Total Pageviews

Tuesday 24 December 2013

TERRORISM IN MAHARASHTRA 2013

२०१३ मध्ये महाराष्ट्रात वाढता दहशतवाद आणी नक्षलवाद १९९३ पासुन महाराष्ट्रात १५ दहशतवादी हल्ले झाले आहेत ज्यामध्ये ५०० हुन जास्त नागरिक मारले गेले आणी २००० हुन जास्त गंभीर जखमी झाले.दहशतवाद्यांचे हल्ले हे दोन प्रकारचे असतात. एक प्रकारच्या हल्ल्यात गर्दी असलेल्या ठिकाणी बॉम्ब ठेवून निरपराध नागरिकांना मारले जाते. दुसऱ्या प्रकारात महत्त्वाच्या ठिकाणी 6-10 दहशतवादी शस्त्रे घेऊन हल्ला करतात व तेथील जनतेला मारतात. अशा प्रकारचे अक्षरधाम मंदिर, अहमदाबाद, पार्लिमेंट हाऊस, 26/11 ला करण्यात आले. हल्ले करणारे दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक होते आणि समुद्राकडून आत आले होते. अशा दहशतवाद्यांना मात्र स्थानिक नागरिकांची मदत जरुरी असते. अशा प्रकारच्या प्रत्येक हल्ल्यात 10-15 स्थानिक नागरिकांनी मदत केली असावी. पण अशा हल्ल्यांची जास्त काळजी नको. कारण दशहतवाद्यांना मारण्याकरता आपले नॅशनल सेक्युरिटी गार्डचे कमांडो जे सैन्याचे अधिकारी आणि जवान असतात ते समर्थ आहे. ब्लास्ट : गृहमंत्री, आणि ऊंटावरून शेळ्या हाकणारे तज्ञ स्फोटानंतर विरोधक, वृत्तपत्रां आणि टीव्ही वाहिन्यां स्फोटाचे खापर गृहमंत्र्यांच्या नावाने फोडतात. त्यांच्या बोलण्यावरून असे वाटते की गृहमंत्र्यांची बदली झाली तर त्यापुढे मुंबईवरचे हल्ले कायमचे थांबतील. सत्य हे आहे की ब्रम्हदेवाला जरी महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदयावर बसवले तरी हे हल्ले/अशा घटना थांबतील का? हे हल्ले थांबणार नाही कारण आपली सुरक्षा व्यवस्था ही पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. काही महत्त्वाचे मुद्दे अशा प्रकारे आहेत. सी.सी.टीव्ही कॅमेरे लागले नाही सी सी टीव्ही हल्ले थांबवू शकत नाही. कॅमेरे लावायला आणि त्यांना सांभाळायला खर्च फार येतो. यामुळे केवळ कॅमेरे बनवणाऱ्या कंपन्यांचा फायदा होईल. सगळ्या मुंबईत कॅमेरे लागू शकत नाही. लावले तरी ज्या ठिकाणी कॅमेरे नाहीत तिथे आतंकवादी बॉम्बस्फोट करतील. कॅमेरे रात्रीच्या वेळेला, पावसात नीट काम करत नाही. कॅमेऱ्यामध्ये असलेल्या फोटोंचा अभ्यास करायला हजारो तज्ञ लागतील. आतंकवादी बुद्धीबळाचा खेळ खेळत आहेत. जर मुंबईत कॅमेरे लावले तर हल्ला पुण्यात होईल. असले दळभद्री विचार पुढे ठेवायला वाईट वाटते. पण आख्या महाराष्ट्राला कॅमेरा सुसज्ज करू शकतो का? पोलिसांच्या आणि गुप्तहेर खात्याच्या रिक्त जागा भरणे, आतंकवादी हल्ल्याला प्रतिकार करण्यास लागणारी आधुनिक शस्त्रे आणि बाकी सामानाची खरेदी लवकर ठरायला हवी. पण यामुळे हल्ले थांबतील का? आज मुंबईमध्ये सर्वांत जास्त पोलीस अधिकारी, नोकरशाही, मंत्री आणि तज्ज्ञ आहेत. महाराष्ट्राची सगळी बुद्धी मुंबईत एकवटली आहे. तरी पण हल्ले होतात. याचा अर्थ आतंकवादी आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत का? सर्वांत जास्त हुशार पोलीस मुंबई पोस्टींग मिळवतात, असे असून सुद्धा आतंकवाद्यांना मुंबईत यश पुन्हा पुन्हा कां मिळते?. 20-30 टक्के पोलीस बंन्दोबस्ताच्या कामावरती असतात, ४०-५० टक्के पोलीस व्हिआयपी कामावरती असतात त्यामुळे सामान्य माणसांच्या रक्षणाकरता आणि गुप्तहेर माहिती काढण्याकरता पुरेशी पोलीस संख्या मिळत नाही.म्हणुन व्हिआयपी सेक्युरीटी पुर्णपणे थांबवली पाहीजे. काय करायला पाहिजे? मुंबईवरती हल्ले समुद्राकडून आलेल्या आतंकवाद्यांकडून किंवा देशात असलेल्या स्लिपरसेलकडून होतात. चांगली सागरी सुरक्षा समुद्राकडचे हल्ले थांबवू शकते. पण वेगवेगळ्या कारणामुळे पुढची 15-20 वर्षे ही सागरी सुरक्षा ठीक होऊ शकत नाही. देशातल्या स्लिपर सेलच्या आतंकवादी हल्ले थांबवण्यात गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर माहिती ठीक करणे महत्त्वाचे आहे. आतंकवादी हल्ला कुठे व केव्हा करणार ही माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. तरच आपण तो हल्ला थांबवू शकतो. मागच्या वर्षी जवळ जवळ 100-120 वेळा आतंकवादी हल्ला होणार म्हणून सांगण्यात आले. पण हे पूर्णपणे खोट ठरले. लांडगा (आतंकवादी) येणार अशी अफवा गुप्तहेर खाती पसरवत असतात. आतंकवादी हल्ला होणार ही आगामी सूचना दिल्यानंतर, तो हल्ला थांबवण्यात यशस्वी झाले असे ऐकिवात/पाहणीत नाही. तो हल्ला थांबवण्यात ते पूर्णपणे अपयशी आहेत. आपल्याला आतंकवादी हल्ला कुठल्या जागी आणि केव्हा होणार हे कळले तर त्याला थांबवता येईल. याकरता आपल्याला खालील गोष्टी करायला लागतील. 1) CRIME & CRIMINAL TRACKING NETWORK SYSTEM (CCTNS) म्हणजे वेगवेगळे पोलीस शाखा आणि गुप्तहेर खाते कम्प्युटर नेटवर्कनी जोडली जातील. यामुळे गुप्तहेर माहिती गोळा करणे, त्यांचा अभ्यास करणे, हल्ला केव्हा होईल हा निष्कर्ष लावणे, ही माहिती सगळीकडे विशेषता ड्युटीवर असणाऱ्या पोलीसांकडे पोहचवणे. शास्त्रीय पद्धतीने होईल. सध्या यावर हत्तीच्या गतीने काम सुरू आहे. 2) त्यानंतर NATIONAL COUNTER TERRORISM CENTRE (NCTC) निर्माण करायला हवे. हे फक्त नक्षलवाद, आतंकवाद, सायबर टेटोरीझम, मारको टेटोरीझम वर लक्ष ठेवेल या भागाला नेहमीच्या कायदा आणि सुव्यवस्थेपासून दूर ठेवावे लागेल. 3) मल्टी एजंन्सी सेंटर (MULTI AGENCY CENTRE) आज 15 हून जास्त गुप्तहेर खाती देशात काम करतात. उजवा हात काय करतो, हे डाव्या हाताला माहित नसते. म्हणून या करता काश्मीर आणि ईशान्य भारतात आतंकवाद्यांशी लढण्याकरता मल्टी एजंन्सी सेंटर तयार करण्यात आली. सगळी गुप्तहेर खाती प्रत्येक आठवड्यात भेटून त्यांच्याकडे असलेली माहिती जमिनीवरती काम करणाऱ्या सैनिकांना (म्हणजे मुंबईत पोलिसांना) सांगतात. मल्टी एजंन्सी सेंटर लवकरात लवकर मजबूत करायला हवे. 4) टेक्निकल इन्टेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. त्याकरता NATIONAL TECHNICAL RESEARCH ORGNIZATION (NTRO) ते फार चांगले काम केले आहेत. त्यांचे तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल कॉलवरचे संभाषण ऐकणे, टेलिफोनचे टॅपींग, ई-मेल आणि एसएमएस यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.आपल्या देशात यामुळे पुष्कळ गुप्त माहिती मिळाली आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात पोलिसांकडे पोहचायला पाहिजे. सिसी कॅमेऱ्यावर प्रामाणिक करदात्यांचे पैसे बरबाद करायच्या ऐवजी या तंत्रज्ञानात पैसे खर्च करा. ते जास्त उपयोगी पडतील. 5) NATIONAL INTELLIGENCE NETWORK गुप्तहेर खात्याचे नेटवर्क गुप्तहेर खात्याचे नेटवर्क लवकरात लवकर महाराष्ट्रात निर्माण करा. यामुळे गुप्तहेर माहिती शास्त्रीय पद्धतीने पोहचवण्यात मदत मिळेल. याशिवाय अंतर्गत सुरक्षा मंत्री आणि खाते निर्माण करावे लागेल. (INTERNAL SECURITY MINISTER) यांचे लक्ष केवळ सुरक्षेवर असेल. 6) पोलीस आणि गुप्तहेर माहिती. भारतीय सैन्याचा गेल्या 50 वर्षांचा अनुभव आहे की आतंकवाद्यांशी लढतांना सर्वांत चांगली गुप्तहेर माहिती ही व्यावसायिक गुप्तहेर विभागाकडून (IB/ RAW) मिळायच्या ऐवजी साइटवर असणाऱ्या सैनिकांकडून मिळते. म्हणून प्रत्येक पोलीस प्रथम गुप्तहेर बनला पाहिजे. आपले गुप्तहेर जाळे जर मजबूत बनवायचे असेल तर 1500-2000 गुप्तहेर तयार करून जमणार नाही. 1.50 लाख महाराष्ट्र पोलीस सर्वप्रथम गुप्तहेर बनायला हवेत. मग जाळे मोठे होईल आणि आतंकवादी मासे जाळ्यात अडकायची शक्यता पण वाढेल. सामान्य माणसे पोलिसांचे कान आणि डोळे बनायला हवे. सध्या पोलीस आणि सामान्यात फार दुरावा आहे. हा दुरावा वाढवण्यात ट्रॅफिक पोलीस फार मोठे काम करतात तो थांबवायला हवा. रस्त्यावर फिरणारी मुले, भिकारी, भाजीवाले, स्टेशनवरचे दुकानदार, रिक्षाचालक म्हणजे रस्त्यावर फिरणारी सामान्य माणसे पोलिसांना गुप्तहेर मदत करू शकतात. पण त्यांना पोलिसांविषयी विश्वास वाटायला पाहिजे. सागरी सुरक्षा सागरी सुरक्षा हा एक वेगळाच विषय आहे. सध्या एवढेच सांगता येईल की 15000 कोटीचा सागरी सुरक्षा प्लॅन तयार आहे. पण अंमलबजावणी व्हायला (बोट विकत घेणे, रडार लावणे) याला कमीत कमी 15-20 वर्षे लागतील, तो पर्यंत काय?महाराष्ट्रात सगळीकडे कुंपण उभारून, सिसी टीव्ही लावून किंवा गृहमंत्र्यांना बदलून काही होणार नाही. सुस्तावलेल्या नोकरशाहीला काम करावे लागेल. पोलीस नेतृत्वाला आपआपसात भांडण्यापेक्षा टीव्हीसमोर होणारी रस्सीखेच सोडून व भाषणाचा मोह सोडावा लागेल. त्यांना आपल्या कामावर (सामान्य माणसाचे रक्षण करणे) लक्ष द्यावे लागेल. सर्वांत महत्त्वाचा उल्लेखनीय मुद्दा असा की, आतंकवाद्यांची मुळे पाकीस्तान, बंगला देश आणि चीनमध्ये आहेत. आतंकवादाची लढाई आपल्याला देशांतर्गत, सीमेवरती आणि पाकीस्तान, बांगलादेशच्या आत जाऊन लढावी लागेल. आपल्या देशात प्रत्येक वर्षी 2000-2500 भारतीय नागरिक आतंकवादी धरण्यामध्ये मारले जातात. जे आतंकवादी पकडले जातात त्याचे खटले 20-25 वर्षे चालतात. 1993 मुंबई हल्ल्याच्या आतंकवाद्यांचे खटले अजूनही चालू आहेत. ज्यांना आपली संथ न्यायालय शिक्षा देते, त्यांना फाशीवर लटकवण्याकरता आपले सरकार मतपेटीच्या राजकारणास्तव तयार नाही.वर सांगितलेले ऊपाय केंव्हा होतील ? दर्शनी एकच उपाय शिल्लक दिसतो. मंदिरात जाऊन आतंकवादी हल्ला होऊ नये म्हणून प्रार्थना करणे . तुका म्हणे स्वस्थ रहावे जे जे होईल तेते पहावे.

No comments:

Post a Comment