Total Pageviews

Tuesday 8 January 2013

DELHI RAPEVICTIMS FRIENDS INTERVIEW ON TV

हैवानांच्या सापळ्यात आम्ही अडकलो...’
‘त्या’ तरूणीच्या मित्राने ऐकवली अत्याचाराची कहाणी
‘‘ज्या बसमध्ये आम्ही चढलो, त्यातील हैवानांनी एखाद्या मुलीवर अत्याचार करण्यासाठी सापळाच रचला होता. त्या सापळ्यात दुर्दैवाने आम्ही अडकलो. त्यांनी आम्हाला मारहाण केली, लोखंडी सळ्यांनी मारले, कपडे उतरवले, माझ्या मैत्रिणीवर अमानुष अत्याचार केले आणि निर्जनस्थळी आम्हाला बसमधून फेकून दिले..’’ अशा शब्दांत दिल्लीतील बलात्कारित तरुणीच्या मित्राने १६ डिसेंबरच्या काळरात्री आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची कहाणी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नुकतीच देशाला ऐकवली.
देशभरात खळबळ उडवणार्‍या दिल्लीतील बलात्कार प्रकरणात अत्याचार झालेल्या तरुणीसमवेत तिचा जो सॉफ्टवेअर अभियंता असलेला मित्र होता, त्याने सदर वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विस्तृत मुलाखतीत आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची इत्यंभूत कहाणी ऐकवली. आपल्या मैत्रिणीवर अत्याचार झाल्यानंतरही तिला जगायचे होते. जीवनाकडे ती सकारात्मकरीत्याच पाहात होती, परंतु आपण तिला वाचवू शकलो नाही याची खंतही त्याने व्यक्त केली.
बसमधील हैवानांनी आम्हाला निर्जनस्थळी जखमी स्थितीत बाहेर फेकून दिले, तेव्हा तेथे आमच्या मदतीला कोणीही आले नाही. अडीच तास आम्ही तेथे पडून होतो असेही या मित्राने सदर मुलाखतीत सांगितले. ज्या बसमध्ये आम्ही चढलो तिला काळ्या काचा होत्या व पडदे लावलेले होते. ते सावजाच्याच शोधात होते. त्यांनी सगळे नियोजन केलेले होते. चालक आणि त्याचा मदतनीस पुढे बसलेले होते, पण त्यांचे साथीदार मात्र प्रवासी असल्याप्रमाणे बसमधील आसनांवर बसलेले होते. आम्ही बसमध्ये चढल्यावर २० रुपये तिकीटभाडे म्हणूनही दिले. त्यानंतर त्यांनी माझ्या मैत्रिणीची छेड काढण्यास सुरूवात केली. मी त्यांना त्याचा जाब विचारला तेव्हा ते मारायला आले. मी त्यातल्या तिघांना मारहाण केली, परंतु बाकीच्यांनी मग लोखंडी सळी आणून माझ्यावर प्रहार केला. मी बेशुद्ध पडायच्या आधी त्यांनी माझ्या मैत्रिणीला खेचून मागच्या सीटवर नेले. जवळजवळ अडीच तास ते आमच्यासह बस शहरभर फिरवत होते. आम्ही मदतीसाठी ओरडत होतो, पण त्यांनी बसमधील दिवे विझवले होते. आम्ही त्यांचा प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या मैत्रिणीने पोलिसांशी १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला. मला जबर मारहाण झाल्याने मी नंतर बेशुद्ध झालो. आम्हाला बसमधून बाहेर फेकून देण्याआधी त्यांनी आमचे मोबाईल काढून घेतले. आमचे सगळे कपडे काढून घेतले आणि आम्हाला निर्जनस्थळी फेकून दिले अशी माहितीही या तरुणाने सदर मुलाखतीत दिली.
आम्हाला बसमधून बाहेर टाकल्यावर आमच्या अंगावरून गाडी नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण मी माझ्या मैत्रिणीला वेळीच बाजूला ओढले. आमच्या अंगावर कपडे नव्हते. तरीही आम्ही त्या रस्त्याने येणार्‍या - जाणार्‍यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अनेक रिक्षा, गाड्या आम्हाला बघून हळू व्हायच्या, पण कोणीही थांबले नाही. वीस - पंचवीस मिनिटे हाच प्रकार चालला होता. मग कोणीतरी थांबले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. तीस - पस्तीस मिनिटांनी पोलिसांच्या तीन पीसीआर व्हॅन आमच्याजवळ आल्या, पण हे प्रकरण कोणत्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत येते त्याची चर्चा करण्यात त्यांनी वेळ दवडला असेही या मुलाखतीत सदर तरूणाने सांगितले. या पोलिसांनी आम्हाला कपडे दिले नाहीत वा रुग्णवाहिकाही बोलावली नाही. ते फक्त आम्हाला बघत होते. पुन्हा पुन्हा विनंती केल्यावर कोणी तरी आम्हाला चादरीचा तुकडा माझ्या मैत्रिणीला पांघरायला दिला. तिला प्रचंड रक्तस्त्राव होत होता, पण आम्हाला जवळच्या इस्पितळात दाखल करण्याऐवजी दूरच्या सफदरजंग इस्पितळात ते आम्हाला घेऊन गेले, असेही या तरूणाने मुलाखतीत सांगितले. पोलिसांच्या पीसीआर व्हॅनमध्ये मी माझ्या जखमी मैत्रिणीला स्वतः चढवले, कारण पोलीसही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिला हात लावायला तयार नव्हते. त्यांना आपल्या कपड्यांवर डाग पडतील याची चिंता होती, असेही या तरुणाने सांगितले. बघ्यांची मोठी गर्दी होती, पण तेही मदत करायला घाबरत होते. त्यांना पोलीस स्थानकाच्या आणि कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील याची चिंता वाटत असावी. इस्पितळात नेल्यावरही आम्हाला लगेच उपचारार्थ दाखल करून घेतले गेले नाही. मला कपड्यांसाठी अक्षरशः भीक मागावी लागली. सफाई कर्मचार्‍यांपाशी मी मला पांघरायला कपडे देण्याची विनंती केली. पण त्यांनीही कपडे दिले नाहीत. मी मग एका अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल मागून माझ्या नातेवाईकांना फोन केला, पण मी त्यांना मला अपघात झाल्याचे सांगितले. माझे नातेवाईक आले तेव्हा कोठे माझ्यावर उपचार सुरू झाले, असेही सदर तरूणाने झी न्यूजवरील या मुलाखतीत सांगितले. माझ्या डोक्यावर लोखंडी सळयांनी प्रहार झाले होते. मला चालता येत नव्हते. दोन आठवडे माझे हात मला हलवता येत नव्हते. माझे कुटुंब मला माझ्या गावी हलवू पाहात होते, पण मी पोलिसांना मदत करण्यासाठी दिल्लीत राहायचे ठरवले.
माझ्या मैत्रिणीला मी जेव्हा इस्पितळात जाऊन भेटलो तेव्हा ती मला पाहून हसली. ती बोलू शकत नव्हती, पण तिला लिहिता येत होते. तिला जगायचे होते आणि तशी इच्छा तिने व्यक्त केली होती. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी तिची तीव्र इच्छा होती. आपल्यावरील उपचारांचा खर्च किती होईल याचीही तिला चिंता होती. मी तिच्या सोबत राहावे असे ती सांगत होती, असेही या तरूणाने सांगितले. तिच्याशी त्यांनी काय केले हे मी बेशुद्ध पडल्याने मला माहीत नव्हते. पण तिने न्यायदंडाधिकार्‍यांना जेव्हा पहिला जबाब दिला तेव्हाच मला काय घडले हे समजले. त्यांनी तिच्याशी जे केले ते ऐकून मला धक्काच बसला. जनावरेही शिकार करतात, पण एवढा पाशवीपणा तीही दाखवत नाहीत. तिने आपल्यावरील अत्याचारांची सगळी माहिती न्यायदंडाधिकार्‍यांना दिली आणि त्या नराधमांना फाशीची नव्हे तर जाळून मारण्याची शिक्षा द्या अशी विनंतीही केली अशी माहिती सदर तरूणाने दिली. तो पहिला जबाब देत असताना तिला खूप त्रास होत होता. ती खोकत होती आणि तिला रक्तस्रावही होत होता. तिला व्हेंटिलेटर लावलेला होता. तिच्यावर जबाब देण्यासंबंधी कोणताही दबाव नव्हता, पण दंडाधिकार्‍यांनी सांगितले की तिच्यावर दबाव होता, असेही सदर तरूणाने सांगितले. मेणबत्त्या लावून समाजाची मानसिकता बदलता येणार नाही असे मतही या तरूणाने सदर मुलाखतीत व्यक्त केले. कधी कोणी मदतीसाठी हाक दिली तर समाजाने मदतीला धावले पाहिजे, नुसती बघ्याची भूमिका बजावू नये असेही तो म्हणाला. ‘‘आमच्याकडे पुष्कळ कायदे आहेत, पण पोलीस गुन्हा नोंदवतील की नाही ही जनतेला शंका असते, त्यामुळे लोक पोलिसांत जायला घाबरतात.’’ असेही त्याने सांगितले. या एका प्रकरणात जलद गतीने न्याय देण्याचे आश्वासन दिले गेले आहे, पण प्रत्येक प्रकरणात असा जलद न्याय का मिळू नये असा सवालही त्याने केला. माझ्यावरील उपचाराचा सारा खर्च मी स्वतः सोसतो आहे. सरकारने त्यासाठी छदामही दिलेला नाही असेही त्याने सांगितले

No comments:

Post a Comment