Total Pageviews

Monday 30 November 2015

फारुख अब्दुल्ला! जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि अब्दुल्ला घराण्याची पुण्याई हीच त्यांची राजकारणात येण्याची पात्रता!


अब्दुल्लांचे देशद्रोही फूत्कार! कुठले ना कुठले वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची जी शैली दिग्विजयसिंग, मणिशंकर अय्यर यांनी अवगत करून घेतली आहे, त्या मालिकेतील आणखी एक नाव म्हणजे फारुख अब्दुल्ला! जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि अब्दुल्ला घराण्याची पुण्याई हीच त्यांची राजकारणात येण्याची पात्रता! पण, भारतीय राजकारणात जशी नेहरू, गांधींची घराणेशाही चालून गेली, तसेच अब्दुल्ला घराणेही घराणेशाहीच्या राजकारणात तरून गेले. सतत वादग्रस्त वक्तव्ये करण्यात फारुख अब्दुल्ला यांचा हात धरणारे बोटावर मोजता येण्याएवढे नेते भारतीय राजकारणात सापडू शकतील. ३७० कलमान्वये जम्मू आणि काश्मीर राज्याला मिळालेल्या विशेष दर्जामुळेही त्यांचे समाधान झालेले नाही. ते स्वतः आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला हे राज्याचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी कायम जम्मू आणि काश्मीर राज्याला अधिकाधिक स्वायत्तता मिळावी, यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये केली, केंद्र सरकारविरुद्ध संघर्षांची भूमिका घेतली आणि धमक्या देऊन जास्तीत जास्त फायदे लाटून घेतले. प्रसंगी राजकीय पदंसुद्धा लाटली. जादा स्वायत्ततेची मागणी करणार्‍या खोर्‍यातील हिंसक गटांच्या पाठीशी उभे राहण्याची राष्ट्रद्रोही भूमिकादेखील त्यांच्या पक्षाने घेतली. भारताच्या ताब्यातील जम्मू आणि काश्मिरात सार्वमत घ्यावे, अशी जी मागणी खोर्‍यात मधूनमधून उठते, त्या मागणीलासुद्धा या बेताल बादशहाचे समर्थन राहिलेले आहे! अशातच फारुख अब्दुल्ला यांनी काल आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचे नाहीच आणि काश्मीरचा हा भाग भारत पाकिस्तानपासून हिरावू शकत नाही, या त्यांच्या वक्तव्यावर निषेधाचे सूर उमटले नसते तरच नवल. असे वक्तव्य करून त्यांनी राष्ट्रद्रोही भूमिकाच घेतली आहे. आपण खोर्‍यातील जवानांचे नैतिक खच्चीकरण करतोय्, असेदेखील त्यांना वाटले नाही. त्यांची जीभ जराही कचरली नाही. यातून, प्राणांची बाजी लावणार्‍या जवानांची अवहेलनाच त्यांनी केलेली आहे. म्हणे भारतीय फौजा काश्मिरातील दहशतवाद रोखू शकत नाहीत. स्वातंत्र्यापासून ६७ वर्षे झाली, भारताच्या ताब्यातील जम्मू आणि काश्मीर शाबूत आहे, ते केवळ सीमेवर लढणार्‍या भारतीय फौजांमुळेच! पाकिस्तानची अडचण या फौजांमुळेच होतेय्, हे साधे गणित अब्दुल्ला यांना समजू नये, याचे आश्‍चर्य वाटते. याच जवानांमुळे आपण घुसखोरीवर नियंत्रण मिळवू शकलो आहोत. खोर्‍यातील दहशतवाद आटोक्यात येऊन तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात लष्कराची भूमिका कोण नाकारू शकेल? फौजा आहेत म्हणून हिंसाचारही आटोक्यात आहे. फौजा आहेत म्हणून आया-बहिणींची अब्रू वाचलेली आहे, फौजा आहेत म्हणून समृद्धी आहे आणि फौजा आहेत म्हणून प्रशासनाचे कार्यदेखील सुरळीत पद्धतीने सुरू आहे... फौजांच्या उपस्थितीमुळेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला खोर्‍यात राष्ट्रध्वज तिरंगा डौलाने फडकवला जाऊ शकतो आणि जवान आहेत म्हणूनच खोर्‍यातील उरलेसुरले राष्ट्रवादी दिल्लीच्या सुरात सूर मिसळून गाऊ शकतात. एका अर्थाने, लष्करामुळेच आज जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेची ग्वाही दिली जाऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर देशद्रोही वक्तव्य करून फारुख अब्दुल्ला यांनी पाकचे हात बळकट करण्याचे, तसेच भारतीय फौजांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम केले आहे. फारुख अब्दुल्लांची विधानं एकतर खुर्ची टिकवण्यासाठी असतात किंवा ती पुन्हा मिळविण्याच्या उद्देशाने केलेली असतात. सध्या राज्यात भाजपा आणि पीडीपीचे सरकार असल्याने, नॅशलन कॉन्फरन्सची कोंडी झालेली आहे. सत्तेविना या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेदेखील अस्वस्थ आहेत. कुठलातरी वाद उकरून काढायचा आणि सरकारविरुद्ध रोष निर्माण होईल याचे प्रयत्न करायचे, एवढेेच काम सध्या त्यांना करता येण्यासारखे आहे. आणि तेच काम ते इमानेइतबारे करून राहिले आहेत. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून, पाकव्याप्त काश्मीरवरसुद्धा भारताचाच हक्क असल्याचे आपण मानतो. जम्मू आणि काश्मीर विघटनवाद्यांच्या तावडीतून मुक्त करणे आणि पाकने गिळंकृत केलेला भाग परत मिळविणे, यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अनेक बाबी राजनयिक पातळीवर सुरू आहेत. छोटे-मोठे मुद्दे पाकिस्तानी नेत्यांना पटवून सांगितले जात आहेत. भलेही पाकिस्तान आपल्या मागण्यांना, आपल्या पुराव्यांना केराची टोपली दाखवत असला, तरी भारताच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागले आहे. आता गिलगिट, बाल्टिस्तान, मिरपूर आणि बलुचिस्तानातील लोक ‘चलो भारत’चे नारे देऊ लागले आहेत. फारुख अब्दुल्ला यांनी केलेले वक्तव्य हे व्यक्तिगत आहे की त्यांच्या पक्षाची ही मतं आहेत, हे भारतीय जनतेने जाणून घ्यायला हवे. सशस्त्र दलांच्या म्हणजेच देशाच्या क्षमतेबद्दल जाहीरपणे वाद उपस्थित करून त्यांनी संरक्षणविषयक मुद्याचे राजकीयीकरण केले आहे. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला हवा! श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरच्या अखंडतेसाठी प्राणांची बाजी लावली आणि हा नेता अखंडतेला तडे देणारी भूमिका घेत आहे. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे नॅशनल कॉन्फरन्सची तट्‌टाणी? विघटनवाद्यांच्या भूमिकेला समर्थन देताना, खोर्‍यातील काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेबद्दल चकार शब्द काढायला अब्दुल्ला महाशय तयार नाहीत. लडाख खोर्‍यातील मागास बौद्ध समुदायाच्या समस्यांबद्दल ते अवाक्षरही बोलणार नाहीत. स्वातंत्र्यानंतर पंजाबमधून येऊन खोर्‍यात स्थायिक झालेल्या समाजबांधवांना आज ६७ वर्षांनंतरही निवडणुका आणि मतदानापासून वंचित ठेवले जात आहे. त्यांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दलही अब्दुल्ला नामक असामी काही बोलणार नाही; पण पाकव्याप्त काश्मीरचे आणि भारताच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण कदापि शक्य नाही, याचा धोशा मात्र हा बेजबाबदार नेता वारंवार करत राहणार! प्रश्‍न असा उपस्थित होतो की, अब्दुल्ला घराणे मीठ कुणाचे खात आहे? ते जर भारताचे मीठ खात असतील, तर अशी देशद्रोही भूमिका घेण्याचा त्यांना हक्कच नाही. आणि जर ते पाकिस्तानचे मीठ खात असतील, तर त्यांना भारतात राहण्याचा, येथील घटनेनुसार मूलभूत हक्क मिळविण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही. भारतीय फौजांच्या असमर्थतेबाबत त्यांना एवढा विश्‍वास कुुठून आला? पाकिस्तानी नेतृत्वाशी त्यांची घसट तर नाही? की विघटनवाद्यांच्या ताकदीबाबत ते आश्‍वस्त आहेत? असे असेल तर त्यांचे देशद्रोह्यांशी असलेले संबंध जगजाहीर होतात. हे सिद्ध होत असेल, तर त्यांची जागा सामान्य माणसांप्रमाणे तुरुंगातच असायला हवी! भारताने, गोर्‍या कातडीच्या या काळसर्पाला नेस्तनाबूत करणे, हीच विषारी फूत्कारांबद्दल योग्य शिक्षा ठरू शकते!

No comments:

Post a Comment