Total Pageviews

Thursday 23 January 2014

NETAJI SUBHASH CHNDRA BOSE-PUNYANAGRI

तुम मुझे खून दो.. !'' तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुँगा !'' थेट काळजाला भिडणार्‍या या दोन वाक्यांनी भारतीय तरुणांमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास आणि स्फूर्ती निर्माण करून अनेकांना राष्ट्रभक्तीसाठी प्रेरित करणारे, इंग्रजांच्या अन्याय - अत्याचाराविरुद्ध लढा उभारून त्यांची सत्ता उलथवून टाकून मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 'स्वातंत्र्य' यज्ञ कुंडात आपलं सर्वस्व अर्पण करणारे महान क्रांतिकारक भारतीय इतिहासातील अजरामर असे एक थोर लढवय्ये म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.जानकीदास आणि प्रभावती यांच्या पोटी २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे क्रांतिर▪सुभाषबाबूंचा जन्म झाला. त्यांची बालपणापासून राष्ट्रभक्तीकडे ओढ होती, हे त्यांनी लहानपणीच जमवलेल्या क्रांतिकारकांच्या चित्रांवरून स्पष्ट जाणवते. बालवयातच सुभाषबाबूंना जनतेवर होत असलेल्या अन्यायाची जाणीव झाली आणि त्यांनी त्या वेळी प्रतिज्ञा केली की, 'मी माझा देश स्वतंत्र करीन. त्यासाठी कितीही अडचणी आल्या किंवा कष्ट पडले तरी मागे हटणार नाही, देश स्वतंत्र होईपर्यंत मी सर्व विलांसाचा त्याग करीन!' खरोखर त्यांनी विद्यार्थीदशेत घेतलेली त्या वेळची प्रतिज्ञा आजही आम्हाला आदर्श आहे. १९२१ मध्ये सुभाषबाबूंनी कॉँग्रेसच्या राजकारणात प्रवेश केला. त्यामध्ये देशबंधू चित्तरंजनदास, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत सुभाषबाबू काम करण्यास तयार झाले. एकदा स्वयंसेवक दलाचे कार्य करीत असताना या दलावर ब्रिटिशांनी बंदी आणली. तरीही त्यांनी बैठका घेतल्यामुळे सरकारने त्यांच्यावर खटले भरले आणि काही नेत्यांसोबत सुभाषबाबूंना सहा महिन्यांची सजा भोगावी लागली. १९४0 मध्ये दुसरे महायुद्ध ऐन रंगात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी जपान, र्जमनीची मदत घ्यावीच लागेल, असे मत सुभाषबाबूंनी व्यक्त केले. परंतु कॉँग्रेस कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यावरून गांधीजींचे व त्यांचे वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि सुभाषबाबूंनी कॉँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी 'फॉरवर्ड ब्लॉक' नावाचा पक्ष काढून तरुणांना एकत्र करण्याचे काम सुरू केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाचे त्यांची दमदार भाषणे होऊ लागली. कॉँग्रेसने इंग्रज सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू करावे, असा त्यांचा आग्रह होता. म्हणून त्यांच्या या भूमिकेमुळे इंग्रजांनी अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक केली. परंतु लवकरच त्यांची सुटका करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. तरीही कडक सुरक्षा असतानाही १९४१ च्या सुरुवातीला वेशांतर करून ते थेट र्जमनीला पोहोचले. तेथे त्यांनी 'फ्री इंडिया सेंटर'ची स्थापना केली. र्जमनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय जनतेला सशस्त्र लढय़ात भाग घेण्याचे आवाहन केले. हिटलरनेही त्यांना खूप मदत केली. आपल्या देशाविषयीची तळमळ पाहून हिटलरने त्यांना 'हिज् एक्लन्सी सुभाषचंद्र बोस, डेप्युटी फ्यूरर ऑफ इंडिया' ही बहुमानाची पदवी दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाषबाबूंनी र्जमनीतून प्रय▪सुरू केल्यानंतर त्याचवेळी रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला बोलावून घेतले आणि हजारो मैलांचा सागरी प्रवास करून ते जपानला पोहोचले. या प्रवासात त्यांना खूप त्रास झाला तरीही ते खचले नाहीत. उलट दिवसेंदिवस त्यांच्या चेहर्‍यावर एक विलक्षण तेज दिसत होते आणि त्याच तेजाने ते अधिकच आक्रमक होत होते. रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये १९१५ पासून वास्तव्य करीत असताना आग्नेय आशियातील राष्ट्रांमध्ये वास्तव्य करणार्‍या देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी 'इंडियन इंडिपेंडन्स लीग' नावाची संघटना स्थापन केली होती. त्यानंतर याच संघटनेचे रूपांतर 'आझाद हिंद सेना' असे करण्यात आले आणि या सेनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सुभाषबाबूंवर देण्यात आली. ते या सेनेचे सरसेनापती झाले आणि सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी अभिमानाने बहाल केली. कुठल्याही परिस्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेच पाहिजे. त्याशिवाय त्यांना चैन पडणारच नव्हती. त्यांनी लगेच १९४३ मध्ये सिंगापूर येथे 'आझाद हिंद सरकार' त्यानंतर स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने पराक्रम गाजवू शकतात. अनादीकालापासून भारतीय स्त्रियांनी रणांगणावर पराक्रम गाजवल्याची अनेक तेजस्वी उदाहरणे देता येईल. हीच बाब लक्षात घेऊन 'झांशी राणी लक्ष्मीबाई पथक' स्थापन केले आणि स्वातंत्र्याच्या लढाईत महिलांनाही त्यांनी मानाचं स्थान दिलं. या पथकाच्या प्रमुख डॉ. लक्ष्मीदेवी स्वामी नाथन या महिला होत्या. पुढे पुढे आझाद हिंद सेनेने खूप मोठमोठे पराक्रम गाजवले. दुसर्‍या महायुद्धात अंदमान आणि निकोबार ही बेटे जपानने जिंकून घेतली आणि ते भारतभूमीचा एक भाग म्हणून सुभाषबाबूंच्या स्वाधीन केली. येथेच सुभाषबाबूंना 'स्वातंत्र्याच्या आशेचा किरण' दिसू लागला. त्यांचं मन हर्षोल्लासाने भरून आले. त्यांनी याच दोन बेटांचे 'शहीद' आणि 'स्वराज्य' असे नामकरण केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या या भूमीत नेताजींना गहिवरून आले. तेथून ते पुढे कूच करीत राहिले. १९४५ ला ब्रह्मदेशाची सरहद्द ओलांडून आझाद हिंद फौजेचे शूर सैनिक भारताच्या सीमेत घुसले. आपल्या लाडक्या मातृभूमीच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू वाहू लागले. मोठय़ा अभिमानाने तेथील पवित्र माती, त्यांनी आपल्या कपाळावर लावली आणि 'जयहिंद' 'चलो दिल्ली' या वीरश्रीयुक्त घोषणा करीत ते क्रांतिकारक आगेकूच करू लागले. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर १९४५ च्या ऑगस्ट महिन्यात 'अणुबॉम्ब' टाकले. याच सुमारास नेताजींनी आपल्या सहकार्‍यांसमोर शेवटचे भाषण केले. 'मित्रहो, या लढाईचे फासे दुर्दैवाने आपल्याला प्रतिकूल पडत आहेत. पावसाळ्यापूर्वी आपल्याला इंफाळ सर करता आलं असतं तर सारंच चित्र कदाचित बदललं असतं ! परंतु दुर्दैवाने ती गोष्ट घडू शकत नाही..!' क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, '.. नि यामुळेच आज आपल्यावर माघार घेण्याचा कटू प्रसंग निर्माण झाला आहे. परंतु आजची ही माघार ही उद्याच्या यशाकरताच आहे, हे लक्षात ठेवा. आज इंफाळमधून माघार घेऊनच उद्या स्वातंत्र्याचे गौरीशंकर आपण जिंकून घेणार आहोत..माझ्या मित्रांनो तुमचं सार्‍यांचं ऋण कधीही न फिटणारं आहे. मी तुमच्याकडे प्रेम मागितलं.. तर तुम्ही मला प्राण देऊ केलेत.. मित्रहो, उद्या कदाचित आपणा सर्वांनाच कैद होऊन फासावर चढावं लागेल; परंतु ते फाशीचे दोरही आपल्याला फुलांच्या हारासारखे वाटतील.. मी तुम्हाला पुन्हा एकदा आश्‍वासन देतो की, पुढच्या प्रत्येक कसोटीच्या क्षणी हा सुभाष त्याच्या शपथेप्रमाणे तुमच्याच शेजारी असेल.. तुमच्याच शेजारी असेल.. ! नेताजीचं हे अखेरचं वाक्य ऐकून सारेच गहिवरले. प्रत्येकजण देशासाठी आपले बहुमोल प्राण आनंदाने द्यावयास तयार होता. त्या सर्वांची एकच इच्छा होती, ' लाख मरोत; परंतु लाखांचा पोशिंदा न मरो' या म्हणीप्रमाणे या लढाईची सूत्रे हलविण्यासाठी नेताजी सुरक्षित राहणेच आवश्यक होते. परंतु रंगूनहून एका सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नेताजी विमानात बसले आणि विमान सुरक्षित ठिकाणी जाण्याऐवजी १८ ऑगस्ट १९४५ रोजी दुर्दैवाने विमानाचा अपघात झाला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणारे, इंग्रजांना देशाबाहेर हाकलून देण्याचा प्रय▪करणार्‍या खर्‍या राष्ट्रभक्ताचा म्हणजे सुभाषबाबूंचा अंत झाला. आजची परिस्थितीही गंभीर आहे. मग आजही आम्हाला क्रांती करण्याची गरज आहे का? मित्रांनो आज जरी सशस्त्र क्रांतीची गरज नसली तरी आम्हाला 'क्रांतिकारी विचारांची' गरज आहे. तेव्हाच आपण आपला देश 'महासत्ता' बनवण्यात यशस्वी होऊ शकतो. तरुण हा देशाचा आधार असतो. तरुणांमुळेच आमच्या देशात अनेक क्रांत्या झाल्या. मग तरुणांना एकत्रित करून निवडणुका झाल्या की, आमचा तरुण दारू, मटण खाऊन रममान होताना दिसतो. अन्याय, अत्याचार होताना दिसूनही बरेच तरुण तिकडे डोळेझाकपणा करताना दिसतात. आज आपल्या देशात इंग्रज नाहीत, पण आपलीच माणसं आपल्याच माणसांच्या मानगुटीवर बसताना दिसत आहेत. आजही बहुजन शोषित, पीडित, गरीब लोकांचे शोषण होताना दिसत आहेत. महागाई, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. महिलांवर, शेतकर्‍यांवर, कष्टकर्‍यांवर होणार्‍या अन्याय - अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे. 'क्रांतिकारी विचार' आत्मसात करून समाजाच्या हितासाठी झटणार्‍या प्रत्येकास हा लेखप्रपंच सादर अर्पण.

No comments:

Post a Comment