Total Pageviews

Tuesday 7 January 2014

PROTECTING POLICE

पोलिसांचे संरक्षण कोण करणार? हल्ले वाढले; मुंबईत गुंडाराज जखमी पोलीस कॉन्स्टेबल मोहन शिंदे . गेल्या आठवड्यात मुंबईतील गोवंडी येथील झोपडपट्टीमध्ये एका वॉण्टेड गुंडाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन शिपायांवर गुंडांनी तलवार व कोयत्याने वार करून मोहन शिंदे या शिपायाला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या शिपायाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुंडांच्या या धाडसाबद्दल मुंबई पोलिसांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांना तर अशा प्रसंगांना रोजच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील फलकावर लावलेले ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीदवाक्य इतिहासजमा होत आहे की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. याचदरम्यान दिल्लीत तर दारूविक्री करणार्‍या माफियांनी एका पोलीस शिपायाला ठेचून ठेचून ठार मारले, तर एका महिलेने गणवेषधारी पोलिसाचे पब्लिकमध्ये कपडे तर फाडलेच, परंतु चपलेनेही मार मार मारले. या संतापजनक प्रकाराचे कुणीतरी व्हिडीओ शूटिंग केले असून आता ते सर्वांच्या मोबाईलवर झळकत आहे. तेव्हा पोलिसांचा पूर्वीचा रुबाब, दरारा आता संपला असून उद्या या देशात अराजक माजणार असल्याचीच ही लक्षणे आहेत. पोलिसांनी गस्त घालणे किंवा आरोपीचा शोध घेण्यासाठी एकटेदुकटे बाहेर पडणे आता धोक्याचे झाले आहे. सामान्य माणसाप्रमाणे आता पोलीसही असुरक्षित झाले आहेत. परराज्यात तपासासाठी गेलेल्या बर्‍याच पोलिसांवर यापूर्वी हल्ले झाले आहेत. काहींना तर आपला जीवही गमवावा लागला आहे. पोलिसांची व कायद्याची भीती न राहिल्यामुळेच पोलिसांवर असे प्रसंग वारंवार येत आहेत. ही चिंतनीय बाब आहे. पोलीस जर आपले स्वत:चे संरक्षण करू शकत नाहीत तर मग ते आमचे संरक्षण काय करणार, असा सवाल सामान्य जनता करीत आहे. जे पोलीस अतिरेक किंवा कायद्याचा गैरवापर करीत असतील तर अशा माफियांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे; परंतु एकाकी ड्युटी बजावणार्‍या पोलिसांना हेरून त्यांच्यावर हल्ला करणे ही झुंडशाही झाली. पोलिसांवर हल्ला करणे म्हणजे त्यांचे मनोबल खच्ची करण्यासारखे आहे. हे समाजाच्या हिताचे नक्कीच नाही. पोलीस टिकला तर समाज टिकेल. तेव्हा त्यांना नामोहरम करून चालणार नाही. पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आता नवीन कायदे अमलात आणले पाहिजेत. ‘मोक्का’ अस्तित्वात आल्यानंतर मुंबईतील संघटित टोळ्या व गँगवॉर संपले. शूटआऊट थंडावले. मग पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना चाप बसविण्यासाठी नवीन कायदे का अमलात आणले जात नाहीत? आज सामान्य पोलिसांची जी काही हेळसांड, कुचेष्टा केली जात आहे त्याला न्याययंत्रणा, राजकारणी, मंत्री, ज्येष्ठ पोलीस अधिकारी आदी सर्वच जण जबाबदार आहेत. पोलीस हा ‘डिसिप्लिनरी फोर्स’ असल्याने त्यांना कसेही वागून चालत नाही. भरचौकात, भर पब्लिकमध्ये त्यांना काहीही करता येत नाही. आता तर आपल्या प्रत्येक हालचालीचे मोबाईलद्वारे व्हिडीओ शूटिंग केले जात असल्याने पोलिसांवर मर्यादा पडल्या आहेत. एक चाळिशीतील महिला खाकी वर्दीतील एका पोलीस शिपायाच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला भर रस्त्यात लोळवत होती व हे सारे दृश्य आम पब्लिक बघत होती. त्या पोलिसावर मर्यादा असल्याने तो त्या महिलेवर ना हात उचलू शकत होता ना तिला शिवीगाळ करू शकत होता. निमूटपणे तो आपली सुटका कशी होईल हेच पाहत होता. अखेर त्या महिलेचा हात सुटला आणि त्या पोलिसाने धूम ठोकली. त्या महिलेशी अर्वाच्य भाषेत बोलल्यामुळे त्या शिपायावर अशी वाईट वेळ आली होती. तेव्हा आता खाकी वर्दीची मस्ती असलेल्या पोलिसांनीही आपण जनतेशी कसे वागावे याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अधिकार मिळाले आहेत म्हणून आपण कुणाशीही कसेही वागावे, खोट्या गुन्ह्यांत कुणालाही अडकवायचे आता दिवस गेले आहेत. तो एक काळ होता. पोलिसांनी काहीही केले तरी खपवून घेतले जात होते. पूर्वीचे वरिष्ठही सांभाळून घेत होते; परंतु वरिष्ठ अधिकारीही खोट्या चकमकीच्या आरोपांवरून जेलमध्ये जाऊ लागल्याने आता पोलिसांना कुणी वालीच राहिला नाही. एकेकाळी पोलिसांचे एन्काऊंटर हेच एक हुकमी अस्त्र होते, पण तेच हिरावून घेतले गेल्याने आता कोणत्याही गुंडाला पोलिसांची भीतीच राहिलेली नाही. त्यामुळेच आता त्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ले सुरू करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांऐवजी न्यायालयात आता आरोपींचीच बाजू अधिकपणे ऐकली जाते. पोलीस बर्‍याच केसमध्ये खोटे आरोप लावतात, असाच आता प्रत्येकाचा समज झाल्याने सराईत गुन्हेगारांनाही अलीकडे जामीन मिळत आहे. त्यामुळे नेहमी आत-बाहेर असणारे गुंड मोकाट सुटले आहेत. जामिनावर सुटून ते वारंवार गुन्हे करीत आहेत. गोवंडी येथे शिवाजीनगर पोलिसांवर कोयत्याने वार करणार्‍या गुंडांवरही अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. तेव्हा अशा गुंडांपासून आता पोलिसांचे संरक्षण कोण करणार, असा प्रश्‍न पडतो

No comments:

Post a Comment