Total Pageviews

Friday 28 July 2023

कारगिलची पुनरावृत्ती होईल का? बहुआयामी सुरक्षा आव्ह्नांचा मुकाबला करण्याची क्षमता निर्माण करा


कारगिल युद्धाला 24 वर्षे पूर्ण झाली. त्या पाश्र्वभूमीवर या युद्धामध्ये पराक्रमाची बाजी लावून विजय पताका फडकवणार्या सैनिकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरते. अत्यंत खडतर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता ज्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेला अबाधित ठेवले, त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन, भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना, आपण देखील तेवढेच तत्पर राहिले पाहिजे. ही जाणीव या निमित्ताने सर्वांच्या मनात रुजवली गेली पाहिजे.

पाकिस्तानी लष्कर मे १९९९ मध्ये कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रुपात आले. पाकिस्तानी लष्कराला भारतीय भूमिवरून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले. यात भारतीय लष्कराचे ३० हजार जवान सहभागी झाले. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

लष्करातील ५४३ अधिकारी, जवानांना युद्धात वीरमरण 

भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले . १३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता.

लेफ्टनंट सौरभ कालियांमुळे पाकिस्तानी घुसखोरीची  माहिती सर्वात प्रथम मिळाली.केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा ,कारगिल युद्धात शहिद झाले. कॅफ्टन विक्रम बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून येईल.बत्रा यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले .

२२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले.विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे शहिद झाला होता, तेथे सर्व सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी जातात. 

खालूबर रिजलाइनला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅफ्टन मनोज पांडे शहिद झाले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, ना छोडनू. ( नेपाळी भाषेचा मराठी अर्थ- त्यांना सोडू नका) २४ वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

कारगिलची पुनरावृत्ती होईल का?

ज्या लेह लद्दाख भागात कारगीलचे युद्ध झाले, त्या भागात आपले सैन्य फार कमी होते. आता या भागात भारतीय लष्कराने सैन्याची संख्या आणि पेट्रोलिंग वाढविल्यामुळे पुन्हा कारगील युद्धासारखी परिस्थिती निर्माण होणे अशक्य आहे. मात्र लद्दाखच्या भारत-चीन सीमेवर अद्यापी सैन्याची संख्या कमी आहे. कारगीलसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी १७ माऊंटन स्ट्राईक कोर नवी लष्करी तुकडी तयार करावी.

आंदमान निकोबार लक्षद्विप,मिनीकोय सुरक्षा 

अंदमान-निकोबार हे बेट श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार यासारख्या देशांमधून येणार्या लोकांसाठी एकप्रकारचे आश्रयस्थानच बनले आहे.  पाकिस्तानचे नौसैनिक दादागिरी करून भारतीय मासेमारांना पकडतात, दोन-दोन, तीन-तीन महिन्यांपर्यंत या मासेमारांच्या क्षेमकुशलतेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना काहीही माहिती दिली जात नाही, या मासेमारांच्या नौका तोडून टाकल्या जातात, जाळे समुद्रात फेकून दिले जाते. या सार्या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या आपत्तीबाबत कोण विचार करतो? आजच्या दिवशी आपले २५० हुन जास्त मासेमार आणी त्यांच्या बोटी पाकीस्तानच्या ताब्यात आहेत. शत्रु आणि देशविरोधी शक्तींचे डावपेच वेगाने बदली होत आहेत. पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात बंगलादेशी घुसखोरी होत आहे. पश्चिम आणि दक्षिण किनारपट्टीवरून अफू,गांजा, चरसची तस्करी थांबण्याचे काहीही लक्षण दिसत नाही. नौदल हे का थांबवत नाही? 

बेटांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची

भारताकडे आंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्विप,मिनीकोय हे दोन द्विपसमुह आहेत.अंदमान-निकोबार हा प्रदेश बंगालच्या उपसागरात वसलेला असून, त्याचा ८२४९ चौरस किलोमीटर इतक्या परिसरात विस्तार आहे. आंदमान आणि निकोबारच्या ६५० बेटांपैकी केवळ २८ बेटांवरच मनुष्य वस्ती आहे. उर्वरित बेटांवर मनुष्यवस्ती नसल्यामुळे तसेच त्या भागात सैन्य नसल्यामुळे समुद्री लुटेरे   किंवा दहशतवादी तेथे आपले तळ बनवू शकतात अशी भीती आहे. त्यामुळे या बेटांवरती कोस्टगार्ड, नौदल,तसेच हवाई दलाच्या माध्यमातुन पेट्रोलिंग वाढविण्याची गरज आहे. अशी बेटे शत्रुने ताब्यात घेतल्यास, ती बेटे परत मिळविण्याची ताकद आपल्या सैन्यात असणे गरजेचे आहे. आंदमान आणि निकोबारमध्ये सैन्याच्या दोन बटालियन्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक बेटावर सैन्य ठेवायचे असल्यास मोठ्या प्रमाणावर सैनिकांची, तसेच पैशांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सध्यातरी या भागात टेहाळणीचा पर्यायच लष्कराने स्वीकारला आहे. या भागात कुणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्याची क्षमता भारतीय सैन्यामध्ये आहे.

कोस्टल सिक्युरिटी  अभ्यास केंद्र जरुरी

नेपाळ, भूतान आणि म्यानमार या राज्यांच्या सीमेवर एक लाख ४१ हजार जवान तैनात आहेत. पण भारताच्या ७ हजार ५०० किलोमीटर सागरी किनारपट्टी असलेल्या भागासाठी फक्त बारा हजार कोस्ट गार्डची पदे आहेत. यामधील ४ हजार पदे रिक्त आहेत. सागरी सुरक्षा विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे  कोस्टल सिक्युरिटी संदर्भात एक अभ्यास केंद्र उभे केले पाहीजे, त्या ठिकाणी विचारवंत आणी अभ्यासकांची गरज आहे. 

अरबी समुद्रातील लक्षद्विप समुहावरही ,सोमालियन चाचे, पाकिस्तान आणि मालदिव या भागातील दहशतवादी या भागातून जात असल्याची शक्यता आहे. मात्र ही बेटे आंदमान-निकोबर द्विपसमुहाच्या तुलनेत लक्षद्विप बेटे भारतीय सीमेपेक्षा जवळ असल्याने गरज पडल्यास दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी आपल्या सैन्याला लागणार्या बोटी आणि विमाने तयार आहेत. त्यामुळे या बेटाच्या सुरक्षेची जास्त काळजी करण्याची गरज नाही.

भारत-पाकिस्तान सीमेकडे सर्वांचेच लक्ष असते. मात्र भारत-चीन, भारत-नेपाळ, भारत-म्यानमार, भारत-बांग्लादेश, भारत-श्रीलंका येथून घुसखोरी, तस्करी कायमच सुरू असते. या सर्व सीमा सुरक्षित करण्याची गरज आहे.

चीन, पाकिस्तानसह भारताच्या इतर शत्रुंनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेची अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत.  गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सीमा काही प्रमाणात सुरक्षित झालेल्या असल्या तरी अजूनही त्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या नाहीत. भारतासमोरील सुरक्षेची आव्हाने बहुआयामी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांना सामोरे जाण्यासाठी लष्कराची ताकद वाढविण्याची गरज आहे. कारगील दिवसाच्या निमित्ताने आपले सरकार या सगळ्या सुरक्षेच्या पैलूंवरती विचार करेल अशी अपेक्षा आहे. 

सैनिकांना विसरु नका  सैनिक बना

कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते, ते सैनिक जिंकतात.कुठलाही देश किती सुरक्षित आहे हे त्याच्याकडे किती शस्त्रसाठा आहे, यावरून ठरत नसते, तर त्यांच्याकडे असणार्या सैनिकांच्या क्षमता आणी मनोबलावरून ठरते. एका म्हणी नुसार ‘देव आणि सैनिकांवर आपण सर्वच प्रेम करतो. पण जेव्हा आपल्याला किंवा देशाला धोका निर्माण झाले तेव्हाच त्यांची आठवण येते. ते संकट जाते तेव्हा आपण त्यांना विसरतो. जे राष्ट्र आपल्या सैनिक आणी देश सुरक्षेला विसरते, ते कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून, आपले कर्तव्य पार पाडले, तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो. 




No comments:

Post a Comment