Total Pageviews

Thursday 18 December 2014

PESHAVAR KILLING पोसलेल्या दहशतवादाचे ओझे

पोसलेल्या दहशतवादाचे ओझे Posted: 3:40 AM, December 19, 2014 दहशतवादाच्या पाडावासाठी येत्या आठवडाभरात राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली आहे. दहशतवादी संघटनांच्या बीमोडासाठी तातडीने आणि ठोस कृती करण्याचा निर्धार त्यांनी प्रगट केला आहे. पेशावरमध्ये तहरिक-ए-तालिबान संघटनेच्या दहशतवाद्यांनी मंगळवारी घडविलेल्या अत्यंत क्रूर अशा हत्याकांडामुळे देशांतर्गत फोफावलेल्या दहशतवादी शक्तींची गंभीर दखल पाकिस्तानी पंतप्रधानांना घ्यावीच लागली आहे. जगात चांगले तालिबानी आणि वाईट तालिबानी असा भेद असूच शकत नाही, याची जाणीवही त्यांना झाली आहे, असे दिसते. दहशतवादाच्या संपूर्ण बीमोडाच्या दिशेनेच पाकिस्तान सरकारची पावले यापुढे पडू लागतील असे प्रतिपादन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले असले तरी, त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या लष्कराची कितपत साथ मिळणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याच्या घोषणा पाक सरकारने यापूर्वीही अनेकदा केल्या होत्या, पण ज्याच्या बळावर पाकिस्तान सरकार या घोषणा करते त्या लष्करानेच सरकारी पैशातून अनेक दहशतवादी संघटना पोसल्या असून पाकिस्तानी लष्कराच्या इशाऱयावरच या संघटनांच्या हालचाली सुरू असतात, ही उघड वस्तुस्थिती आहे. पाकिस्तानात सरकार कोणाचेही असो, लष्करी क्रांतीतून सत्तेवर आलेले असो वा लोकशाही निवडणुकाद्वारे सत्तेवर आलेले असो, त्या सरकारवर नियंत्रण मात्र लष्कराचेच असते, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता त्या देशात क्वचितच लोकशाही सरकारे अस्तित्वात आली, मात्र तीही फार दिवस टिकली नाहीत. पाकिस्तानचे पंतप्रधान या नात्याने नवाझ शरीफ यापूर्वीही एकदा सत्तेवर आले होते. मात्र तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी रातोरात लष्करी क्रांती घडवून त्यांना सत्ताभ्रष्ट केले होते. परवेझ मुशर्रफ हे अनेक वर्षे लष्करावरची पकड घट्ट ठेवून सरकार चालवित होते. मात्र लष्करावरील त्यांची पकड सैल होताच त्यांना सरकार सोडावे लागले होते. त्यामुळे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी नवाज शरीफ यांना लष्करावरील पकडही घट्ट करावी लागणार आहे. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील फोफावत्या दहशतवादी शक्तींचे गांभीर्य साऱया जगाच्या लक्षात आले. मात्र पाकिस्तान सरकारला त्याचे कोणतेही गांभीर्य नसावे. भारतानेच काय, पण अमेरिकी सरकारनेदेखील त्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारला त्यांच्या दहशतवाद प्रेमाबद्दल खडसावले होते. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचाच हात असल्याचे स्पष्टपणे उघडकीस येऊनदेखील पाकने त्याबद्दल कानावर हात ठेवले होते. त्या हल्ल्याशी संबंधित असलेल्या अन्य दहशतवाद्यांची नावे भारताने पाक सरकारला दिली असतानाही पाक सरकारने संबंधितांवर कोणतीच कारवाई न करता त्यांना मोकाट सोडले. या दहशतवाद्यांविरोधात भारताकडे पुरेसे पुरावे नसल्याचा दावा करून पाक सरकारने एकप्रकारे त्या दहशतवाद्यांना पाठीशीच घातले होते, अन्यथा काही दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये दहशतवादी पकडले गेले, त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षाही ठोठावली होती. मात्र त्या दहशतवाद्यांबद्दलही पाक सरकारच्या मनात दयाबुद्धी जागी होऊन त्यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उठविण्याचा निर्णय आता नवाझ शरीफ यांनी जाहीर केला असला तरी हे दहशतवादी प्रत्यक्षात फाशी दिले जातीलच याची खात्री आजही देता येत नाही. भारतासारख्या शेजारी देशांवर दबाव ठेवण्यासाठीचे हत्यार म्हणून पाकिस्तानकडून आजवर दहशतवादी शक्तींचा वापर केला गेला आहे. कारगिल घुसखोरीसाठीदेखील पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी संघटनांचा वापर केला. पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीतून भारतात दहशतवादी घुसवून भारतात आणि विशेषतः काश्मीरात अराजक माजविण्याचा प्रयत्न गेल्या 25 वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. भारतात हैदोस घालणाऱया या दहशतवादी संघटनांना संपूर्ण रसदही पाकस्थित संघटनांकडूनच पुरविली जाते. अशिक्षित, बेरोजगार युवकांना भारताविरुद्ध भडकवून त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणारे तळ पाकिस्तानी भूमीत फोफावले आहेत. पाकिस्तान सरकारच्या किंवा पाकिस्तानी लष्कराच्या आशीर्वादाविना हे शक्य असेल असे वाटत नाही. सारे समजून, उमजूनदेखील केवळ भारताचे वाटोळे करण्याच्या राक्षसी उद्देशानेच फोफावणाऱया या दहशतवादी शक्तींना पाकिस्तानने आजवर पाठीशी घातले. पेशावरमधील लष्करी शाळेत शिकणाऱया निष्पाप कोवळय़ा बालकांच्या निर्दयी हत्याकांडानंतर आता तरी पाक सरकारला स्वतः पोसलेल्या पापांची शिसारी आली असेल आणि निरागस बालकांच्या अकारण वाहून गेलेल्या रक्ताची त्यांना खरोखरीच कदर असेल तर दहशतवादाच्या बीमोडाची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे सरकार जी पावले उचलेल ती निश्चितच स्वागतार्ह ठरतील आणि साऱया जगातील शांतताप्रेमींचे सहकार्य त्यांना लाभू शकेल. दहशतवादाच्या बीमोडासाठी एकत्रित कृतीची गरज भारतानेही यापूर्वी मांडली होती. तथापि, काश्मीरातील दहशतवादी हैदोसाला ‘लोकयुद्ध’ संबोधणाऱया पाकिस्तानी राज्यकर्त्यांना प्रत्यक्ष कृती नकोच असावी. अमेरिकेने पुकारलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होण्याचे नाटक करून पाकने अमेरिकेकडून भरपूर लष्करी आणि आर्थिक साहाय्य मिळविले. प्रत्यक्षात त्या साहाय्याचा वापर दहशतवादाविरोधात झालेलाच नाही. दहशतवाद आणि धर्मांध शक्ती आता पाकमधील निष्पापांच्या जीवावरही उठल्या आहेत. शेजाऱयांच्या नाशासाठी उठविलेले दहशतवादाचे भूत आता त्यांच्या स्वतःच्याच मानगुटीवर बसलेले असताना शरीफांना जाग आली आहे, असे वाटते. मानगुटीवर बसलेले हे ओझे दूर भिरकावून देण्यासाठी ते सारी शक्ती पणाला लावणार आहेत का हाच प्रश्न आहे

No comments:

Post a Comment