Total Pageviews

Saturday 23 November 2013

तेजपाल यांचे ‘तेज’ TARUN TEJPAL

तेजपाल यांचे ‘तेज’ Published on: November 23, 2013 - 10:11 More in: अग्रलेख अत्यंत खळबळजनक स्टिंग ऑपरेशन्स करून भल्या भल्यांची पोल खोलणार्‍या तेहलकाचे संपादक तरूण तेजपाल हे शेवटी स्वतःच गोत्यात आले. आपल्या प्रकाशन संस्थेतील महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सार्वजनिक जीवनातील शूचितेविषयी जगाला पाठ देत आलेल्या ‘तेहलका’ ने या प्रकरणानंतर जी सारवासारव चालवली ती मूळ गुन्ह्याइतकीच गंभीर आणि संबंधितांची दांभिकता दर्शविणारी आहे. तेजपाल यांनी झाल्या प्रकाराची वाच्यता होताच सहा महिने पदावरून दूर राहण्याची तयारी स्वतःहून दाखवलेली असली तरी ही त्यांनी स्वतः काढलेली पळवाटच म्हणावी लागेल. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची ही चाल वाटते. निर्भया प्रकरणानंतर देशात अस्तित्वात आलेल्या कायद्यानुसार लैंगिक शोषण हाही बलात्काराइतकाच गंभीर गुन्हा ठरतो आणि त्याला किमान सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. तेजपाल यांना आपण निर्दोष आहोत असे वाटत असेल तर त्यांनी कायद्यानुसार कारवाईला सामोरे जाऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची हिंमत दाखवायला हवी होती. पण जगाला पांडित्य शिकवणार्‍या तेहलकाच्या कंपूने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आणि तेजपाल स्वतः नामानिराळे झाले. आपल्या दृष्टीने या प्रकरणाला एक वेगळा आयाम आहे तो म्हणजे हे प्रकरण गोव्यात घडले, तेही अलीकडेच आयोजित केलेल्या थिंक फेस्ट या वैचारिक महोत्सवाच्या दरम्यान. या महोत्सवामध्ये जगभरातून मोठमोठ्या विचारवंतांना आणून वैचारिक मंथनाचा जो देखावा तेहलकाने घडवून आणला, त्या दिव्याखाली शेवटी अंधारच निघाला. तेजपाल यांनी आपल्यावर हॉटेलमध्ये बलात्काराचा दोन वेळा प्रयत्न केला आणि नोकरी टिकवायची असेल तर तुला हे करावेच लागेल अशी दमबाजी केली असे पीडित तरूणीचे म्हणणे आहे. ही काही एकाच संस्थेत काम करणार्‍या आणि सहवासाने एकमेकांशी भावनिक गुंतवणूक झालेल्या दोन व्यक्तींची कहाणी नव्हे, वा व्यावसायिक स्पर्धेतून केला गेलेला हा द्वेषपूर्ण आरोपही नव्हे. तरूणीची तक्रार खरी असेल तर हा सरळसरळ आपल्या कनिष्ठ महिला सहकार्‍याच्या असहाय्यतेचा शारीरिक गैरफायदा घेण्याचा प्रकार ठरतो. नशेच्या धुंदीत एकदा चुकून हे घडलेले नाही, तर दोन वेळा हा प्रकार घडला आणि दोन्ही वेळा आपण रडत रडत आपल्या खोलीत परतले असे तक्रारदार तरूणीचे म्हणणे आहे. तिने या प्रकरणी आपल्या प्रकाशनसंस्थेपाशी दाद मागण्याचा प्रयत्न केला, खुद्द तेजपाल यांच्या मुलीपर्यंतही हा विषय पोहोचवला. परंतु कुठेही तिला दाद मिळाली नाही व हे सारे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न झाला. तेहलका हा आज देशातील एक मोठा ब्रँड आहे. मोठमोठ्या शक्ती या माध्यम संस्थेच्या पाठीशी आहेत. हे आमचे संस्थांतर्गत प्रकरण आहे असे सांगणार्‍या तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी अलीकडेच सीबीआय प्रमुखांच्या वादग्रस्त विधानावर त्यांच्यावर तुटून पडल्या होत्या. त्यांची ही दांभिकता या प्रकरणात सपशेल उघडी पडली आहे. तेजपाल यांच्या पाठीराख्यांनी हे प्रकरण चिघळू नये यासाठी आटोकाट प्रयत्न चालवला असल्याचे दिसते, परंतु पिंजर्‍यातून बाहेर पडलेला पुन्हा उंदीर पिंजर्‍यात जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी आता काय तो सोक्षमोक्ष लावावा लागेल. संबंधित तरूणीला बदनामीच्या भीतीने आणि पुढील न्यायालयीन कटकटी टाळण्यासाठी या प्रकरणात पोलीस तक्रार करायची नसेल, परंतु गोव्यात हा प्रकार घडलेला असल्याने या प्रकाराची गोवा पोलिसांकडून शहानिशा व्हायला कोणाची हरकत असण्याचे काही कारण नाही. त्यासाठी तेजपाल यांना चौकशीसाठी पाचारण करणे हे पोलिसांचे पहिले कर्तव्य असेल. तेजपाल हे देशातील एक उत्कृष्ट पत्रकार आहेत याविषयी वादच नाही. त्यांनी या देशातील अनेक काळोख्या गोष्टी प्रकाशात आणल्या आणि कित्येकांची बुरखेफाड केली. परंतु आता त्यांची इभ्रत पणाला लागलेली आहे. स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची हिंमत त्यांनी दाखवावी. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून आपले लैंगिक शोषण झाल्याची तक्रार कायद्याच्या एका प्रशिक्षणार्थीने केली आहे. त्यानंतर तेजपाल प्रकरण घडले. समाजाला सदैव नीतीमत्तेचे पाठ देणार्‍या न्यायपालिका आणि माध्यमविश्वाची प्रतिष्ठाच या दोन्ही घटनांत पणाला लागली आहे. लोकशाहीचे एकेक खांब असे ढासळू लागले तर समाजाने अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची

No comments:

Post a Comment