्या पाण्याकडे आकर्षित होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय जो आपल्या हातात आहे, त्याकडे दुर्लक्ष न करणे हेच हिताचे ठरेल. दक्षता घ्या! – झाडाखाली थांबू नये – घराला ओल असेल तर, विजा चमकत असताना बाहेर यावे – रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून चालणे टाळावे. – विजांचा कडकडाट सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडू नये. – शेतात काम करत असताना विजा चमकत आहेत, असे लक्षात येताच खाली बसून अथवा वाकून चालत जावे. काम करणे शक्यतो टाळावे. – शब्दांकन : मेधा पालकर - See more at: http://www.saamana.com/utsav/lakshyavedhi-vijancha-kadkadat-jiv-vachva#sthash.70qD1RHZ.dpuf

No comments:

Post a comment