Total Pageviews

Friday 12 December 2014

हिंदुस्थानी लष्कराच्या आधुनिकीकरणाला चालना-ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानी लष्कराच्या आधुनिकीकरणाला चालना केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अलीकडेच हिंदुस्थानी लष्करासाठी नवीन तोफा खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखविला. एकूण ८१४ नवीन तोफा या निर्णयानुसार आपल्या लष्करात सामील होतील. त्यासाठी या निर्णयामुळे तब्बल ३०वर्षांनंतर हिंदुस्थानी लष्करासाठी तोफांची खरेदी होत आहे. बोफोर्स प्रकरणात लाचखोरीचे आरोप झाल्यानंतर तोफांची खरेदी आणि त्यांचे आधुनिकीकरण या दोन्ही पातळ्यांवर आपल्याकडे स्मशानशांतता होती. नव्या राजवटीत ती भंग पावली असून ठप्प असलेल्या लष्करी आधुनिकीकरणाला त्यामुळे चालना मिळत आहे. सैन्यात वापरल्या जाणार्‍या कुठल्याही तोफेचे आयुष्य १५ ते २० वर्षांचे असते. देखभाल आणि अपग्रेडेशन करून फार तर ते आणखी पाच वर्षांनी वाढविता येते. त्यानंतर मात्र त्या तोफेची उपयुक्तता शून्य झालेली असते. अशा तोफा योग्य आणि अचूक फायरिंग करीत नाहीत. त्यामुळे ठरावीक टप्प्यानंतर लष्करात नव्या तोफा सामील करणे अत्यावश्यक असते. आपल्याकडे मात्र संरक्षणाच्या बाबतीत घातकी उदासीनता दाखविलेल्या राज्यकर्त्यांनी गेल्या ३० वर्षांत एकही नवीन तोफ लष्करासाठी घेतलेली नाही. मागील दहा वर्षांत त्या त्या संरक्षण मंत्र्यांनी घोषणा खूप केल्या. वेगवेगळ्या तोफांच्या चाचण्याही घेतल्या गेल्या. मात्र या दहा वर्षांत तत्कालीन सत्ताधार्‍यांवर अनेक क्षेत्रात घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले. शस्त्रास्त्र खरेदीही त्यातून सुटलेली नाही. त्यामुळे दडपणाखाली सर्वच प्रस्तावित करार-मदार आणि खरेदी थांबविण्यात आली. वास्तविक ९९टक्के शस्त्रास्त्र खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप होतच असतात. असे आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांना कठोर शिक्षाही व्हायला हवी. मात्र आरोप होतात म्हणून खरेदीच करायची नाही किंवा करार रद्द करायचे हा त्यावरील उपाय होत नाही. तोफेची निवड, चाचणी आणि प्रत्यक्ष खरेदी ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्याला पाच ते सात वर्षे लागतात. शिवाय ही चाचणी वाळवंटात, अरुणाचल प्रदेशातील डोंगराळ भागात किंवा कारगील तसेच लेहमध्ये केली जाते. उणे ३०अंश ते ४५ अंश अशा टोकाच्या तापमानाच्या परिस्थितीत तोफ योग्य प्रकारे कार्य करू शकते की नाही हे पाहिले जाते. चाचण्यांसाठी अनेक कंपन्या आपापल्या तोफा हिंदुस्थानात पाठवत असतात. त्यातील सर्वोत्कृष्ट आणि आपल्याला उपयुक्त अशा तोफांची निवड करून त्यांची ऑर्डर दिली जाते. अर्थात ही ऑर्डर देताना होणारे ‘निगोशिएशन’मध्ये एक-दोन वर्षें जातात. तसेच या तोफा प्रत्यक्ष यायला आणखी चार-पाच वर्षें लागतात. थोडक्यात तोफांची खरेदी न करणे म्हणजे हिंदुस्थानी लष्कराचे आधुनिकीकरण आणि त्याची सक्षमता १०ते १५ वर्षे मागे नेण्यासारखे आहे. दुर्दैवाने आपल्याकडे याचा विचारच गेल्या १०वर्षांत झाला नाही. वास्तविक भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी तो करार रद्द न करता भ्रष्टाचारात दिलेले पैसे संबंधित कंपनीकडून वसूल करण्याचा उपाय त्यावर योजला पाहिजे. त्यामुळे लष्कराचे सामर्थ्य आणि आधुनिकीकरण याला बाधा येत नाही. आपल्या सैन्यामध्ये अनेक प्रकारच्या तोफा आहेत. तोफांची रेंज (पल्ला) पाच ते सहा किलोमीटरपासून ३५ ते ४० किलोमीटरपर्यंत असते. तोफांचा विचार करताना दोन गोष्टी पाहणे आवश्यक असते. एक म्हणजे तोफ आणि त्यातील गोळा. तोफगोळा हा ५ ते ४० किलामीटरपर्यंत दूर फेकला जातो. हा गोळा हेच खरे शस्त्र असते. हा गोळा जेथे जाऊन पडतो तिथे २००-७५० मीटर त्रिज्येने काढलेल्या वर्तुळात शत्रूंची बरबादी होते. आपल्याकडे रॉकेट तोफखाना म्हणूनही एक प्रकार आहे. रॉकेटच्या सहाय्याने एकदम ३५ ते ४० तोफगोळे फायर केले जातात. त्यामुळे शत्रूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याशिवाय तोफखान्यामध्ये क्षेपणास्त्रेही सामील आहेत. पृथ्वी क्षेपणास्त्राची रेंज ३५ ते ४० किलोमीटरपासून २५० ते ३०० किलोमीटरपर्यंत आहे. तोफांचेही तीन वेगवेगळे प्रकार असतात. एक म्हणजे ओढून वेगवेगळ्या ठिकाणी नेल्या जाणार्‍या तोफा. त्यांना Towed Artillery म्हटले जाते. या तोफा ओढून नेण्यासाठी एक मोठे वाहन वापरले जाते. दुसरा प्रकार (Self Propelled) म्हणजे स्वत:चे इंजिन असणार्‍या आणि त्या इंजिनच्या सहाय्याने वेगवेगळ्या भागात जाऊ शकणार्‍या तोफा. स्वत:चे इंजिन असणार्‍या तोफांचेही दोन प्रकार आहेत. यापैकी चाके असणार्‍या तोफा म्हणजे Wheeled Artillery रस्त्यावर वापरता येतात. दुसरा प्रकार रणगाड्यांप्रमाणे पोलादी पट्टे म्हणजे Tracked Artillery असणार्‍या तोफा. या तोफा वाळंवटात अथवा जेथे रस्ते नाहीत तेथे वापरल्या जातात. आपल्या देशात या सर्वच तोफांचे आधुनिकीकरण मागे पडले आहे. विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे हिंदुस्थानी लष्कराचे रखडलेले आधुनिकीकरण मार्गी लागणार आहे. सामील होणार्‍या नवीन तोफा १५५ एमएम/५२च्या असतील. या तोफांचे उत्पादन हिंदुस्थानात करण्याची अट घालण्यात आली आहे हे विशेष. थोडक्यात देशी खासगी कंपन्या परदेशी कंपन्यांची मदत घेऊन तोफा आणि तोफांचे गोळे हिंदुस्थानात तयार करणार आहेत. यात भारत फोर्ज, टाटा पॉवर, लार्सन ऍण्ड टुब्रो आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या परदेशातून आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणतील. आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे तोफांच्या चाचणीप्रसंगी परदेशी कंपन्यांबरोबरच हिंदुस्थानी कंपन्याही उपस्थित असतील. त्यामुळे चाचण्यांच्या वेळी आढळणार्‍या उणिवा, त्रुटी वेळीच दुरुस्त करता येतील. तोफांबरोबरच ‘स्मर्च आणि पिनाका’ या रॉकेट आर्टिलरीचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. तसेच बोफोर्स आणि १३० मिलिमीटर तोफांचे आयुष्य वाढविण्यासाठीही हिंदुस्थानी कंपन्यांना कंत्राट देण्यात येणार आहे. थोडक्यात ३० वर्षांपासून गाळात रुतलेली हिंदुस्थानी लष्कराच्या आधुनिकीकरणाची चाके बाहेर काढून या प्रक्रियेला वेग देण्याचा निर्धार विद्यमान सरकारने केलेला दिसत आहे. युद्ध हे नेहमी अचानकच उद्भवते. त्यामुळे कुठल्याही देशाला संरक्षणदृष्ट्या सुसज्ज, अद्ययावत आणि आधुनिक असणे आवश्यकच असते. आज आपण ज्या तोफा घेणार आहोत त्या १०-१५ वर्षांपूर्वी घेतल्या असत्या तर आजच्या निम्म्या किमतीत मिळाल्या असत्या. त्यामुळे देशाचे अब्जावधी परकीय चलनही वाचले असते. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. निदान आता ते घडत आहे हेही कमी नाही.

No comments:

Post a Comment