Total Pageviews

Wednesday, 21 April 2021

नक्षलबारीमध्ये लाल रंगाचा अस्त!-tarun bharat-editorial

 प. बंगालमधील माओवाद्यांचे उगमस्थान असलेल्या नक्षलबारीची आजची काय अवस्था आहे, यावर या निमित्ताने प्रकाश टाकल्यास लाल रंगाचा तेथून अस्त का होऊ लागला आहे, त्याची कल्पना येईल.

प. बंगाल हे राज्य एकेकाळी डाव्या चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. पण, या राज्यातून आता साम्यवाद्यांच्या अस्तित्वाला ओहोटी लागल्याचे दिसून येते. या राज्यातील साम्यवाद्यांची सत्ता जाऊन तेथे गेल्या दहा वर्षांपासून तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. पण, गेल्या दहा वर्षांतील या सरकारचा कारभार लक्षात घेऊन प. बंगालमधील जनता तृणमूल काँग्रेसलाही धडा शिकविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षास मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता, येत्या 2 मेनंतर त्या राज्यातील चित्र पालटण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांमध्येच ते चित्र स्पष्ट होईल. पण, प. बंगालमधील माओवाद्यांचे उगमस्थान असलेल्या नक्षलबारीची आजची काय अवस्था आहे, यावर या निमित्ताने प्रकाश टाकल्यास लाल रंगाचा तेथून अस्त का होऊ लागला आहे, त्याची कल्पना येईल. 

सिलिगुडी हे उत्तर बंगालमधील एक व्यापारी केंद्र. या सिलिगुडीपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर वसले आहे नक्षलबारी हे एक लहानसे खेडे. पण, या खेड्यात उगम पावलेल्या नक्षलवादी-माओवादी चळवळीमुळे या गावाचे नाव सर्वदूर पसरले. या माओवादी चळवळीचा संस्थापक असलेल्या चारू मुजुमदार याचे हे गाव. चारू मुजुमदार याच्यावर चीनचा नेता माओ झेडाँग याचा अत्यंत प्रभाव पडलेला होता. तसेच चिनी क्रांती, व्हिएतनाम युद्ध, क्युबन क्रांती याने भारावून गेलेल्या चारू मुजुमदार यास सशस्त्र क्रांतीचा मार्ग हाच सर्व समस्यांवर उपाय असल्याचे वाटत होते. १९६७ मध्ये चारू मुजुमदार याच्या नेतृत्वाखालील गटाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापासून फारकत घेतली आणि १९६९ मध्ये भारतीय साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) पक्षाची स्थापना केली. सशस्त्र शेतकर्‍यांच्या क्रांतीची हाक चारू मुजुमदार याने दिली. चारू मुजुमदार याच्या चळवळीस प्रारंभी प्रतिसादही मिळत गेला. पण, आता ही मार्क्सवादी-लेनिनवादी सशस्त्र क्रांतीची चळवळ तिच्या जन्मस्थानीच संपुष्टात आल्याचे दिसत आहे. या गावामध्ये लेनिन, स्टालिन, माओ, चारू मुजुमदार आदी साम्यवादी चळवळीच्या नेत्यांचे पुतळे दिसून येत असले, तरी या गावामध्ये आता भाजपचे कमळ फुललेले दिसून येत आहे. साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला आता परिवर्तन हवे असून, भारतीय जनता पक्ष सत्तेवर यावा, असे या भागातील जनतेला वाटत आहे. पंतप्रधान मोदी चांगले काम करीत असल्याने राज्यामध्ये भाजपचे शासन यावे, असे नक्षलबारीमधील जनतेला वाटते. “आम्ही डाव्या राजवटीचा कारभार पहिला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा कारभार पाहिला आहे. आता आम्हाला भाजपला संधी द्यायची आहे. आम्हा कोणालाही डाव्या पक्षांचे आणि तृणमूल काँग्रेसचे हिंसाचाराचे राजकारण नको आहे,” असे त्या भागातील जनतेचे मत आहे. तसेच तेथील मुस्लीम समाज भाजपच्या बाजूने उभा असल्याचे दिसून येत आहे. मुस्लीम समाजाची मते एक तर तृणमूल काँग्रेसला किंवा अन्य पक्षास मिळत असत. पण, यावेळी मुस्लीम मतदारही आम्ही भाजपला मत देणार असे उघडपणे बोलत असल्याचे पाहता, या राज्यामध्ये परिवर्तन होण्याची चिन्हे दिसत आहेत. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांना परत पाठविले पाहिजे, असे या मुस्लीम समाजाचेही म्हणणे आहे.

 दार्जिलिंग या लोकसभा मतदारसंघामध्ये सिलिगुडी, नक्षलबारी हा भाग येतो. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजू बिश्त हे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले होते. प. बंगालमध्ये परिवर्तन होण्याची चिन्हे गेल्या लोकसभा निवडणुकांपासूनच प्रकर्षाने दिसून येऊ लागली होती. नक्षलबारी भागातील जनता शिक्षण संस्थांपासून वंचित आहे. या भागाचा म्हणावा तसा विकासही झालेला नाही. जनतेला रोजगाराच्या पुरेशा संधीही उपलब्ध झालेल्या नसल्याने जनता तृणमूल काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील प्रचंड भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाचे राजकारण यांनी जनता वैतागलेली आहे. त्यामुळे या भागातील जनता भाजपच्या मागे उभी राहत असल्याचे खासदार बिश्त यांचे म्हणणे आहे.

 नक्षलबारी परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे कार्य केले आहे, त्यामुळे येथील डाव्या चळवळीचा बालेकिल्ला ढासळला असल्याचे दिसून येत आहे. संघ परिवाराकडून चालविण्यात येत असलेल्या शारदा विद्यामंदिरामधून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच नैतिकतेचे, सुसंस्कारांचे पाठ दिले जात आहेत. शिक्षण, संस्कार आणि सेवा हे ध्येय ठेवून हे विद्यामंदिर त्या भागात कार्यरत आहे. आज बंगालमध्ये भाजपला जो उत्तम प्रतिसाद मिळत आहे, त्यास या राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे मूलभूत कार्य उभे केले आहे, ते कारणीभूत असल्याचे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळे या भागात संघाच्या कामाचा विस्तार झाला असल्याचे विरोधकही मान्य करतात. नक्षलबारी चळवळीचे जनक असलेल्या चारू मुजुमदार याचा मुलगा आणि मार्क्सवादी-लेनिनवादी नेता अभिजित मुजुमदार यानेही संघ कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे नक्षलबारी भागात संघकार्याचा विस्तार झाला असल्याची कबुली दिली आहे. लाल रंगाकडून भगव्या रंगाकडे जे परिवर्तन झाले आहे ते एका दिवसात, एका आठवड्यात किंवा एका महिन्यात झालेले नाही. संघाने कित्येक वर्षे जे अविरत कार्य केले त्यामुळे परिवर्तन झाले आहे, असे मत तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवाराने गेल्या अनेक वर्षांपासून जे कठोर परिश्रम केले, त्यामुळे प. बंगालमध्ये आज लाल रंग अस्तास गेल्याचे, तृणमूल काँग्रेसची पाने कोमेजून गेल्याचे दिसत आहे. आता भगव्या रंगाने प. बंगाल राज्य उजळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.


No comments:

Post a Comment